व्यवस्थापनातील पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजेच एम.बी.ए. अभ्यासक्रमाला प्रवेश मिळविण्यासाठी सीमॅट प्रवेश परीक्षेला सामोरे जावे लागते. या प्रवेश परीक्षेची तयारी कशी कराल, याविषयीच्या लेखमालेचा भाग दुसरा.
एम.बी.ए. च्या प्रवेश परीक्षेसंबंधी मागील लेखामध्ये आपण चर्चा केली आहे. आता या परीक्षेची तयारी कशी करावी, यासंबंधी थोडा विचार करू. एम.बी.ए. अभ्यासक्रमाचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने (विद्यापीठाशी संलग्न अभ्यासक्रम) होत असल्यामुळे प्रवेश परीक्षेची योग्य
ती तयारी करणे हे आवश्यक आहे. चांगल्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यायचा असल्यास प्रवेश परीक्षेला मिळणारे गुण महत्त्वाचे
ठरतात.
सीमॅट परीक्षा एकूण ४०० गुणांची असते व त्यामध्ये वस्तुनिष्ठ पद्धतीने एकूण १०० प्रश्न असतात. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक बिनचूक उत्तराला चार गुण आहेत. पण प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक गुण वजा करण्यात येईल. यामुळे प्रवेश परीक्षेची तयारी करताना पुढील मुद्दे विचारात घेतले पाहिजेत.
१) सर्वात पहिल्यांदा विचारात घेण्याची गोष्ट म्हणजे तीन तासांमध्ये १०० प्रश्न सोडवण्याचा सराव करणे. यामध्ये अगदी घडय़ाळ लावून असे प्रश्न सोडवण्याची तयारी करणे आवश्यक आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप लक्षात घेतल्यास असे दिसते की, पहिले दोन विभाग हे अनुक्रमे गणितीय संकल्पना व तार्किक संकल्पना (लॉजिकल रिझनिंग) यावर आधारित आहेत. या प्रकारच्या प्रश्नांची काठीण्य पातळी (डिफिकल्टी लेव्हल) ही फार उच्च दर्जाची नसते, परंतु बिनचूक उत्तर कमीत कमी वेळामध्ये देण्यासाठी सराव मात्र अतिशय आवश्यक असतो. यासाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) संकेतस्थळावर नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेली आहे. ही प्रश्नपत्रिका पाहून त्याप्रमाणे सराव केल्यास त्याचा निश्चित उपयोग होतो. तसेच बाजारामध्ये अनेक प्रकारचे प्रश्नपत्रिकासंच सरावासाठी उपलब्ध आहेत. या सर्वाचा वापर करून जर नियमित सराव केला तर त्याचा उपयोग होतो. यामध्ये लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा कॅलक्युलेटर वापरू दिला जात नाही. त्यामुळे सराव करताना, आकडेमोड कॅलक्युलेटरच्या वापराशिवाय केली पाहिजे. यासाठी अक्षरश: घडय़ाळ लावूनच सराव करणे हे फायद्याचे ठरते. तसेच वेळेचे नियोजन करताना पहिले दोन विभाग कमीत कमी वेळेमध्ये कसे संपवता येतील याचाही विचार केला पाहिजे.
परीक्षेमधील यापुढील म्हणजेच तिसरा व चौथा विभाग हा अनुक्रमे भाषाविषयक प्रश्न व सामान्यज्ञानावर आधारित प्रश्न यांचा असतो. यापैकी भाषाविषयक प्रश्नांचा अभ्यास करताना समानार्थी शब्द, तसेच विरुद्ध अर्थाचे शब्द इत्यादी विषयांचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. त्यासाठी शब्दसंपदा वाढवणे हे प्रयत्नपूर्वक करावे लागते. यामध्ये रोज आपण किती नवीन शब्द शिकलो हे लिहून ठेवल्यास शब्द व त्याचे अर्थ हो दोन्ही लक्षात राहतील. मात्र यामध्ये सुद्धा नियमितता असावी लागते. परीक्षेच्या आदल्या दिवशी किंवा रात्री या विभागाचा अभ्यास केल्यास ऐनवेळी गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. यासाठी पुन्हा एआयसीटीईने दिलेली नमुना प्रश्नपत्रिका पाहून त्याप्रमाणे सराव करावा. सध्यातरी प्रवेश परीक्षा ही स्थानिक भाषेमध्ये होत नसल्याने इंग्लिश भाषाविषयक सराव करणे हे आवश्यक आहे. भाषाविषयक प्रश्नांमध्ये अवघड असे काही नसून नियमितता तसेच सराव या दोन गोष्टी ठेवल्यास या विभागामध्ये सुद्धा चांगले गुण मिळवता येतात.
