विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर ४ म्हणजेच ‘नीतिशास्त्र, सचोटी आणि नैसर्गिक क्षमता’ अर्थात एथिक्सचा पेपर होय. या पेपरचे स्वरूप, तयारी आणि त्यासाठी लागणारी आवश्यक कौशल्ये कशी विकसित करावी, याबाबची माहिती आपण आजपासून पुढील काही लेखांमध्ये घेणार आहोत.

स्पर्धा परीक्षांच्या तयारीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आयोगाची ठरावीक विषयाला धरून काय मागणी आहे, हे नीट समजून घेणे. ही मागणी विषयाबद्दल तसेच परीक्षा पद्धतीबद्दल असू शकते. ठरावीक विषयाची परीक्षा घेण्यामागचा हेतू, विचारल्या जाणार्या प्रश्नांचा साचा, या सर्वांचा नागरी सेवांशी असणारा संबंध हे सर्व लक्षात घेतल्यास विषयाची तयारी करणे सोपे जाऊ शकते. हे मुख्य परीक्षेतील सर्वच विषयांसाठी लागू आहे.

अर्थातच, एथिक्सच्या पेपरसाठी देखील अशा विश्लेषणाची खूप मदत होते. याचाच एक भाग म्हणजे, आयोगाने मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेणे, तसेच एकंदर प्रश्नपत्रिकेच्या बदलत्या स्वरूपाचे विश्लेषण करत राहणे. यामुळे अनेक प्रश्नांचा खुलासा होतो-

हेही वाचा >>> नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती

(१) कोणत्या संकल्पनांवर प्रश्न विचारताना भर दिला गेला आहे?

(२) प्रश्न विचारत असताना, चालू घडामोडी या संकल्पनांशी कशा जोडल्या जातात?

(३) पुन्हा पुन्हा विचारले जाणारे प्रश्न प्रकार आणि घटक कोणते?

(४) तीन तासांत कराव्या लागणार्या लिखाणाचा एकूण आवाका किती?

(५) येणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर पेपरचे बदलत जाणारे काठिण्य.

वरील बाबींचा आढावा घेतल्याशिवाय तयारीला नेमकी दिशा मिळत नाही. एथिक्ससारखा विषय तुलनेने नवीन असल्याने प्रश्नांचा विषय आणि स्वरूप जरी लक्षात आले, तरीही नेमके लिखाण कसे करायचे याबद्दल उमेदवारांच्या मनात अनेकदा संभ्रम दिसून येतो. तसेच, इतर सामान्य अध्ययनांच्या पेपरच्या तुलनेत एथिक्स हा घटक नावीन्यपूर्ण असल्याने, त्याचे वेगळे दडपणही बघायला मिळते.

या सगळ्यांचा सामना करता येण्यासाठी, वर म्हटल्याप्रमाणे प्रामाणिकपणे विषयाचा आवाका आणि मागणी समजून घेणे आवश्यक आहे.

सामान्य अध्ययन – IV ची तयारी कशी कराल? हा अभ्यासक्रम दर्शविणारा सोबतचा तक्ता पाहिल्यास विद्यार्थ्यांच्या असे लक्षात येईल की, सामान्य अध्ययन – ४ या विषयाचा अभ्यासक्रम हा फक्त नैतिक तत्त्वज्ञान म्हणजेच इथिक्स या विषयापुरता मर्यादित नाही. तर त्यामध्ये सामाजिक मानसशास्त्र आणि लोक प्रशासन अशाही घटकांचा समावेश होतो. म्हणजेच हा पेपर आंतरविद्याशाखीय आहे आणि प्रत्येक शाखेची एखाद्या घटनेकडे वा मानवी वर्तनाकडे बघण्याची आपापली पद्धत आहे. हे लक्षात ठेवूनच या विषयांची तयारी करावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप विशद करणारा तक्ता पाहिल्यास असे लक्षात येईल की, प्रश्नांचे स्वरूप हे केवळ सैद्धांतिक (Theoretical) नसून ते उपयोजनात्मक (Applied) आहे. म्हणजेच विषयाचा भाग म्हणून शिकत असलेल्या संकल्पनांचे, सिद्धांतांचे आणि विचारवंतांच्या विचारांचे प्रत्यक्ष मानवी जीवनात, शासनाच्या आणि समाजाच्या निर्णयांमध्ये कुठे प्रत्यंतर पहावयास मिळते वा कुठे उपयोजन करता येते वा येईल याचा सतत विचार करणे अपेक्षित आहे. पुढील लेखांपासून आपण मूळ विषयाकडे वळणार आहोत.