दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक छोटय़ा-मोठय़ा अडचणींवर कल्पकतेने कशी मात करता येते, हे दाखवून देणाऱ्या व्यक्तींचा आणि त्यांच्या संशोधनाचा परिचय करून देणारं मासिक सदर-
डोक्यावरचे केस वाढले की पुरुष मंडळी सलूनमध्ये जातात आणि केस कापून घेतात. कारण प्रमाणापेक्षा अधिक वाढलेले केस त्रासदायक ठरतात. थोडक्यात, ‘केस कापणे’ ही एक गरजेची बाब आहे.
केस कापण्याचं काम साधंसुधं नाही. हे काम अतिशय कौशल्याने करावं लागतं. पण असं असलं तरी सलूनमध्ये केस कापून देणाऱ्या न्हाव्याला समाजात फारशी प्रतिष्ठा दिली जात असल्याचं आढळत नाही. न्हाव्याकडे केवळ केस कापण्याचं कौशल्यच नाही तर विज्ञानाचा वापर करून आपल्या कामात येणाऱ्या अडचणींवर मात करण्याचं म्हणजेच समस्या निराकरणाचंही कौशल्य असतं, याचा वस्तुपाठ सांगणारी ही शोधयात्रा..
ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातल्या मेरठ शहरापासून सुमारे १५ किलोमीटरवर असलेल्या हसनपूर कलान या गावात राहणाऱ्या महंमद इद्रीस याची. हसनपूर गावाचं वैशिष्टय़ असं की, या गावातले बहुतेक लोक सेना दलात किंवा पोलीस दलात रुजू झाले आहेत.
महंमद इद्रीस इयत्ता पाचवीपर्यंत शाळा शिकला आणि मग शाळा सोडून आपल्या कुटुंबात परंपरेने चालत आलेल्या केस कापण्याच्या व्यवसायात पडला. पण पुढे इद्रीसच्या काकांनी त्याला बाबुगढ इथे असलेल्या भारतीय सेनेच्या घोडय़ांच्या पागेत काम कर, असा सल्ला दिला. कारण तिथे त्याला जास्त कमाई मिळणार होती. काकांचा सल्ला इद्रीसने ऐकला आणि तो बाबुगढच्या घोडय़ांच्या पागेत घोडय़ांचे केस कापण्याच्या कामावर तो रुजू झाला.
बाबुगढ इथे असलेली घोडय़ांची पागा ही जगातल्या सर्वात जुन्या पागांपकी एक मानली जाते. भारतीय सेनेला डोंगर-दऱ्यांमधून सामानाची ने-आण करण्यासाठी, दुर्गम भागात गस्त घालण्यासाठी फिरताना आवश्यक असलेल्या घोडय़ांची पदास इथे केली जाते. दोन हजार एकरांपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या या पागेत घोडे, खेचर आणि गाढवं असे एकूण दोन हजारांहून अधिक प्राणी आहेत. या सगळ्या प्राण्यांच्या खाद्यापासून ते औषधोपचारापर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही एक सुसज्ज पागा आहे.
घोडय़ांच्या बाबतीत खाद्याइतकंच खराऱ्याला महत्त्व आहे. त्यांच्या त्वचेवरचे वाढलेले केस कापणे, तसेच त्वचेवर असलेला केरकचरा, कोंडा, घामाचा मळ काढण्यासाठी घोडय़ाला नियमितपणे खरारा करतात. खराऱ्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगल्या प्रकारे राखलं जातं आणि त्वचा तुकतुकीत राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, धापा न टाकणाऱ्या घोडय़ासारख्या प्राण्यांमध्ये शरीराच्या तापमानाच्या नियंत्रणाचं कार्य त्वचेमार्फत होत असतं. हे कार्य त्वचेतील स्वेद ग्रंथींमुळे येणाऱ्या घामाच्या बाष्पीभवनामुळे होतं. म्हणूनच घोडय़ासारख्या प्राण्यांची त्वचा तुकतुकीत असणं आवश्यक असतं.
