टाटा मूलभूत संशोधन संस्थेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या मुंबईच्या होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन येथे संशोधनपर पीएच.डी करू इच्छिणाऱ्यांसाठी खालील संधी उपलब्ध आहेत.
उपलब्ध विषय- संशोधन प्रकल्पांतर्गत प्रामुख्याने खालील विषय उपलब्ध आहेत-
* विज्ञान व गणित विषयांतर्गत पदवी अभ्यासक्रमातील शिक्षणक्रम.
* विज्ञान विषयाचे कल्पक पद्धतीने सादरीकरण करण्यासाठी कल्पकतेची साथ.
* शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील गणित आणि विज्ञान विषयांच्या शैक्षणिक आवडीला चालना देणे.
* शैक्षणिक अभ्यासक्रमांमध्ये गरजेनुरूप सुधारणा करणे.
* शिक्षण पद्धतीला दृक्श्राव्य शैक्षणिक पद्धतीची साथ देणे.
* शिक्षणामधील आर्थिक, सामाजिक व लिंगनिहाय प्रमाण.
* विज्ञान- ज्ञानाचे बदलते स्वरूप व त्यामागचे वातावरण.
* विज्ञान क्षेत्रांतर्गत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमधील संशोधनपर विकास.
आवश्यक अर्हता- अर्जदारांनी एमएस्सी, एमएसडब्ल्यू, शिक्षण, मानसशास्त्र यांसारख्या विषयातील एमए, बीटेक, बीई, एमबीबीएस यांसारखी अर्हता प्राप्त केलेली असावी. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. त्याशिवाय त्यांना विज्ञान विषयांतर्गत शिक्षण-प्रशिक्षण, लेखन, शैक्षणिक विश्लेषण, शैक्षणिक विकास यांसारख्या क्षेत्रात विशेष रुची असावी. या योजनेअंतर्गत विज्ञान व गणित विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचाही विचार करण्यात येतो.
निवड पद्धती- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलावण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवड परीक्षा केंद्रांवर २२ मे २०१६ रोजी घेण्यात येईल. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे व मुंबई परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांकाच्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
संशोधनाचा कालावधी व शिष्यवृत्ती- निवड झालेल्या उमेदवारांचा संशोधन कालावधी सर्वसाधारणपणे वर्षभराचा असेल. हा कालावधी जास्तीत जास्त ५ वर्षांपर्यंत वाढवता येईल.
या कालावधीदरम्यान संशोधकांना- उमेदवारांना दरमहा २५ हजार रु. ते २८ हजार रु. संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल. याशिवाय त्यांना ३० टक्के घरभाडे भत्ता व वार्षिक आकस्मिक खर्चापोटी ३२ हजार रु. देण्यात येतील.
अर्जासह पाठवायचे शुल्क- अर्जदारांनी आपल्या अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून ४०० रु.चा होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टीआयएफआर यांच्या नावे असणारा व मुंबई येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती- अधिक माहितीसाठी http://www.hbese.tifr.res.in/ admissions/ अथवा http://www.hbese.tifr.res.in/ graduote-school या संकेतस्थळांवर भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे अर्ज ग्रॅज्युएट स्कूल अॅडमिशन्स- २०१६, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ फंडामेंटल रीसर्च, वि. ना. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई- ४०००८८ या पत्त्यावर ३१ मार्च २०१६ पर्यंत पाठवावेत.
आयसीएमआर- इंटरनॅशनल फेलोशिप २०१६-१७
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावर जीव-वैद्यकशास्त्र विषयातील संशोधनाला चालना देण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘आयसीएमआर- इंटरनॅशनल फेलोशिप २०१६-१७’ या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विविध शिष्यवृत्तीच्या संधी उपलब्ध आहेत.
शिष्यवृत्तींचा तपशील : उपलब्ध असणाऱ्या एकूण शिष्यवृत्तींची संख्या ८ असून त्यामध्ये युवा संशोधकांसाठी १२, तर अनुभवी संशोधकांसाठी ६ शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
शैक्षणिक अर्हता- अर्जदार एमडी अथवा पीएच.डी पात्रताधारक असावेत. त्यांचा शैक्षणिक आलेख उत्तम असावा. युवा संशोधन शिष्यवृत्तीसाठी संशोधकांना जीव-वैद्यकशास्त्र क्षेत्रातील संशोधनपर कामाचा किमान तीन वर्षांचा, तर अनुभवी संशोधकांसाठी अशाच प्रकारच्या संशोधनपर कामाचा किमान १५ वर्षांचा अनुभव असावा.
