शिक्षकांना सिद्ध करावी लागणार.. पात्रता!

पहिली ते आठवीचे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे यंदापासून राज्य सरकारने अनिवार्य केले आहे

पहिली ते आठवीचे शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे यंदापासून राज्य सरकारने अनिवार्य केले आहे. येत्या १५ डिसेंबरला होणाऱ्या या परीक्षेचे नेमके स्वरूप, अभ्यासक्रम आणि तयारी कशी कराल, यासंबंधीचे मार्गदर्शनपर दोन लेख.
राज्य सरकारने यंदापासून प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे (TET) बंधनकारक केले आहे. कार्यरत शिक्षकांना या परीक्षेतून सवलत देण्यात आली आहे. मात्र भविष्यात शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. येत्या १५ डिसेंबरला ही परीक्षा होईल.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी मान्यताप्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित कनिष्ठ प्राथमिक (पहिली ते पाचवी) व वरिष्ठ प्राथमिक (सहावी ते आठवी) शाळांमधील (पहिली ते आठवी) सर्व माध्यमांतील शिक्षक पदांकरिता ही परीक्षा आहे. केंद्र सरकारने यापूर्वीच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत  (CBSE) सुरू केली आहे. राज्यात या परीक्षेचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे (MSCE) करणार आहे.
परीक्षेविषयी..
पहिली ते पाचवी (पेपर १) आणि सहावी ते आठवी (पेपर २) अशा दोन गटांत परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे. पहिल्या पेपरमध्ये ६ ते ११ वर्षे वयोगटाच्या (इयत्ता पहिली ते पाचवी) तर दुसऱ्या पेपरमध्ये ११ ते १४ वष्रे वयोगटाच्या (इयत्ता सहावी ते आठवी) विद्यार्थ्यांच्या पाठय़क्रमासंबंधित प्रश्न विचारले जातील. या दोन्हीही प्रश्नपत्रिकांमध्ये बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (२० टक्के), प्रथमभाषा (२० टक्के) व द्वितीय भाषा (२० टक्के) अशा प्रकारे (६० टक्के) अभ्यासक्रम सर्व विषयांच्या शिक्षकांसाठी समान राहील. उर्वरित ४० टक्के भाग बदलता राहील. पहिल्या पेपरमध्ये गणित (२० टक्के) व परिसर अभ्यास (२० टक्के)  अशा रीतीने ४० टक्क्यांचे विभाजन राहील. दुसऱ्या पेपरमध्ये गणित व विज्ञान (४० टक्के) किंवा सामाजिकशास्त्रे (४० टक्के) यापकी एक विषय निवडता येईल.  
एकूण १५० गुणांच्या परिक्षेसाठी २ तास ३० मिनिटे वेळ देण्यात येईल.    
पाठय़क्रमाची व्याप्ती
१) बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र –
या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्रासंबंधी आणि विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्टय़े, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्टय़े यांवर आधारित प्रश्न, तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील.
या विषयाच्या पहिल्या पेपरसाठी अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्याचा पाठय़क्रम लागू राहील. दुसऱ्या पेपरसाठी प्रचलित बी.एड. अभ्यासक्रमातील भागसुद्धा लागू राहील.
२) प्रथम भाषा व द्वितीय भाषा –
या परीक्षेसाठी खालील गटानुसार विषय घेता येतील –
भाषा – १ –     मराठी    इंग्रजी    उर्दू
भाषा – २ –  इंग्रजी    मराठी मराठी किंवा इंग्रजी
३) गणित-
गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संबोध, तर्कशुद्धता, समस्या निराकरण व गणित विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दय़ांवर आधारित असतील.
४) परिसर अभ्यास –
परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरीकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयांतील मूलभूत संबोध आणि या विषयाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या मुद्दय़ांवर आधारित असतील.
परिसर अभ्यासाची व्याप्ती पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असतील. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२मध्ये इ. पहिली व दुसरीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. तिसरी ते पाचवीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २००४ मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठय़क्रम लागू राहील.
गणित व विज्ञान विषय गट –
गणित व विज्ञान विषय गटासाठी ६० गुण असून त्यापकी ३० गुण गणितासाठी व ३० गुण विज्ञानासाठी राहतील. या विषय गटातील प्रश्न हे विज्ञान व गणितातील मूलभूत संबोध, समस्या निराकरण क्षमता गणित व विज्ञानाचे अध्यापनशास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील.
सामाजिक शास्त्र विषय गट-
सामाजिकशास्त्रासाठी एकूण ६० गुणांचे ६० प्रश्न असतील. हे प्रश्न समाजशास्त्रातील संकल्पना, आशय, अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील.
उत्तीर्णतेचे निकष
या परीक्षेमध्ये किमान ६० टक्केगुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती/ जमाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल. उत्तीर्ण उमेदवारांना सरकारतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) प्रमाणपत्र देण्यात येईल. या प्रमाणपत्राची वैधता ते दिलेल्या दिनांकापासून सात वष्रे राहील. शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना गुणवत्ता पातळीत वाढ करण्यासाठी ही परीक्षा कितीही वेळा देता येईल. शिक्षक पात्रता परीक्षा (Teachers Eligibility Test) उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला थेट नोकरी मिळणार नाही किंवा नोकरीसाठी त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही.
संदर्भग्रंथ
या परीक्षेच्या तयारीसाठी संदर्भग्रंथ म्हणून प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम सहावी ते आठवी व पाठय़क्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठय़क्रम, संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेली प्रचलित पहिली ते बारावीची पाठय़पुस्तके, बी.एड्. अभ्यासक्रम व पाठय़क्रम इत्यादीचा वापर करता येईल. परीक्षेसंबंधी तपशीलवार माहितीकरिता http://www.mscepune.in व ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी http://www.mahatet.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.
एकविसाव्या शतकात मात्र सर्जनशीलता, नावीन्यता, आनंददायी शिक्षणावर भर दिला जात आहे. औद्योगिक अर्थव्यवस्थेपासून ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू झाली आहे. अध्ययन घडून आल्याशिवाय अध्यापन पूर्ण होऊ शकत नाही हा विचार रुजत आहे. औपचारिक अध्ययन पूर्ण झाल्यानंतर व्यक्ती स्वत:च्या पायावर उभा राहण्यास समर्थ व्हावी (Learning is a process which leads to earning) असे मानले जात आहे.
पारंपरिक शिक्षकाची जागा सर्जनशील शिक्षकांनी घ्यावी असे अपेक्षित आहे. ४+५ = ? असे पारंपरिक शिक्षक विचारतो, मात्र ९ हे उत्तर येण्यासाठी कोणत्या दोन संख्येची बेरीज करता येईल बरे? असे सर्जनशील शिक्षक विद्यार्थ्यांना विचारू शकतो. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी विचार करून वेगळे उत्तर देईल. एकापेक्षा अनेक योग्य उत्तरे निघतील. या प्रक्रियेत सर्व विद्यार्थी मनापासून सहभागी होतील. एखाद्या विद्यार्थ्यांने ४+५ = ५+४ असे सुचविल्यास ‘बेरजेची क्रमनिरपेक्षता’ विद्यार्थ्यांना सांगता येईल. यालाच व्हॅगोत्सकीच्या भाषेत सामंजस्यपूर्ण अध्ययन (Collaborative learning) म्हणतात.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वाचे साधन आहे. या सामाजिक परिवर्तनाचा एक शिक्षक म्हणून भाग होऊ इच्छिणाऱ्या सर्वाना परीक्षेसाठी शुभेच्छा!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Teachers have to prove eligibility