तर घोडय़ांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कामासाठी इद्रीस बाबुगढच्या पागेत रुजू झाला. आपले केस कापण्यासाठी जे उपकरण सलूनमध्ये वापरलं जातं, तशाच प्रकारचं उपकरण घोडय़ाच्या त्वचेवरचे केस कापण्यासाठी वापरलं जातं. हे उपकरण विजेवर चालतं किंवा वीज वापराशिवाय यांत्रिक पद्धतीनेही उपयोगात आणलं जातं. वेगवेगळ्या कंपन्यांनी तयार केलेली अशा प्रकारची उपकरणं बाजारात उपलब्ध आहेत. इद्रीसने अशाच प्रकारची इतर कंपन्यांनी तयार केलेली उपकरणं वापरून घोडय़ांचे केस कापत होता. हे काम करत असतानाच इद्रीस बंद पडलेली उपकरणं दुरुस्तही करायला लागला. उपकरण दुरुस्ती करताना त्याला या उपकरणांच्या अंतर्गत रचनेचं ज्ञान झालं. या ज्ञानाचा उपयोग करून आपणही असं एखादं उपकरण तयार करावं, असं इद्रीसला वाटायला लागलं आणि त्या दृष्टीने त्याने प्रयत्न सुरू केले.
सुरुवातीला इद्रीसने इलेक्ट्रिक मोटरवर चालणारं उपकरण तयार केलं. पण हे उपकरण जास्त किमतीचं आणि विजेची गरज लागणारं असल्यामुळे खेडेगावांमधून वापरणं अडचणीचं होतं. मग इद्रीसने एक नामी शक्कल लढवली. त्याने सायकलच्या चाकाच्या गतीमुळे चालणारं एक उपकरण तयार केलं.
इद्रीसने सायकलच्या मागच्या चाकाला एक काढता-घालता येईल अशी चेन जोडली आणि सायकलच्या चाकाला दिलेली गती गिअर्सला मिळेल अशी व्यवस्था या चेनच्या मदतीने केली. गिअर्सची गती एका स्पीड केबलमार्फत केस कापू शकणाऱ्या शेव्हरमधल्या ब्लेड्सना दिली आहे. हे सगळं उपकरण सायकलच्या मागच्या चाकावर असलेल्या कॅरिअरवर बसवलं.
हे उपकरण हाताळायला अगदी सोपं आहे. स्टँड लावून एका जागी उभ्या केलेल्या सायकलवर बसून पायडल मारायचं. स्टँडवर उभ्या केलेल्या सायकलला पायडल मारलं की सायकलचं मागचं चाक जमिनीवर नव्हे तर हवेमध्ये अधांतरी फिरत राहतं. हे चाक गतिमान झालं की केस कापू शकणाऱ्या शेव्हरमधली ब्लेड्स गतिमान होतात आणि केस कापले जातात. शेव्हर हातात धरून घोडय़ाच्या त्वचेवरून फिरवला की आपोआप केस कापले जातात. हे उपकरण चालवायला कोणत्याही इंधनाची किंवा विजेची गरज लागत नाही.
फक्त हे उपकरण वापरण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते. दोनपकी एका व्यक्तीने सायकलवर बसून पायडल मारायचं आणि दुसऱ्या व्यक्तीने हातात शेव्हर धरून घोडय़ाच्या अंगावरून फिरवायचा.
घोडे आणि त्या प्रकारच्या इतर प्राण्यांसाठी म्हणजे गाढव, खेचर, उंट यांच्या अंगावर वाढलेले केस कापण्यासाठी हे उपकरण वापरलं जाऊ शकतं. इतकंच नव्हे तर मेंढय़ांच्या अंगावरची लोकर काढण्यासाठीही इद्रीसने तयार केलेल्या उपकरणाचा वापर केला जाऊ शकतो. या उपकरणाचं एकस्व इद्रीसच्या नावावर असलं तरी काही जणांनी इद्रीसने तयार केलेल्या उपकरणाची कॉपी करून तशाच प्रकारची काही उपकरणं बाजारात विक्रीस आणली आहेत.
इद्रीस त्याने तयार केलेलं एक उपकरण चार ते पाच हजार रुपयांना विकतो. अर्थात या किमतीमध्ये तो नवी कोरी सायकलसुद्धा देतो. सायकलवर बसवलेलं हे उपकरण आजपर्यंत अनेकांनी विकत घेतलं असून आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला आहे.
आता इद्रीस घोडय़ांना उपयुक्त असलेली उपकरणं तयार करतो. आपले आई-वडील, तीन भाऊ, बायको आणि दोन मुलांसह तो स्वत:च्या मालकीच्या घरात राहतो. घोडय़ांचे केस कापण्याचा तब्बल २० वर्षांचा अनुभव असलेला इद्रीस आता नवनवीन उपकरणं तयार करण्यात गढून गेलेला असतो.    
hemantlagvankar@gmail.com