इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. हा विषय सोपा करून अभ्यासायचा असेल तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे ठरते.
सामान्य विज्ञान हा घटक योग्य पद्धतीने विश्लेषण करून तयारी केली तर कोणत्याही शाखेच्या उमेदवारांना हमखास गुण मिळवून देणारा आहे. पण योग्य अॅप्रोच नसेल तर विज्ञानाची पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठीसुद्धा हा विषय थोडा अवघडच ठरतो. इतर पारंपरिक विषयाच्या तुलनेत विज्ञान या विषयाची प्रश्न विचारण्याची पद्धती, प्रश्नांचा दर्जा यामध्ये एक प्रकारचे सातत्य असल्याने प्रश्नांचा पॅटर्न आणि अपेक्षित प्रश्न शोधणे तुलनेने सोपे असते. हा विषय सोपा करून अभ्यासायचा असेल तर मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अत्यंत महत्त्वाचे ठरते. गट क सेवा मुख्य परीक्षा सन २०२३ च्या प्रश्नपत्रिकेमधील सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, प्राणिशास्त्र आणि वनस्पती शास्त्र या उपघटकावरील प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
● या उपघटकातील प्रत्येक विषयावर तीन असे एकूण १२ प्रश्न विचारण्यात आलेले दिसतात.
● बहुविधानी प्रश्नांची संख्या लक्षणीय आहे. पण सगळ्या विषयांमध्ये मूलभूत आणि अतथ्यात्मक मुद्यांवर भर दिलेला दिसून येतो.
● भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्रामध्ये समीकरणे विचारण्यात आलेली नाहीत. पण येत्या परीक्षेत सोप्या सरळ समीकरणांची अपेक्षा करता येईल.
वरील विश्लेषणाच्या आधारे तयारी पुढीलप्रमाणे करता येईल.
भौतिक शास्त्र
● बल, दाब, कार्य, उर्जा, शक्ती, उष्णता, तापमान, पदार्थाचे अवस्थांतर, मापन पध्दती (राशी व एकके) हे लहान घटक वस्तुनिष्ठ अभ्यासाठी सोपे ठरतात. या घटकांच्या नोट्स ढोबळ मुद्यांच्या स्वरुपात पुरेशा ठरतात.
● प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्याुत, चुंबकत्व, गती व गतिविषयक समीकरणे हे मोठे व महत्त्वाचे घटक आहेत. यांवर थिअरी, समीकरणे आणि उपयोजित असे सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जाउ शकतात. त्यामुळे या मुद्यांच्या तयारीसाठी संज्ञा आणि संकल्पनांचे आकलन महत्वाचे आहे.
● आधी लहान घटकांमधील वस्तुनिष्ठ बाबी व त्यांच्या संकल्पना व्यवस्थित पाठ कराव्यात. त्यांचा मोठया घटकांचा अभ्यास करताना प्रत्येक वेळी उपयोग होतो.
रसायन शास्त्र
● पुढील मुद्द्यांचा त्याच क्रमाने अभ्यास केल्यास त्यांच्यामध्ये असलेल्या परस्पर संबंधांमुळे विषय समजून घेणे आणि लक्षात राहणे सोपे होते. – द्रव्य, त्यांचे स्वरुप व त्यांच्या अवस्था, मूलद्रव्ये आणि त्यांची वैशिष्ट्ये, अणूंची संरचना व त्याविषयी विविध शास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत, अणूंची मांडणी करण्यासाठी बनविलेली आवर्तसारणी व तिच्यामध्ये होत गेलेले बदल, आधुनिक आवर्तसारणी व तिची ठळक वैशिष्ट्ये, काही महत्त्वाच्या मूलद्रव्यांच्या संज्ञा, धातू, अधातू, धातू सदृश धातुके, संयुगे व त्यांची निर्मिती, कार्बनी व अकार्बनी संयुगे, आम्ल, आम्लारी व क्षार तसेच त्यांच्यामधील प्राथमिक अभिक्रिया, मिश्रण व त्यांची निर्मिती – यासाठी राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची विज्ञान विषयाची जुनी तसेच नवी पुस्तके जास्त उपयोगी ठरतील.
● प्राथमिक स्वरुपाच्या अभिक्रीया विचारलेल्या असल्यामुळे हुकमी गुण मिळू शकतात. त्यामुळे अशा अभिक्रिया अभ्यासणे फायद्याचे आहे.
● प्रकाश, ध्वनी, भिंग, धाराविद्याुत, बल, दाब, कार्य, ऊर्जा, शक्ती या घटकांवर गणिते विचारण्यात येतात. मूलभूत संकल्पना व्यवस्थित समजल्या असतील तर ही गणिते कमी वेळात सोडविता येतात. सरावासाठी पाठयपुस्तकामधील उदाहरणे सोडविणे पुरेसे ठरते.
वनस्पती व प्राणिशास्त्र
● वर्गीकरणाच्या पद्धती व संबंधित शास्त्रज्ञ, विविध संच व विभाग व त्यातील प्राणी/वनस्पती व त्यांची वैशिष्ट्ये हा अभ्यास टेबलमध्ये करावा.
● अवयव संस्थांमधील वस्तुनिष्ठ बाबींवरच लक्ष द्यावे. प्रत्येक संस्थेवर किमान १० प्रश्न स्वत: तयार करावेत.
● विविध सूक्ष्मजीव, त्यांचे वर्गीकरण, महत्वाची वैशिष्ट्ये, त्यांपासून होणारे फायदे-तोटे यांचा एक तक्ता करावा.
● आरोग्य, रोग निवारण व पोषण या घटकाचा अभ्यासक्रमामध्ये उल्लेख नाही आणि त्यावर प्रश्नही विचारलेला दिसू येत नाही. पण वनस्पती आणि मानव यांच्या बाबतीत रोग, पोषण इत्यादी मुद्यांचा अभ्यास आवश्यक आहे. यामध्ये पुढील मुद्यांच्या आधारे तक्ता बनवून अभ्यास केल्यास सगळ्या संबंधित गोष्टी लक्षात ठेवणे सोपे आणि सोयीचे होते – रोगांचे प्रकार- रोगांची लक्षणे, कारणीभूत घटक, स्राोत, प्रसाराचे माध्यम, बाधित होणारे अवयव, उपचार पद्धती.
● पोषणद्रव्ये : त्यांचे महत्त्वाचे घटक, कमतरता व आधिक्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. मुद्द्यांच्या आधारे अभ्यास करावा.
विज्ञानमधील मूलभूत संकल्पना, त्यांचे निष्कर्ष सहजासहजी बदलत नाहीत म्हणून काही नवे संशोधन सोडल्यास अभ्यासक्रमामध्ये दिले गेलेल सैध्दांतिक विज्ञान योग्य रितीने समजून घेतले तर इतर विषयांपेक्षा जास्त आत्मविश्वास या घटकाबाबत येतो. म्हणूनच या घटकाची तयारी करताना पाठांतराऐवजी संकल्पना समजून घेण्यावर भर द्यायला हवा. त्याच बरोबर विज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान क्षेत्रातील नवे शोध व चर्चेतील संशोधने या मुद्द्यांबाबत अद्यायावत माहिती असायला हवी.
steelframe.india@gmail.com