चौथा व शेवटचा विभाग म्हणजे सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न. यामध्ये खेळ, राजकीय घडामोडी, शास्त्रीय जगतातील घटना, साहित्य इत्यादीवर आधारित प्रश्न असतात. याची तयारी करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे दररोजचे वर्तमानपत्र काळजीपूर्वक वाचणे. तसेच दूरदर्शनवरील वेगवेगळ्या वाहिन्यांवरील बातम्या व चालू घडामोडींविषयक कार्यक्रम अगदी आवर्जून पहाणे. याचबरोबर इंटरनेटचा योग्य वापर, मित्रमंडळी, नातेवाईक, यांच्याबरोबर चालू घडामोडींवर केलेली चर्चा याचाही चांगला फायदा होतो. सामान्यज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी चांगली पुस्तकेही बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत. याही विभागाचा अभ्यास करताना नियमितपणा असणे हे नितांत गरजेचे ठरते. यामध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर आठवत नसल्यास किंवा माहीत नसल्यास किंवा खात्री नसल्यास तो प्रश्न सोडून देणे हे जास्त फायदेशीर पडते. कारण जर उत्तर चुकले तर निष्कारण एक गुण कमी होतो. म्हणून अंदाजाने उत्तर देणे म्हणजेच अंदाजाने टोले मारत रहाणे यामुळे गुण गमावण्याची वेळ येते. म्हणून हे प्रकार टाळले पाहिजेत. इतर तीन विभागांप्रमाणेच, सामान्यज्ञान विभागाची तयारीसुद्धा एका दिवसात करणे शक्य नाही, म्हणजेच याविषयी पूर्वनियोजन केले तर आपल्यालाच फायदा होतो. यामध्ये निष्कर्ष असा काढता येईल की, लेखी परीक्षेमध्ये अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी सातत्याने अभ्यास व सराव याची आवश्यकता आहे. परीक्षेतील विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या व उपलब्ध असलेला वेळ यांची सांगड घालण्यासाठी, घडय़ाळ लावून केलेला सराव याचाही उपयोग होतो. म्हणूनच परीक्षेची तारीख लक्षात घेऊन किमान तीन ते सहा महिने अगोदरपासून सराव करणे हे आपल्या करिअरच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. शेवटी आपले करिअर आपल्याच हातात असल्यामुळे चांगल्या भवितव्यासाठी अधिक मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. सीमॅट परीक्षा ही संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे सराव करताना कॉम्प्युटर सराव योग्य राहील.
२) लेखी परीक्षेनंतर प्रवेशाची पुढील पायरी म्हणजे गटचर्चा व वैयक्तिक मुलाखत. याबाबत असा अनुभव आहे की, लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवलेले अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी यामध्ये मागे पडतात. याचे प्रमुख कारण म्हणजे आत्मविश्वासाचा अभाव, अपुरी तयारी तसेच संज्ञापन कौशल्ये (कम्युनिकेशन स्किल्स) याकडे केलेले दुर्लक्ष. योग्य ती तयारी केल्यास या दोषांवर मात करणे सहज शक्य आहे.
