विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची रणनीती करिअर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने किती आणि कशी महत्त्वाची आहे, हे आपण मागील लेखात पाहिले. आज आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या अराजपत्रित गट ‘ब’ संवर्गातील विविध परीक्षांचे स्वरूप आणि माहिती घेऊ या.
पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक या परीक्षांना मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचे पदवीप्राप्त उमेदवार बसू शकतात. याशिवाय कृषी, विधी, अभियांत्रिकी पदवीधरांसाठी वेगळ्या विशेषज्ञ सेवा परीक्षांचे आयोजन आयोगामार्फत केले जाते. सर्वासाठी खुल्या असणाऱ्या काही परीक्षांबाबत या लेखात जाणून घेऊयात.
* पोलीस उपनिरीक्षक परीक्षा-
ही परीक्षा (महिला/पुरुष) चार टप्प्यांत होते.
अ) पूर्व परीक्षा – १०० गुण.
ब) मुख्य परीक्षा – २०० गुण.
क) शारीरिक चाचणी- १०० गुण.
ड) मुलाखत – ४० गुण.
* साहाय्यक (गट ब अराजपत्रित) परीक्षा-
ही परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येते.
अ) पूर्व परीक्षा – १०० गुण.
ब) मुख्य परीक्षा – २०० गुण.
* विक्रीकर निरीक्षक परीक्षा (गट ‘ब’ ‘अ’ राजपत्रित)-
ही परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते-
अ) पूर्व परीक्षा – १०० गुण
ब) मुख्य परीक्षा – ४०० गुण
क) मुलाखत – ५० गुण.
या तीनही परीक्षांचा पूर्व परीक्षेसाठी अभ्यासक्रम एकसमान आहे. सामान्य क्षमता चाचणी हा १०० गुणांसाठी वस्तुनिष्ठ स्वरूपाचा पेपर असतो. प्रश्न संख्या १०० असून परीक्षेचा कालावधी एक तासाचा असतो.
* चालू घडामोडी- जागतिक तसेच भारतातील.
* नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन.)
* आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.
* भूगोल (महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह)- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
* अर्थव्यवस्था-
– भारतीय अर्थव्यवस्था: राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय़ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
– शासकीय अर्थव्यवस्था: लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
* सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.
* बुद्धिमापन चाचणी व अंकगणित.
पूर्व परीक्षेद्वारे मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची निवड केली जाते. पूर्व परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेल्या किमान सीमा रेषा किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवाराला मुख्य परीक्षेसाठी पात्र समजण्यात येते. पूर्व परीक्षेसाठीचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जात नाहीत.
पूर्व परीक्षेत यशस्वी उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड होते. मुख्य परीक्षेत दोन अनिवार्य पेपर असतात. पेपर क्र. १- मराठी व इंग्रजी, पेपर क्रमांक २- सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान. हे दोन्ही पेपर एक तास कालावधीचे व प्रत्येकी १०० गुणांसाठी असतात. विक्रीकर निरीक्षक पदासाठीच्या मुख्य परीक्षेत पेपर क्र. १ आणि २, प्रत्येकी २०० गुणांसाठी असतात. पेपर क्र. १ – मराठी व इंग्रजी या पेपरचा अभ्यासक्रम तीनही परीक्षांसाठी समान आहे.
मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
इंग्रजी : common vocabulary, sentence structure, grammar, use of idioms and phrases and their meaning and comprehension of passage.
पेपर क्र. २ चा अभ्यासक्रम बहुतांशी एकसमान असला तरी काही उपघटक वेगवेगळे आहेत.
* साहाय्यक मुख्य परीक्षा पेपर क्र. २ चा अभ्यासक्रम – चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्य घटना, माहिती अधिकार अधिनियम २००५, संगणक व माहिती तंत्रज्ञान, राजकीय यंत्रणा, जिल्हा प्रशासन, न्यायमंडळ असा आहे.
* विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर-२ चा अभ्यासक्रम- चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आíथक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्तव्यवस्था, संगणक व
माहिती तंत्रज्ञान.
* पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम-
चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्य घटना, माहिती अधिकार अधिनियम २००५, संगणक व माहिती तंत्रज्ञान, मानवी हक्क व जबाबदाऱ्या, मुंबई पोलीस कायदा, भारतीय दंडसंहिता, फौजदारी प्रक्रियासंहिता, भारतीय पुरावा कायदा.
साहाय्यक मुख्य परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे अंतिम निकाल जाहीर केला जातो.
विक्रीकर निरीक्षक परीक्षा पद्धतीत उपलब्ध जागांच्या सुमारे दुप्पट ते तीनपट उमेदवार मुलाखतींसाठी पात्र होतील. अशा रीतीने गुणांची किमान समान रेषा निश्चित केली जाते. त्याद्वारे मुलाखतीसाठी निवड होते. मुलाखतीसाठी ५० गुण असतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीच्या गुणांची एकत्रित बेरीज करून अंतिम निकाल जाहीर होतो.
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षेत विहित गुण मिळविणारे उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरतात. उंची व छातीविषयक विहित मोजमापाच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक चाचणीसाठी निवड होते. ही चाचणी १०० गुणांची असते. या चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरतात. मुलाखत ४० गुणांची असते. मुख्य परीक्षा, शारीरिक चाचणी व मुलाखतीचे गुण या एकत्रित बेरजेनुसार अंतिम निकाल लागतो.
‘गट ब’ संवर्गातील विविध परीक्षांना सामोरे जाण्यासाठी एकाग्र चित्ताने अभ्यास करण्याची गरज आहे. अलीकडे झालेल्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप आणि पूर्व – मुख्य परीक्षांच्या गुणांची किमान समान रेषा पाहता स्पध्रेची तीव्रता व काठिण्यपातळी लक्षात येईल. यासाठी मूलभूत अभ्यास आणि प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण हे अभ्यासाचे प्राधान्यक्रम असायला हवेत.
thesteelframe@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2015 रोजी प्रकाशित
पोलीस उपनिरीक्षक, साहाय्यक, विक्रीकर निरीक्षक परीक्षांचे स्वरूप
विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची रणनीती करिअर सुरक्षित करण्याच्या दृष्टीने किती आणि कशी महत्त्वाची आहे, हे आपण मागील लेखात पाहिले.

First published on: 09-03-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police inspector assistant sales inspector exam format