डिसेंबर महिना सुरू झाला की शाळा-महाविद्यालयांमध्ये ‘स्पोर्टस्’ सुरू होतात. अनेक विद्यार्थी या स्पर्धामध्ये हिरीरीने भाग घेतात. काही विद्यार्थी तर या ‘स्पोर्टस् डे’ची अक्षरश: वाट बघत असतात. वेगवेगळ्या मदानी खेळांच्या स्पर्धामध्ये भाग घेऊन आपलं त्या खेळातलं कौशल्य सिद्ध करण्याची, स्वत:ची क्षमता अजमावण्याची ही एक संधी असते. हे खेळ म्हणजे प्रकल्प करण्यासाठीसुद्धा एक चांगला विषय आहे. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून खेळांविषयी प्रकल्प करता येतील.
कोणत्याही मदानी खेळाला विशिष्ट आकार असलेलं आणि ठरावीक मापाचं मदान वापरलं जातं. या मदानाची काही वैशिष्टय़े असतात. उदाहरणार्थ, क्रिकेटच्या मदानाचा आकार ठरावीक मर्यादेमध्ये लहान-मोठा असू शकतो. ऑस्ट्रेलियामध्ये असलेली क्रिकेटची बहुतेक मदानं ही भारतातल्या मदानांपेक्षा मोठी आहेत. पण असं असलं तरी, खेळपट्टीची लांबी रुंदी ही सगळ्या मदानांवर सारखीच असते.
बॅडिमटन, टेनिस, कबड्डी यांसारख्या खेळांमध्ये मदानाची वेगवेगळ्या भागांमध्ये विभागणी केलेली असते. या प्रकल्पात वेगवेगळ्या मदानी खेळांची यादी तयार करून त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मदानांचा आकार, मदानाचे मोजमाप, वैशिष्टय़े यांची नोंद करा.
कबड्डी, कुस्ती यांसारख्या काही मदानी खेळांचा अपवाद सोडला तर प्रत्येक मदानी खेळाला काही ना काहीतरी साहित्य लागतंच. खेळासाठी वापरलं जाणारं साहित्यसुद्धा प्रमाणित असतं, त्यांचा आकार, वजन ठरावीक असतं. उदाहरणार्थ, क्रिकेटसाठी वापरली जाणारी बॅट, बॉल यांचं वजन, आकाराची मापं ठरावीक असतात. स्टंप्सची उंची ठरलेली असते. बॅडिमटनसाठी वापरल्या जाणाऱ्या शटल कॉकची लांबी, घेर, वजन ठरावीक असतं. त्याचप्रमाणे बास्केटबॉल, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल या खेळांसाठी वापरण्यात येणाऱ्या चेंडूंमध्ये फरक असतो. प्रत्येक खेळासाठी लागणाऱ्या साहित्याची नोंद करून त्यांच्या आकाराची मोजमापं घ्या आणि सोबतच्या तक्त्यामध्ये नोंद करा. खेळासाठी वापरलं जाणारं हे साहित्य तयार करण्यासाठी विशिष्ट कच्चा माल वापरला जातो. हा कच्चा माल कोणता, याची नोंद करा. शटल कॉकचंच उदाहरण घ्यायचं झालं तर विशिष्ट प्रकारच्या बदकाची किंवा हंसाची सोळा पिसं शटल कॉकमध्ये वापरलेली असतात.
खेळासाठी आवश्यक असणारं प्रमाणित साहित्य तुमच्या परिसरात कुठे मिळतं आणि या साहित्याची अंदाजे किंमत किती आहे, याचंही सर्वेक्षण करा.
प्रत्येक खेळामध्ये काही विशिष्ट नोंदी तुम्हाला करता येतील. उदाहरणार्थ, रॅकेटस् वापरून खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये बॅडिमटन हा सर्वात वेगवान खेळ आहे. बॅडिमटनमधील शटल कॉकचा वेग ताशी २०० मल इतका असू शकतो.  
क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, टेनिस अशा मोजक्या मदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंच्या संदर्भात आपल्याला माहिती असते. पण, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी अशा खेळांमध्ये विशेष नपुण्य असलेल्या खेळाडूंची आपल्याला फारशी माहिती नसते. त्यामुळे प्रत्येक खेळामध्ये नपुण्य असलेल्या खेळाडूंची काही नावं शोधा. या खेळाडूंची छायाचित्रे जमवून त्यांच्याविषयी, खेळातील त्यांच्या कामगिरीविषयी माहिती जमा करा. खेळाडूंविषयीच्या या माहितीचा स्वतंत्र प्रकल्प होऊ शकतो.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोणत्याही खेळाचं एक तंत्र असतं. खेळ खेळताना हे तंत्र आत्मसात करणं आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ, क्रिकेट खेळताना बॅट कशी धरायची, बॉल कसा अडवायचा, झेल कसा घ्यायचा हे समजणं आणि त्याचा सराव करणं महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक खेळामध्ये अशी कोणकोणती तंत्रं आत्मसात करणं आवश्यक आहे, याचा वेध घ्या. त्याचबरोबर प्रत्येक खेळाला शास्त्रोक्त बठक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू स्विंग कसा होतो, चेंडूला फिरकी कशी द्यायची, फटका मारताना फलंदाज अचूक टायिमग कसं साधतो इत्यादी बाबींमागे विज्ञानातल्या अनेक मूलभूत गोष्टी कारणीभूत आहेत. प्रत्येक खेळामध्ये समाविष्ट असलेलं विज्ञान, वैज्ञानिक तत्त्वं यांचाही अभ्यास या प्रकल्पांतर्गत करता येईल. अ‍ॅथलेटिक्स प्रकारातले वेगवेगळे खेळ, क्रिकेट, टेनिस यांसारख्या खेळांमध्ये मदानांची स्थिती, हवामान, वाऱ्याचा वेग आणि दिशा इत्यादी बाबी महत्त्वपूर्ण ठरतात. यांचाही अभ्यास या प्रकल्पात केला जाऊ शकतो.
खेळामध्ये विजयी संघ कोणता, हे ठरविण्यासाठी विशिष्ट गुण पद्धत वापरली जाते. उदाहरणार्थ, फुटबॉल आणि हॉकीमध्ये किती गोल झाले, हे पाहिलं जात. क्रिकेटमध्ये धावा मोजल्या जातात. कबड्डीमध्ये किती लोण झाले, हे पाहिलं जातं. टेनिस, बॅडिमटन, व्हॉलीबॉल यांसारख्या खेळांमध्ये सेट पद्धती वापरली जाते. प्रत्येक खेळामध्ये गुणांकनाची काय पद्धत आहे, याचाही अभ्यास करा.  
प्रकल्पाच्या माध्यमातून खेळामागचं विज्ञान, हे खेळ खेळण्याचं तंत्र, खेळांसाठी लागणारं प्रमाणित साहित्य यांची ओळख करून घेतल्यास हे खेळ चांगल्या प्रकारे खेळता येतील, हे निश्चित.