यूपीएससीची तयारी : कर्तव्यवाद आणि नितांत आवश्यकतावाद

‘साध्य मूल्याच्या एका सुव्यवस्थित जगाचा एक घटक समजून प्रत्येक व्यक्तीने आचरण करावे.

सुश्रुत रवीश

मागील लेखात आपण उपयुक्ततावादाच्या मांडणीच्या तुलनेत आपण कर्तव्यवादाची ओळख करून घेतली. या लेखात आपण कान्टनी मांडलेल्या कर्तव्यवादातील आणखी काही बारकावे पाहणार आहोत. त्याचबरोबर कान्टच्या अत्यंत महत्त्वाच्या नितांत आवश्यकतावादाची मांडणी अभ्यासणार आहोत.

कर्तव्य – निर्णय नैतिक ठरण्यासाठी अनिवार्य असणारी अट म्हणजे प्रत्यक्ष कृती किंवा कर्तव्य. या संकल्पनेचे दोन घटक आहेत.

(१) कृतीची भावना/प्रेरणा

(२) त्यानुसार प्रत्यक्ष केलेली कृती

आता ‘नुसतेच जगाचे चांगले व्हावे’ असे म्हणून चालत नाही. त्यानुसार आपण स्वत: काय करतो? हे महत्त्वाचे असते. नुसते संकल्प चालणार नाही तर थेट कृतीही केली पाहिजे. तरच तिला कर्तव्य म्हणता येईल. अशा रितीने कृतीची प्रेरणा हे तिचे पहिले वैशिष्टय़ असते. आणि कर्तव्याचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्यक्ष कृती. या दोन्ही गोष्टी जुळल्या तरच तो निर्णय कर्तव्यवादी निर्णय म्हणून ओळखला जातो. नितिमत्तापूर्ण सामाजिक जीवनासाठी कान्टच्या मते कर्तव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कर्तव्य हे केवळ कर्तव्याच्या जाणिवेतून केले पाहिजे आणि त्याचा संबंध त्या कृतीतून होणाऱ्या परिणामांशी जोडला जाऊ नये, अशी मांडणी कान्ट करतो.

एकदा जर कर्तव्यासाठी कर्तव्य करावयाचे ठरविले की, मग ‘मी कर्तव्य का करू? माझ्या ठिकाणी कर्तव्यबुद्धी नाही, मी काय करु?’ असे कोणालाच म्हणता येत नाही. म्हणून कर्तव्य करणे, हेच माझे कर्तव्य बनते. ‘कर्तव्यासाठी कर्तव्य’ या एकाच भावनेतून जो संकल्प प्रेरित होतो तोच सत्संकल्प होय. विद्यार्थी, शिक्षक, राजकारणी, समाजकारणी, भाऊ, बहीण, मित्र इ. प्रत्येक व्यक्ती प्रत्येक वेळी कोणत्यातरी कर्तव्याला बांधील असतातच. यासंबंधी कान्टनी नितांत आवश्यकतावादाची मांडणी केली. त्यात कान्ट असा आग्रह करतो की, प्रत्येक नैतिक कृतीचे मूल्यमापन खालील तीन सिद्धांतांच्या आधारे करता येणे शक्य आहे.

नितांत आवश्यकतावाद (Categorical Imperative)

१) आचरणाचा नियम

‘केव्हाही काहीही झाले तरी अशी कृती कर की त्या कृतीमागील तत्त्वे हा सार्वत्रिक नियम व्हावा अशी इच्छा तू करू शकशील.’ (“Act only on that principle which can be a Universal Law.”)

कान्टच्या मते, कृती करताना, कर्तव्य बजावताना त्यामागील तत्त्व हा केवळ स्वत:लाच लागू असता कामा नये. ते सर्वाना लागू होईल असे व्यापक व आदर्श असले पाहिजे. उदा. ‘दिलेले वचन पाळावे हे तत्त्व मला इतरांनी दिलेले वचन त्यांनी पाळावे’ असे असू नये; तर ‘प्रत्येकाने दिलेले वचन पाळावे,’ असे सार्वत्रिक स्वरूपाचे असावे.

२) साध्य मूल्यत्व

‘कोणत्याही माणसाला, मग ती स्वत: असो किंवा इतर कुणीही, केवळ साधन म्हणून न वागविता तो माणूस एक साध्य आहे असे वागविले पाहिजे’ (“Do not use any person including yourself as only means”)

प्रत्येक माणूस हा आपले साध्य असला पाहिजे, तो साधन असता कामा नये. त्यास साधन समजू नये. जर ‘मी इतरांना साधन समजलो तर इतर लोकही मला तसेच साधन समजून वागवतील. त्यामुळे त्यांनी मला साध्य समजावे, असे मला वाटत असेल तर मीही त्यांना साध्यच मानले पाहिजे, साधन नाही’ कान्टच्या मते, माझी स्वत:ची कृती व इतरांची कृती याकडे आपण भिन्न नजरेने न पाहता व्यापक दृष्टीने पाहिले पाहिजे. मी जितका महत्त्वाचा आहे असे मला वाटते, तितकेच इतर जनही मला महत्त्वाचे वाटले पाहिजेत. तरच मीही इतर जनांना महत्त्वाचा वाटेन, अन्यथा नाही. कारण हा नियम सार्वत्रिक स्वरूपाचा असतो.

३) साध्य मूल्यांचे सुव्यवस्थित जग

‘साध्य मूल्याच्या एका सुव्यवस्थित जगाचा एक घटक समजून प्रत्येक व्यक्तीने आचरण करावे.’ (“Always act as a member of Kingdom of Ends” (Autonomy of Morality)

कान्टच्या मते, वरील तीन आदेश पाळले तर जे जग निर्माण होईल ते साध्य मूल्यांचे जग होय. ‘मी साध्य असेन इतर जनही साध्य असतील.’ असे सांगणारे हे स्वतंत्र नीतितत्त्वच आहे. परिपूर्ण नैतिक जगात संघर्ष नसतो. याचे कारण मी कुणालाही साधन मानीत नाही आणि मलाही कुणी साधन मानीत नाही. त्यामुळे माझ्यावर कुणी बंधन घालीत नाही अन् मीही प्रतिकार म्हणून त्या व्यक्तीवर बंधने लादत नाही. अशा जगाची रचना ही साहजिकच सुव्यवस्थित असते. ते साध्यमूल्याचे राज्य असते. साधारणत: असे घडते की, कोणतेही सुख कोणत्यातरी अटी पाळल्या तरच मिळते. त्यामुळे सत्संकल्पाशी सुसंगत असेल तर सुख चांगले असते. दुर्जनाला सुख मिळाले तर ते चांगले नसते. ती भयानक गोष्ट होईल. जगात वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या समाजामध्ये नीतिनियमविषयक कल्पना वेगवेगळ्या असतात. मग वैश्विक पातळीवर समर्थनीय ठरणारे नियम बनवताच येणार नाहीत असेही वाटू शकते. मात्र कान्टच्या नितांत आवश्यकतावादातून, नैतिक नियमही सापेक्षतेच्या पलीकडे जाऊन बनवता येऊ शकतात हा महत्त्वाचा विचार रुजवला.

(सदरलेखकानी नीतीशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमताह्ण या पुस्तकाचे लेखन केले आहे.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Preparation of upsc upsc preparation tips upsc exam preparation zws