गटचर्चा म्हणजे साधारणपणे १२ विद्यार्थ्यांचा एक गट करून त्यामध्ये एखाद्या विषयावर घडवून आणलेली चर्चा. यामध्ये साधारणपणे ३०-४० मिनिटांचा कालावधी दिला जातो व एखादा विषय दिला जातो. प्रत्येकाने यामध्ये सहभागी होणे अपेक्षित असते. गटचर्चेमध्ये एखादा विद्यार्थी-विद्यार्थिनी विषय कसा मांडतात. तसेच इतरांना संधी कशी देतात, विषयासंबंधी त्यांना पुरेसे ज्ञान आहे किंवा नाही, पुढाकार घ्यायची त्यांची तयारी आहे का. तसेच चर्चेचा समारोप ते कसे करतात, यावर गुण अवलंबून असतात. गटचर्चेमध्ये यशस्वीपणे सहभागी होण्यासाठी वाचन वाढवणे हे नितांत आवश्यक आहे आणि नेमके याच ठिकाणी बरेचजण कमी पडतात. बौद्धिक क्षमता चांगली आहे, पण गटचर्चेमध्ये दिलेल्या विषयासंबंधी माहितीच नाही, अशा परिस्थितीत चर्चेमध्ये गप्प बसण्याची वेळ येते. काही वेळा विषय माहिती आहे पण बोलू शकत नाही, म्हणून आत्मविश्वास नाही आणि यामुळे गुण कमी पडतात. त्यामुळे गटचर्चेसाठी वाचन वाढवणे, मित्रमंडळींमध्ये एखाद्या विषयावर चर्चा घडवून आणणे, चार लोकांसमोर बोलण्याची भीती घालवण्यासाठी सराव करणे इत्यादी गोष्टी जाणीवपूर्वक केल्या पाहिजेत. केवळ प्रवेश मिळवण्यासाठीच नव्हे तर एम.बी.ए. झाल्यानंतर ज्यावेळी व्यावसायिक जगात प्रवेश केला जातो त्यावेळी सुद्धा हे गुण उपयोगी ठरतात. यामध्ये सुद्धा अवघड काही नसले तरी हा शेवटी आपल्या मनोवृत्तीचा भाग असतो आणि म्हणून नियमित सराव हा उपयोगी पडतो.
गटचर्चेनंतर वैयक्तिक मुलाखत घेतली जाते. यामध्ये प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीला तज्ज्ञ व्यक्तींसमोर मुलाखत द्यावी लागते. मुलाखतीमध्ये व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, सामान्यज्ञान, एखाद्या विषयांसंबंधी (उदा. जर एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचा बी.कॉमला अकौन्टन्सी विषय असेल तर यासंबंधी) प्रश्न असे विविध पैलू तपासले जातात. याबाबतही असा अनुभव आहे की,योग्य प्रकारे तयारी न करता मुलाखत दिली जाते. उदा. एखाद्याला प्रश्न विचारला की आजच्या वर्तमानपत्रातील ठळक बातमी काय आहे तर बऱ्याच वेळा उत्तर मिळते की, मी आजचा पेपर वाचला नाही. तसेच एखाद्या विषयावर म्हणजे उदा. अकौन्टन्सीतील एखाद्या संकल्पनेवर प्रश्न विचारला तर उत्तर मिळते की हे फार पूर्वी शिकल्यामध्ये आता विसरलो आहे. म्हणजेच पुरेशी तयारी केली जात नाही.
वैयक्तिक मुलाखतीचीही योग्य ती पूर्वतयारी केली पाहिजे. यामध्ये पुन्हा सामान्यज्ञान, तसेच आजूबाजूची परिस्थिती, एखाद्या महत्त्वाचा प्रश्न आदी विषयी व्यवस्थित वाचन केले पाहिजे. वैयक्तिक मुलाखतीमध्ये आपल्या पेहरावाचाही विचार केला पाहिजे. प्रसंगाला शोभून दिसणारा पेहराव असला तर निश्चितच उपयोग होतो. तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेला असलेला विशेषीकरणाचा विषय हा सुद्धा पुन्हा वाचून ठेवला पाहिजे. वैयक्तिक मुलाखतीची तयारी करताना. पुरेसा सराव केला पाहिजे. यामध्ये मॉक इंटरव्हय़ू उपयोगी ठरतात.
सारांशाने असे म्हणता येईल की प्रवेश परीक्षा, गटचर्चा व वैयक्तिक मुलाखत यातील एकत्रित गुणांवर प्रवेश अवलंबून असल्यामुळे प्रत्येकाची पूर्वतयारी आवश्यक आहे. नियमित वाचन व सराव यांची सवय ठेवल्यास प्रवेशपरीक्षेमध्ये चांगले गुण मिळवणे शक्य होईल. चांगल्या संस्थेत प्रवेश हे एम.बी.ए. नंतरच्या यशस्वी वाटचालीचे पहिले पाऊल आहे आणि म्हणूनच याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.