श्रीकांत जाधव
प्रस्तुत लेखामध्ये भूगोल या विषयाचा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास आणि जैवविविधता व पर्यावरण इत्यादी अभ्यासक्रमामध्ये नमूद विषयासोबत कसा संबंध येतो, याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहोत. त्यामुळे अभ्यासाचे नियोजन अधिक नेमकेपणे करता येऊन विषयाची सर्वागीण तयारी करता येईल. भूगोल या विषयातील पर्यावरण भूगोल हा विषय पेपर एकमध्ये अभ्यासताना मुख्यत्वे पर्यावरण परिस्थितीकी, प्रदेशनिहाय जैवविविधता तसेच याचे प्रमाण, त्याचबरोबर त्याच्याशी संबंधित संकल्पना, त्यांची वैशिष्टे, हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमानवाढ यासाठी कारणीभूत असणारे नैसर्गिक व मानवी घटक, वाढते शहरीकरण त्यामुळे पर्यावरणावर होणारा परिणाम, जंगलांचा होणारा ऱ्हास तसेच या कारणास्तव निर्माण झालेल्या समस्या आणि एकूणच याचा होणारा एकत्रित परिणाम या सर्व घटकांचा जगाच्या आणि भारताच्या भूगोलात विचार करावा लागतो आणि याच्याशी संबंधित माहिती सखोलपणे अभ्यासणे महत्त्वाचे ठरते. या घटकांचा अभ्यास कसा करावा याची माहिती आपण मागील लेखांमध्ये सविस्तरपणे घेतलेली आहे. सामान्य अध्ययनमधील बहुतांश घटकांचा परस्पर संबंध येतो, हे खालील प्रश्नांवरून लक्षात येते.
२०२१ मध्ये जगामध्ये खनिज तेलाच्या असमान वितरणाच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा. या प्रश्नाच्या उत्तरात बहुआयामी परिणामांची चर्चा करताना आर्थिक भूगोल या विषयाच्या अनुषंगाने करणे आवश्यक आहे.
२०२० मध्ये ‘हिमालयामधील हिमनद्यांचे वितळणे भारताच्या जल संसाधनावर कशाप्रकारे दूरगामी परिणाम करणारे आहे?’ असाही प्रश्न विचारण्यात आलेला होता. याच वर्षी भारतातील दशलक्ष शहरे यामध्ये येणारे मोठे महापूर ज्यामध्ये हैदराबाद आणि पुणे या स्मार्ट सिटींचाही समावेश आहे, यासाठीच्या कारणांचा वृत्तान्त द्या.
२०१९ मध्ये प्रादेशिक संसाधनावर आधारित उत्पादन उद्योग (manufacturing industries) रणनीती भारतात रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यास मदत करू शकते का?
२०१६च्या मुख्य परीक्षेत भारतातील प्रमुख शहरामधील पुरांची समस्या, भारतातील अंतर्गत जल वाहतूक व समस्या इत्यादीवर प्रश्न विचारण्यात आलेले होते.
२०१५च्या मुख्य परीक्षेत ‘‘मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही देशातील तीन महानगरे आहेत, पण यामध्ये दिल्लीतील वायू प्रदूषण हे मुंबई व कोलकाता या महानगरांच्या तुलनेत अधिक असून ती एक गंभीर समस्या आहे व हे असे का आहे. ‘भारतातील स्मार्ट शहरे, स्मार्ट खेडय़ांशिवाय शाश्वत होऊ शकत नाहीत’’.या विधानाची ग्रामीण व नागरी एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमी वर चर्चा करा.
२०१३ च्या मुख्य परीक्षेत ‘‘दक्षिण भारतातील राज्यांमध्ये नवीन साखर उद्योग स्थापन करण्याचा कल वाढत आहे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? समर्थनासह चर्चा करा.
वरीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आले होते. आता वरील प्रश्नांचा संबंध पेपर ३ इतर घटकांशी कसा आहे, तो पुढे पाहूया.
सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास व पर्यावरण या घटकासोबतचा संबंध
आर्थिक विकासाअंतर्गत देशाच्या विविध भागांत घेतली जाणारी महत्त्वाची पिके व पीक पद्धती, शेती उत्पादन, प्राणी संगोपन, अर्थशास्त्र, सिंचनाचे प्रकार आणि दळणवळण इत्यादी घटकांचा समावेश केलेला आहे. याकरिता आपल्याला आर्थिक भूगोल हा विषय अभ्यासावा लागतो आणि या विषयाच्या मूलभूत माहितीची तोंडओळख करून घ्यावी लागते. अर्थात, यामुळे या घटकाची परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी करण्यासाठी मदत होते. या घटकावर विचारण्यात येणारे प्रश्न हे बहुतांशी प्रमाणात भारताच्या आर्थिक भूगोलाशी संबंधित असतात व याच्या मूलभूत माहितीचा अभ्यास सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल विषयातील आर्थिक भूगोलामध्ये झालेला असतो. या माहितीचा वापर करून पेपर तीनमधील प्रश्न अधिक समर्पकरीत्या सोडवता येऊ शकतात. पण अशाप्रकारे माहितीचा वापर करताना पेपर तीनमध्ये आर्थिक पैलूंचा विशेषकरून अधिक विचार करणे अपेक्षित असते याचे भान ठेवावे लागेल. थोडक्यात, जरी मूलभूत माहितीची परिभाषा एकसारखी असली तरी उत्तरे लिहिताना पेपरनिहाय लागणारा दृष्टिकोन भिन्न-भिन्न असतो.
