गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ मध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाच्या आधारे रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफी व जीआयएस या घटकाची तयारी कशी करावी ते या लेखामध्ये पाहू.
मागील वर्षीच्या प्रश्नविश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात येतात :
या घटकावर एकूण चार प्रश्न विचारलेले आहेत.
● तंत्रज्ञानाच्या उपयोजन आणि मूलभूत तांत्रिक मुद्द्यांचा प्रश्नांमध्ये समावेश आहे. त्यामुळे काहीशा कठीण वाटणाऱ्या या मुद्द्यांच्या तांत्रिक व मूलभूत बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
● पारंपरिक मुद्दे आणि चालू घडामोडींवरही प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तथ्यात्मक मुद्दे अभ्यासून काही गुणांची तजवीज सहजपणे होऊ शकते.
● या उपघटकाचा सविस्तर अभ्यासक्रम देण्यात आलेला नाही. त्यामुळे तयारीसाठी इतर ज्या परीक्षांमध्ये हे उपघटक समाविष्ट आहेत त्यांचा संदर्भ आणि विश्लेषण करून अभ्यासासाठीचे मुद्दे ठरवून घेणे आवश्यक आहे. रिमोट सेन्सिंग हा घटक राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर एकमधील भूगोल घटकामध्ये आणि सामान्य अध्ययन पेपर चारच्या विज्ञान तंत्रज्ञान घटकामध्ये समाविष्ट आहे आणि त्याचा सविस्तर अभ्यासक्रमही देण्यात आला आहे. या संदर्भाने गट क सेवा परीक्षेमध्ये या घटकासाठी अपेक्षित मुद्दे आणि त्यांची तयारी कशी करावी ते पाहू. या घटकाचा संभाव्य अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहे:
● रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे
मूलभूत संकल्पना, रिमोट सेन्सिंगची प्रक्रिया, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, वातावरणासह आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा परस्पर क्रिया (माती, पाणी, वनस्पती), भारतीय उपग्रह आणि सेन्सर वैशिष्ट्ये, नकाशा रिझोल्युशन, प्रतिमा आणि असत्य रंग संयुक्त, निष्क्रीय व सक्रीय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग, मल्टी स्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग, दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक, डेटा व माहिती, रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन, रिमोट सेन्सिंग फायदे व मर्यादा,
● सुदूरसंवेदनाचे उपयोजन
जीआयएस आणि त्याचे उपयोजन उदा.- अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा, व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गिका जाळे, भूभाग माहिती प्रणाली.
● एरियल फोटोग्राफी
हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर, कॅमेराचे प्रकार आणि अनुप्रयोग, त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रिझोल्युशन, व्याख्या आणि नकाशा स्केल, आच्छादित स्टिरीओ फोटोग्राफी
● जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग
परिचय, घटक, भूस्थानिक डेटा स्थानिक आणि गुणधर्म डेटा, समन्वय प्रणाली, नकाशा अंदाज आणि प्रकार, रास्टर डेटा आणि माडेल, वेक्टर डेटा आणि माडेल, जीआयएस कार्ये इनपुट कुशलता, व्यवस्थापन, क्वेरी विश्लेषण, व्हिज्युअलायझेशन, जमीन वापर विश्लेषण, डिजिटल एलेल्व्हेशन मॉडेल, त्रिकोणाबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे कार्य
या अभ्यासक्रमाच्या आणि प्रश्न विश्लेषणाच्या आधारे तयारी पुढीलप्रमाणे करता येईल:
● रिमोट सेन्सिंगची मूलभूत तत्वे/संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर यामध्ये समाविष्ट प्रक्रिया समजून घ्याव्यात.
● इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व त्यातील किरणांची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत. यातील किरणांच्या परावर्तन आणि अपवर्तन इत्यादीच्या सहाय्याने नकाशा तयार करण्यातील संकल्पना समजून घ्याव्यात.
● माती, पाणी, वनस्पती या घटकांच्या वातावरणाबरोबर आणि पृथ्वीच्या पृष्ठभागाबरोबर ऊर्जा परस्पर क्रिया होतात त्या समजून घ्याव्यात. या परस्पर क्रियेमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर होणारे परिणाम/ बदल यांचा वापर करून नकाशा कशा प्रकारे तयार केला जातो त्याची तत्त्वे समजून घ्यावीत.
● नकाशा रिझोल्युशनचे प्रकार माहीत करून घ्यावेत. स्थानिक, वर्णक्रमीय आणि कालिक ( spatial, spectral and temporal) नकाशे आणि त्यातील घटक समजून घ्यावेत.
● डेटा व माहितीचे प्रकार, रीमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन करण्याचे विविध मार्ग व माध्यमे यांतील वैज्ञानिक तत्त्वे व तंत्रज्ञान समजून घ्यावे.
● रिमोट सेन्सिंग फायदे व मर्यादा या मुद्द्याचा बारकाईने अभ्यास आवश्यक आहे.
● अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा, व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गिका जाळे, भूभाग माहिती प्रणाली या बाबींचा दैनंदिन जीवनावर परिणाम होत असला तरी तो प्रत्यक्षात जाणवत नाही. या सर्व बाबींमध्ये सुदूर संवेदन आणि जीआयएस या तंत्रज्ञानाचा नेमका कशा प्रकारे वापर होतो ते समजून घ्यायला हवे.
● रिमोट सेन्सिंग व एरियलफोटोग्राफीमधील प्रक्रिया आणि त्यामध्ये समाविष्ट तांत्रिक मुद्दे व संकल्पना यांचा अभ्यास करताना संकल्पनेचे मूलभूत तत्व/तंत्रज्ञान, त्यांमधील घटक, त्यांचे प्रकार व त्यांमधील तुलना, त्यांचा अपेक्षित प्रभाव/परिणाम अणि त्यांचे उपयोजन/अनुप्रयोग/वापर असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
● जीआयएस आणि त्याचे अनुप्रयोग हा मुद्दा अभ्यासताना त्यामधील समाविष्ट सर्व तांत्रिक घटकांमागील मूलभूत तंत्रज्ञान, संबंधित घटकाचे असल्यास प्रकार, त्यामधील संज्ञा व संकल्पना, त्यांचे उपयोजन आणि दैनंदीन जीवनातील वापर असे मुद्दे लक्षात घ्यावेत.
● नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडविण्यासाठी जीआयएसचे कार्य अभ्यासताना त्या त्या क्षेत्रातील गरजा समजून घेऊन मग त्यांच्यासाठी जीआयएसच्या वापर कशा प्रकारे करण्यात येतो हे समजून घ्यावे.
steelframe.india@gmailcom