चित्रपटसृष्टी वा फॅशन जगतात अधूनमधून कुठल्या तरी अभिनेत्री वा मॉडेलबाबत काही गैरप्रकार झाल्याची बातमी येते, कधी कधी हा प्रकार त्याच क्षेत्रातील एखाद्या मान्यवर, दिग्गज धेंडाकडून झालेला असतो. अशा वेळेस ही धक्कादायक- किळसवाणी बातमी वाचल्यावर सुशिक्षित-सुसंस्कृत कुटुंबात प्रश्न उभा राहतो, या मनोरंजन क्षेत्रात अशा प्रकारचे शोषण वा गैरप्रकार होत असतील तर तिथे आपल्या पाल्याला (खास करून मुलींना) करिअर करणे किती धोक्याचे असू शकते? त्याचा किती मोठा परिणाम काम करणाऱ्या मुलींच्या व्यक्तिगत, कौटुंबिक जीवनावर आणि करिअरवर होऊ शकतो? अशा बदमाश मंडळींना ओळखायचे तरी कसे? अशा बदमाश माणसांपासून आपल्या पाल्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा कसा? वगैरे. अर्थात अशा बातम्यांमुळे समंजस पालकांमध्ये चलबिचल निर्माण होणे, त्यांची साशंकता वाढणे अगदी स्वाभाविक आहे.
जगाच्या पाठीवर सर्वत्रच मनोरंजन उद्योग महिलांसाठी फारसा सुरक्षित नाही, असे गृहीतक आहे. म्हणून तर आपल्याकडे फार पूर्वी, विशेषत: नाटकासाठी, स्त्री-व्यक्तिरेखा साकारायला अभिनेत्री मिळत नसत, त्यामुळे देखण्या, रूपवान पुरुषांनाच स्त्रीरूपात भूमिका साकारावी लागे. बराच काळपर्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील स्त्रिया या क्षेत्रात येण्यापूर्वी बराच विचार करीत. हळूहळू ही परिस्थिती बदलली तरी बऱ्याचशा अभिनेत्री आपल्या आईचाच हात घट्टपणे पकडून या क्षेत्रात येऊ लागल्या. काळ आणखी पुढे सरकला आणि मग बऱ्याचशा अभिनेत्री स्वबळावर- स्वाभिमानाने येथे वावरू लागल्या. तरीदेखील मधूनच कुठून तरी फसवणूक अथवा विनयभंगाची बातमी येते. त्यात एखादी मॉडेल, आयटेम डान्सर, बी अथवा सी ग्रेड चित्रपटाची तारका, दूरचित्रवाणी वाहिनीवरील अभिनेत्री यांच्यापैकी, अनोळखी चेहरा अथवा ज्युनियर आर्टिस्ट यांपैकी कोणी तरी असते.
मनोरंजन उद्योगाच्या विस्तारासह इथे विविध प्रवृत्तींच्या व्यक्ती वाढल्या. चांगल्या-सद्वर्तनी व्यक्तींप्रमाणे दुष्ट, कावेबाज, स्त्रीलंपट व्यक्तींचीही रेलचेल वाढली. कुचाळक्यांनी भरलेल्या गॉसिप मॅगझिन्सनी वेगवेगळ्या समज-गैरसमजाला सतत पुष्टी दिली. त्याहीपेक्षा दुर्दैव म्हणजे काही अभिनेत्रींचा अपवाद करता, बऱ्याच जणींना काही तरी तडजोड केल्यानेच, या क्षेत्रात पाय रोवता आले अथवा येतात, असाही एक समज प्रचलित आहे आणि अशा समजातूनच येथे काही जणींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष, कधी उघड, तर कधी छुपे शोषण होते, असे मानले जाते. यातील एखादीच धाडस दाखवून आपल्यावरील अत्याचाराविरोधात आवाज उठवते, बऱ्याच जणी नाइलाजास्तव अथवा बदनामीच्या भीतीने तर काही जणी या घटनेचाही काही तरी फायदा होईल, अशी अपेक्षा बाळगत गप्प राहतात, असे म्हटले जाते.
या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अशा बनेल वा धोकादायक माणसांना ओळखायचे कसे, अर्थात टाळायचे कसे? अशा व्यक्ती इथे निर्मात्यापासून स्पॉटबॉयपर्यंत कोणत्याही रूपात भेटू शकतात. अमुकच प्रकारच्या व्यक्तीमध्ये राक्षस असतो, असे नाही. तरीही अर्थपुरवठादार-निर्माता-दिग्दर्शक या त्रिसूत्रीवर याबाबत जरा जास्तच संशय घेतला जातो. हे घटक काम व पैसा देणारे म्हणून ओळखले जातात. शोषण करणाऱ्यांमध्ये अशा व्यक्तींचा भरणा अधिक असू शकतो, असे मानले जाते. नवोदितांपासून नामवंतापर्यंत अनेक जण या घटकांपासून सांभाळून राहतात. बऱ्याचदा लैंगिक शोषणाच्या प्रकरणात यातीलच कोणाचे तरी नाव पुढे येते, काहींना शिक्षाही झाल्याची उदाहरणे आहेत.
आता यातील चांगले कोण व वाईट कोण हे कसे ओळखायचे? त्यांची ‘बुरी नजर’ टाळायची कशी?
यातील एक मार्ग म्हणजे, शक्यतो अपरिचित अशा निर्माता-दिग्दर्शक, निर्मिती संस्थेच्या कार्यालयात जाऊच नये. अथवा जाण्यापूर्वी त्यांनी यापूर्वी कोणत्या मालिका व चित्रपट निर्माण केले, त्यांचा दर्जा काय होता या गोष्टी जाणून घ्याव्यात. विशेषत: ‘सी ग्रेड’ चित्रपटाच्या निर्मात्याच्या कार्यालयातील कुबट वातावरण, तेथील कदापि पूर्ण न होणाऱ्या चित्रपटाची कामुक पोस्टर्स व अशा निर्मात्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वाह्य़ात बोलणे या साऱ्यांना लांब ठेवावे. तेथून शक्य तर लवकर निसटावे. काही जण खासगी पार्टीत आल्याने ओळखी वाढतील असा आग्रह धरतात, काही जण अंगचटीला येतात. या क्षेत्रात शारीर स्पर्श नियमित बाब आहे, असा त्यांचा पवित्रा असतो. हे किळसवाणे प्रकार पाहून सुशिक्षित युवती अशा वेळी बावरते. त्यातून निसटणे हेच उत्तम, असे समजून अनेक जणी माघारी परततात.
मनोरंजन उद्योगात दोन-चार टक्के प्रमाणात हे असले उद्योग चालतात. त्यातूनच मग एखादा शोषणाचा प्रकार घडतो आणि मग पुढचे काही दिवस ती चर्चा रंगते. मनोरंजन उद्योगात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी याचे भान राखून वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तींपासून चार हात दूर राहावे, हेच उत्तम.
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2012 रोजी प्रकाशित
संभाव्य धोका ओळखा
चित्रपटसृष्टी वा फॅशन जगतात अधूनमधून कुठल्या तरी अभिनेत्री वा मॉडेलबाबत काही गैरप्रकार झाल्याची बातमी येते, कधी कधी हा प्रकार त्याच क्षेत्रातील एखाद्या मान्यवर, दिग्गज धेंडाकडून झालेला असतो.

First published on: 06-11-2012 at 01:01 IST
मराठीतील सर्व करिअर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Understand dangerous situation