सध्या जागतिक तापमानवाढ, जैवविविधतेचा होणारा ऱ्हास, शहरीकरण, उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये होणारी घट, सतत वाढणारी लोकसंख्या आणि यासाठी कारणीभूत असणारे नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटक यासंबंधी सतत काही घटना घडत असतात. ही माहिती आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने नोट्स स्वरूपात संकलित करावी लागते. या माहितीचा उपयोग सामान्य अध्ययनमधील संबंधित विषयाचा सखोल आणि सर्वागीण पद्धतीने तयारी करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. या घटकाचा समावेश हा सामान्य अध्ययन पेपर तीनमधील – जैवविविधता आणि पर्यावरणअंतर्गत नैसर्गिक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन, पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन या घटकांच्या अभ्यासक्रमामध्ये केलेला आहे. हे घटक पर्यावरण भूगोल विषयाशी संबंधित आहेत, पण पेपर तीनमध्ये या घटकाचा अभ्यास करताना मुख्यत्वे मानवी हस्तक्षेपामुळे या गोष्टीवर कोणते परिणाम झालेले आहेत. तसेच यासाठी कोणत्या उपाययोजना आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर केलेल्या आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने भारत सरकारने आखलेल्या उपाययोजना, नैसर्गिक संवर्धन, पर्यावरणीय प्रदूषण आणि अध:पतन यासाठी पारित करण्यात आलेले महत्त्वाचे कायदे त्याचबरोबर यात भारताची नेमकी भूमिका काय आहे, याची सविस्तर माहिती ठेवावी लागते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी केल्या गेलेल्या उपाययोजना आणि कायदे माहिती असणे गरजेचे आहे. या माहितीसाठी वर्तमानपत्रे, मासिके तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर होणाऱ्या योजना, कायदे यासारख्या स्रोतांचा उपयोग करता येऊ शकेल. या घटकाचा पारंपरिक अभ्यास पर्यावरण भूगोलामध्ये झाल्यामुळे या विषयाशी संबंधित चालू घडमोडींची समज अधिक योग्यरीत्या करता येते.
उपरोक्त नमूद केलेल्या घटकांसाठी सामान्य अध्ययनातील पेपरनुसार जो दृष्टिकोन वापरावा लागतो त्यामध्ये भिन्नता येते. त्यामुळे सर्वप्रथम प्राथमिक माहितीचा अभ्यास करून घ्यावा लागतो. त्यासाठी आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल हे विषय अभ्यासावे लागतात. त्याचबरोबर सामान्य अध्ययन पेपर तीनमधील उपरोक्त नमूद घटकांवर विचारण्यात येणारे प्रश्न हे विषयाच्या पारंपरिक ज्ञानापेक्षा चालू घडामोडींशी अधिक संबंधित असतात. असे असले तरी विषयाच्या पारंपरिक ज्ञानाची सखोल माहिती असल्याशिवाय प्रश्नांची उत्तरे प्रभावीपणे लिहिता येत नाहीत. सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल या विषयामुळे पर्यावरण आणि आर्थिक भूगोलाच्या मूलभूत माहितीचा अभ्यास झालेला असल्यामुळे संबंधित घटकाच्या चालू घडामोडींचा समावेश करून सर्वागीण पद्धतीने परीक्षाभिमुख तयारी करता येऊ शकते.

Loksatta UPSC Key
यूपीएससी सूत्र : भारतातील वणव्यांची समस्या अन् रस्त्यांवरचे खड्डे भरणारे ‘सेल्फ हीलिंग’ तंत्रज्ञान, वाचा सविस्तर…
inheritance tax
यूपीएससी सूत्र : वारसा करावरील वाद अन् शेंगन व्हिसाच्या नियमांमधील बदल, वाचा सविस्तर…
upsc exam preparation guidance
UPSC ची तयारी : अर्थशास्त्र: आर्थिक एकात्मता
Loksatta kutuhal Artificial intelligence that avoids potholes
कुतूहल: खड्डे चुकवणारी कृत्रिम बुद्धिमत्ता!