ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी म्युझियम किंवा वस्तुसंग्रहालय, विज्ञान केंद्रे मदत करतात. विज्ञान केंद्रांमुळे सर्वसामान्य जनता विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्यातील प्रगतीबद्दल जाणती होते. संबंधित विषयाच्या माहितीत मोलाची भर घालणाऱ्या देशातील महत्त्वाच्या वस्तुसंग्रहालयांची ओळख करून देणारे मासिक सदर.
केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझिअम्सचा महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे कोलकात्याची ‘सायन्स सिटी’. हे देशातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र आहे. हे केंद्र १९९७ साली कोलकात्यात सुरू झाले. जनतेत वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विज्ञानाचा दैनंदिन जीवनात वापर करण्यासाठी लोकांना उद्युक्त करणे, विज्ञान-तंत्रज्ञानाचा उद्योग, मानव कल्याण, पर्यावरण रक्षण यांच्याशी परस्पर संबंध प्रस्थापित करणे हा या केंद्राच्या निर्मितीमागचा प्रमुख उद्देश आहे. या केंद्रातर्फे सामान्य जनतेत विज्ञान-तंत्रज्ञानासंबंधी जाण निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. त्या अंतर्गत देशातील शहरी, ग्रामीण, विद्यार्थी सर्वासाठी विज्ञानासंबंधी प्रदर्शने, परिसंवाद, व्याख्यानांचे आयोजन केले जाते.
या संस्थेतर्फे शालेय शिक्षणाला पूरक असे विज्ञानविषयक उपक्रम शाळा, महाविद्यालयांतून उपक्रम राबवले जातात. ज्यायोगे विद्यार्थ्यांचे विज्ञानविषयक औत्सुक्य आणि कल्पकता वाढीस लागते. त्याचप्रमाणे विज्ञान संग्रहालयांच्या उभारणीसाठी विद्यापीठे, तंत्रशिक्षण संस्था, शाळा, महाविद्यालये यांना सल्ला दिला जातो. तंत्र सहाय्य पुरवले जाते.
संस्थेतील प्रमुख आकर्षणे
अर्थ एक्स्प्लोरेशन हॉल : याअंतर्गत दोन मजली दालनात मध्यभागी एक विशाल गोल- पृथ्वीची प्रतिकृती म्हणून उभारला आहे. पृथ्वीच्या उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धावर असणारे वातावरण, जमीन, भौगोलिक रचना, त्यानुसार मनुष्यवस्तीत होणारे बदल, निसर्ग हे सर्व काही या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रदíशत केले आहे. यामुळे रंजकरीत्या पृथ्वीवर घडणाऱ्या दैनंदिन भौतिक घटनांमागील (दिवस-रात्र, ग्रहण, भरती-ओहोटी) यामागील कार्यकारणभाव समजणे सहज शक्य होते.
स्पेस थिएटर : येथे ‘स्पेस थिएटर’ व ‘मोशन सिम्युलेटर’ आहेत. त्याशिवाय अंतराळ विज्ञानासंबंधी खास करून भारताने अंतराळ विज्ञानात केलेल्या विविध मोहिमा, प्रयोग यांच्यशी संबंधित माहिती प्रदíशत केली आहे. मल्टी मीडिया प्रोजेक्शन तंत्रज्ञानाचा वापर करून सूर्यमाला, त्यातील ग्रह, त्यांचा पृथ्वीवर होणारा परिणाम या गोष्टी प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.
द पॅराडाइस ऑफ सायन्स इन अॅक्शन : विज्ञानातील चमत्कार जेव्हा प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडताना दिसतात, तेव्हा त्यामागील वैज्ञानिक सत्य मनाला अधिक पटते. विज्ञानातील अशा अनेक घटना, शोध यांची प्रात्यक्षिके या दालनात दर्शकांना पाहायला मिळतात.
लाइफ इन वॉटर : पाण्यातील जैवविविधता, त्यांच्या हालचाली, अन्न ग्रहणाच्या पद्धती हे सर्व अत्यंत नसíगक वातावरणात होताना पाहण्याची व अभ्यासण्याची संधी या दालनात मिळते.
इल्युजन्स : वैज्ञानिक संकल्पनांतून आभासांच्या निर्मितीचे प्रात्यक्षिक या दालनात अनुभवायला मिळते. गती, वेग या भौतिकी संकल्पना व आपल्या दृक् जाणिवा (व्हिज्युअल परसेप्शन) यांतून तयार होणारी अनेक आभासी चित्रे या दालनात पाहता येतात.
मेरिटाइम सेंटर : कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या सहाय्याने उभारलेले हे कायमस्वरूपी दुमजली दालन आहे. एका जहाजाच्या आकारात बांधलेले असून यात सामुद्री इतिहास, विविध बोटी आणि जहाजांच्या प्रतिकृती व माहिती, समुद्री जहाजे यांची माहिती मिळते.
इव्होल्युशन थीम पार्क : जगाच्या उत्पत्तीबद्दल नेहमीच शास्त्रज्ञांना आकर्षण वाटत आले आहे. या दालनात पृथ्वीच्या उत्पत्तीपासून निसर्गात, जैव संपत्तीत होणारी स्थित्यंतरे निरनिराळ्या प्रतीकृतींतून दाखवली आहेत. यात विविध सात भाग असून शेवटच्या भागात आधुनिक मानव संस्कृतीचे दर्शन घडते.
टाइम मशीन : ‘मोशन सिम्युलेटर’च्या या सफरीतून अंतराळ, ग्रह, सूर्यमाला यांचा काल्पनिक वैश्विक प्रवास दर्शकांना करता येतो.
विज्ञान केंद्रे किंवा विज्ञान वस्तुसंग्रहालये ही पर्यटन केंद्रे किंवा प्रेक्षणीय स्थळे आहेतच, पण त्याच बरोबरीने विद्यार्थी, संशोधक आणि सामान्य दर्शकांसाठी व्यक्तिमत्त्व विकासाची केंद्रेही आहेत.
geetazsoni@yahoo.co.in
पत्ता : जे. बी. एस. हल्दाने अव्हेन्यू, कोलकाता, प. बंगाल ७०००४६.
वेळ : सकाळी ९ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत
(होळीच्या सणाव्यतिरिक्त वर्षांचे सर्वच्या सर्व दिवस खुले.)
संकेतस्थळ : http://www.sciencecitykolkata.org.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2014 रोजी प्रकाशित
सायन्स सिटी, कोलकाता
ज्ञानाचा परीघ वाढविण्यासाठी म्युझियम किंवा वस्तुसंग्रहालय, विज्ञान केंद्रे मदत करतात. विज्ञान केंद्रांमुळे सर्वसामान्य जनता विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्यातील प्रगतीबद्दल जाणती होते.
First published on: 03-02-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Science city kolkata