विद्यार्थी मित्रांनो विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप, अभ्यासाची रणनीती आणि पूर्वपरीक्षेचे अभ्यासस्रोत यासंदर्भात मागील लेखांत आपण माहिती घेतली आहे. आज आपण मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्यासाठी कोणते अभ्यासस्रोत वापरावेत यासंदर्भात माहिती घेऊयात. अभ्यासस्रोत वापरताना जुन्या प्रश्नपत्रिकांची अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालून निवडक मुद्दे अभ्यासण्याची काळजी विद्यार्थ्यांनी घेतलीच पाहिजे.

–   पेपर क्रमांक – १ : मराठी व इंग्रजी

अ) मराठी – सर्वसामान्य शद्बसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे

अभ्यासस्रोत – सुगम मराठी व्याकरण लेखन (लेखक – मो. रा. वाळंबे), सातवी स्कॉलरशीप नवनीत गाईड.

ब) इंग्रजी – Common Vocabulary, Sentence Structure, Grammar, Use of Idioms and Phrases and their meaning, and Comprehension of Passage.

अभ्यासस्रोत – High School English Grammar and Composition by Wren and Martin.

 

–   पेपर क्रमांक – २ : सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान

या विषयामध्ये खालील घटक, उपघटकांचा समावेश असतो.

१)  चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील – यासाठी पूर्वीच्या लेखात नमूद केल्याप्रमाणे परीक्षेच्या अगोदर किमान वर्षभर घडलेल्या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी विचारात घ्याव्यात. यासाठी योजना, लोकराज्य ही मासिके, लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस ही दैनिके वापरावीत.

२)  बुद्धिमत्ता चाचणी – या विषयामध्ये अंकमाला, अक्षरमाला, सांकेतिक शब्द, अंकांची कोडी, आरशातील प्रतिमा, नातेसंबंध, तर्क-अनुमान, आकृत्यांमधील विसंगती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न ठरावीक वेळेत सुटण्यासाठी अधिकाधिक सरावाची आवश्यकता असते. यासाठी कोणताही शॉर्टकट वापरता येत नाही. तुमचा जेव्हा जास्तीत जास्त सराव होतो तेव्हाच तुम्हाला शॉर्टकट्स जमू शकतात. त्यामुळे या विषयाची तयारी करताना तुम्हाला महत्त्वाची सूत्रे, पाढे, वर्ग, वर्गमुळे, घन, घनफळे तोंडपाठ असणे गरजेचे आहे.

अभ्यासस्रोत- आर. एस. अग्रवाल यांचे क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिटय़ूड हे पुस्तक.

३)  महाराष्ट्राचा भूगोल – यामध्ये महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, प्राकृतिक विभाग, पर्जन्यमान, नद्या, पर्वत, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या या उपघटकांवर प्रामुख्याने प्रश्न विचारले जातात. या घटकांचा अभ्यास करताना महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या ठिकाणी घडतात त्या ठिकाणांचा, प्राकृतिक भूगोल नकाशावाचनाच्या साहाय्याने अभ्यासल्यास भूगोलाचा परीक्षाभिमुख अभ्यास सुकर बनतो.

अभ्यासस्रोत- चौथी व नववीचे महाराष्ट्र बोर्डाचे पाठय़पुस्तक, मेगास्टेट महाराष्ट्र हे ए.बी. सवदी यांचे पुस्तक

४)  महाराष्ट्राचा इतिहास – या विभागात १८८५ ते १९४७ या काळातील सामाजिक व आíथक जागृती, महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व काळातील जनजागृतीमध्ये वर्तमानपत्रांची भूमिका, शिक्षणाचा परिणाम समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी इ. घटकांचा समावेश होतो.

अभ्यासस्रोत – पाचवी, आठवी आणि अकरावीची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके तसेच आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास हे डॉ. अनिल कठारे यांचे पुस्तक.

५)  भारतीय राज्यघटना – या विभागात घटनेची निर्मिती, महत्त्वाची कलमे, ठळक वैशिष्टय़े, केंद्र-राज्यसंबंध, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, न्यायपालिका, संसद, मंत्रिमंडळ यांची काय्रे या प्रमुख घटकांवर प्रश्न विचारले जातात.

अभ्यासस्रोत – सहावी ते दहावीपर्यंतची नागरिकशास्त्राची महाराष्ट्र बोर्डाची पाठय़पुस्तके, अकरावी व बारावीची राज्यशास्त्राची पुस्तके, एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे पुस्तक.

६)  माहिती अधिकार अधिनियम-२००५ – या घटकावरील प्रश्न सामान्यत या अधिनियमातील तरतुदी, विविध घटकांसाठी असणाऱ्या विशेष सवलती, कायद्याची अंमलबजावणी, अंमलबजावणी न झाल्यास होणारी शिक्षा यासंदर्भात असतात.

अभ्यासस्रोत – यशदामार्फत प्रकाशित माहिती अधिकार अधिनियम या विषयाची पुस्तिका.

७)  संगणक व माहिती तंत्रज्ञान – या घटकांतर्गत आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवìकग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, माहिती तंत्रज्ञान उद्योग व भूमिका अशा प्रमुख घटकांवर प्रश्न विचारले जातात.

अभ्यासस्रोत – एम.एस.सी.आय.टी.चे पुस्तक, संगणक व माहिती तंत्रज्ञान हे अरिहंत प्रकाशनाचे पुस्तक.

८)  नियोजन – यामध्ये भारताच्या पंचवार्षकि योजना, राज्य व स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३वी व ७४वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था आणि तिच्यासमोरील आव्हानांचा समावेश होतो.

९)  शहरी व ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास – यामध्ये पायाभूत सुविधांची गरज व महत्त्व, सामाजिक व आíथक पायाभूत सुविधांचा विकास व वाढ, भारतातील पायाभूत सुविधांचे प्रश्न, धोरण व पर्याय तसेच यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रम या घटकांचा समावेश होतो.

१०)  आíथक सुधारणा व फायदे  – यामध्ये उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण या संकल्पना, त्यांचा अर्थ, व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आíथक सुधारणा, WTO, GST, VAT, विक्रीकर संबंधित कायदे व नियम या घटकांवर प्रश्नांचा अधिक भार असतो.

११)  आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ – या घटकांतर्गत भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार, त्याची दिशा, धोरण, निर्यात, विदेशी भांडवलाचा प्रवाह, रचना, जागतिक बँक यांच्यासंदर्भातील प्रश्नांवर अधिक भर असतो.

१२)  सार्वजनिक वित्त व्यवस्था – यामध्ये महसुलाची साधने, केंद्र व राज्यातील सार्वजनिक कर्जे, भारतातील करसुधारणा, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्‍‌र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा या घटकांवर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात.

अभ्यासस्रोत – वरील ८ ते १२ क्रमांकाच्या घटकांसाठी भारताची व महाराष्ट्राची आíथक पाहणी, भारतीय अर्थव्यवस्था हे दत्त व सुंदरम यांचे पुस्तक तसेच स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र भाग १ व भाग २ ही डॉ. किरण देसले यांची पुस्तके अभ्यासावीत.

विद्यार्थीमित्र-मैत्रिणींनो या लेखमालेतून आपण विक्रीकर निरीक्षक परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम आणि अभ्यासस्रोत व अभ्यासाची रणनीती पाहिली. यासंदर्भातील अधिक माहिती तुम्हाला www.mpsc.gov.in या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरही मिळेल. परीक्षेसाठी मन:पूर्वक शुभेच्छा!!!