वयोगट- युवा संशोधकांसाठी अर्जदारांचे वय ४५ वर्षे तर अनुभवी संशोधकांचे वय ५७ वर्षांहून अधिक नसावे.
अधिक माहिती- अधिक तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्चची जाहिरात पाहावी अथवा कौन्सिलच्या icmr.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह अर्जाच्या १० प्रती आस्थापनांच्या शिफारसपत्रांसह साध्या टपालाने इंटरनॅशनल हेल्थ डिव्हिजन (आयएचडी), इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रीसर्च, व्ही. रामलिंगम स्वामी भवन, पोस्ट बॉक्स नं. ४९११, अन्सारी नगर, नवी दिल्ली- ११००२९ या पत्त्यावर ३१ मार्च २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवाव्यात.
शिष्यवृत्तीचे स्वरूप-
निवड झालेल्या उमेदवारांच्या संशोधनाचा कालावधी युवा संशोधकांसाठी १० ते १५ दिवस, तर अनुभवी संशोधकांसाठी तीन ते सहा महिन्यांचा असावा. त्या दरम्यान त्यांना विदेशी शिक्षण- संशोधन संस्थांमध्ये विशिष्ट संशोधन प्रकल्पावर काम करण्यासाठी खालीलप्रमाणे संशोधनपर शिष्यवृत्ती देण्यात येईल-
* युवा संशोधकांना दरमहा ३,००० अमेरिकी डॉलर्स व आकस्मिक खर्चापोटी २० हजार रु.
* अनुभवी संशोधकांना दररोज २०० अमेरिकी डॉलर्स व आकस्मिक खर्चापोटी २० हजार रु.
वरील शिष्यवृत्तीव्यतिरिक्त संशोधकांना- उमेदवारांना हवाई प्रवास, मोफत निवास यांसारख्या सुविधाही उपलब्ध असतील.
निवड झालेल्या उमेदवारांना आपले संशोधनपर काम २८ फेब्रुवारी २०१७ पर्यंत पूर्ण करावे लागेल.
पर्यावरणविषयक विशेष पदव्युत्तर अभ्यासक्रम
देहराडून येथील वन संशोधन विद्यापीठात पर्यावरणविषयक पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये खालीलप्रमाणे प्रवेश उपलब्ध आहेत-
एमएस्सी फॉरेस्ट्री : उपलब्ध जागा ३८. अर्जदारांनी वनशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, प्राणीशास्त्र अथवा कृषी विज्ञान यांसारख्या विषयांतील पदवी प्राप्त केलेली असावी.
एमएस्सी- वुड सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी : उपलब्ध जागा ३८. अर्जदारांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित अथवा वनशास्त्र यांसारख्या विषयातील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
एमएस्सी- एन्व्हायरॉन्मेंट मॅनेजमेंट : उपलब्ध जागा ३८. अर्जदारांनी वनशास्त्र, पर्यावरण विज्ञान, अप्लाइड सायन्स यांसारख्या विषयांतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
एमएस्सी पेपर टेक्नॉलॉजी : उपलब्ध जागा २०. अर्जदारांनी रसायनशास्त्र, विज्ञान, केमिकल वा मेकॅनिकल इंजिनीअरिंग यांसारख्या विषयांतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांच्या गुणांची टक्केवारी ५० टक्के असावी. गुणांच्या टक्केवारीची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी ४५ टक्क्य़ांपर्यंत शिथिलक्षम आहे.
निवड पद्धती : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर ८ मे २०१५ रोजी घेण्यात येईल.
अर्जदारांची पात्रता परीक्षेतील गुणांची टक्केवारी व निवड परीक्षेतील गुणांक यांच्या आधारे त्यांना संबंधित अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यात येईल.
अर्जासह पाठवायचे शुल्क- प्रवेश अर्जासह पाठवायचे शुल्क म्हणून १,२०० रु. चा रजिस्ट्रार, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट (डीम्ड युनिव्हर्सिटी) यांच्या नावे असणारा व देहराडून येथे देय असलेला डिमांड ड्राफ्ट पाठवणे आवश्यक आहे.
अधिक माहिती- अधिक माहितीसाठी फॉरेन रिसर्च इन्स्टिटय़ूट, डेहराडूनच्या fri.iefre.gov.in किंवा http://www.icfre.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील भरलेले व आवश्यक तो तपशील आणि डिमांड ड्राफ्टसह असणारे प्रवेश अर्ज रजिस्ट्रार, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट डीम्ड युनिव्हर्सिटी, पोस्ट ऑफिस- आयपीई, कोलगड रोड, देहराडून- २४८१९५ या पत्त्यावर ४ एप्रिल २०१६ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
विदेशातील उच्च शिक्षणासाठी विशेष शिष्यवृत्ती
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागातर्फे अनुसूचित जातीच्या, भटक्या- विमुक्त जमातीच्या आणि भूमिहीन कृषी मजुरांची मुले असलेल्या अर्हताप्राप्त विद्यार्थ्यांकडून विदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी व संशोधनपर पीएच.डी करण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
शिष्यवृत्तींचा तपशील- उपलब्ध शिष्यवृत्तींची संख्या १०० असून त्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी ९०, भटक्या- विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ६ तर भूमिहीन कृषी मजुरांच्या मुलांसाठी ४ शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत.
शिष्यवृत्तींची विषयवार वर्गवारी : एकूण शिष्यवृत्तींमध्ये अभियांत्रिकी व व्यवस्थापन- ३२, विज्ञान व उपयोजित विज्ञान- १७, कृषी विज्ञान व वैद्यकशास्त्र- १७, अकाउंट्स व आंतरराष्ट्रीय वित्त व्यवस्थापन- १७, मानव्यशास्त्र, सामाजिक विज्ञान व फाइन आर्ट- १७ याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येतील.
शैक्षणिक अर्हता : अर्जदार विद्यार्थी खालीलप्रमाणे पात्रता असायला हवेत-
पीएच.डी शिष्यवृत्ती- अर्जदारांनी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी कमीतकमी ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
पदव्युत्तर पदवी शिष्यवृत्ती- अर्जदारांनी संबंधित विषयासह पदवी परीक्षा किमान ५५% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी.
अर्जदार विद्यार्थी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी वा पीएच.डी अभ्यासक्रमासाठी विदेशी विद्यापीठ वा संशोधन संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा अथवा ते संबंधित अभ्यासक्रम करीत असावेत.
वयोमर्यादा : अर्जदारांचे वय ३५ वर्षांहून अधिक नसावे.
आर्थिक निकष : अर्जदारांच्या कुटुंबाचे वार्षिक एकत्रित उत्पन्न ६ लाख रुपयांहून अधिक नसावे.
अभ्यासक्रमांचा कालावधी व शिष्यवृत्तीची रक्कम : संशोधनपर पीएच.डी करण्यासाठी विद्यार्थ्यांचा कालावधी ४ वर्षांचा असेल. या दरम्यान त्यांना वार्षिक १५,४०० अमेरिकन डॉलर्सची शिष्यवृत्ती, वार्षिक आकस्मिक खर्चापोटी १,५०० अमेरिकी डॉलर्स, प्रवास खर्च व प्रवास भत्ता इत्यादी देय असेल.
पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्लंडच्या चलनामध्ये शिष्यवृत्ती देय असल्यास त्यांना त्यांच्या संशोधनकाळात वार्षिक ९,९०० ग्रेट ब्रिटन पाउंड्सची शिष्यवृत्ती, वार्षिक आकस्मिक खर्चापोटी १,१०० ग्रेट ब्रिटन पाउंड्स, प्रवास खर्च, प्रवास भत्ता इत्यादी देय असेल.
पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ३ वर्षे कालावधीसाठी वरीलप्रमाणे शिष्यवृत्ती, खर्चापोटी रक्कम, प्रवास भत्ता इत्यादी देण्यात येईल.
अर्जाचा नमुना व तपशील : अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २० ते २६ फेब्रुवारी २०१६ च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्र सरकारच्या न्याय व सशक्तीकरण विभागाची शिष्यवृत्तीची जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची मुदत- विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील व कागदपत्रांसह असणारे अर्ज डायरेक्टर- एसीडी व्ही सेक्शन, मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अॅण्ड एम्पॉवरमेंट, डिपार्टमेंट ऑफ सोशल जस्टिस अॅण्ड एम्पॉवरमेंट रूम नं. २११, ‘डी’ विंग, शास्त्री भवन, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, नवी दिल्ली- ११०००१ या पत्त्यावर ४ एप्रिल २०१६ पर्यंत पाठवावेत.