आपण २०२५ च्या यूपीएससी मुख्य परीक्षेच्या जीएस ४ म्हणजेच ‘नीतिशास्त्र’ या पेपरमधील प्रश्न समजून घेणार आहोत. या लेखात आपण केस स्टडी ही संकल्पना समजून घेऊ.

या पेपरच्या सेक्शन ‘ब’ मध्ये ६ केस स्टडी विचारल्या जातात. त्यातील पहिली केस स्टडी आपण पाहूया –

नोट : यूपीएससी मुख्य परीक्षेतील प्रश्न हे इंग्रजी व हिन्दी भाषेत असतात. तुम्ही मुख्य परीक्षा इंग्रजीतून वा मराठीतून देऊ शकता. इथे आपण प्रश्न मराठीतून बघूया.

● विजय गेल्या दोन वर्षांपासून देशातील उत्तरी भागातील डोंगराळ जिल्ह्याचे उपायुक्त होते. ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडला आणि त्यानंतर जिल्ह्याच्या वरच्या भागात ढगफुटी झाली. संपूर्ण राज्यात विशेषत: प्रभावित जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले. संपूर्ण रस्ते नेटवर्क आणि दूरसंचार विस्कळीत झाले आणि इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत आणि त्यांना उघड्यावर राहण्यास भाग पाडले गेले आहे. २०० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत आणि सुमारे ५००० गंभीर जखमी झाले आहेत.

विजय यांच्या नेतृत्वाखालील नागरी प्रशासन सक्रिय झाले आणि त्यांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले. बेघर आणि जखमींना निवारा आणि वैद्याकीय सुविधा देण्यासाठी तात्पुरते निवारा छावण्या आणि रुग्णालये स्थापन करण्यात आली. दुर्गम भागातील आजारी आणि वृद्धांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्यात आल्या. विजयला केरळमधील त्याच्या गावी संदेश मिळाला की त्याची आई गंभीर आजारी आहे. दोन दिवसांनी विजयला दुर्दैवी संदेश मिळाला की त्याच्या आईचे निधन झाले आहे.

विजयला अमेरिकेची नागरिक असलेली एक मोठी बहीण वगळता त्याचा जवळचा नातेवाईक नाही. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच राहत होता. दरम्यान, पाच दिवसांच्या अंतरानंतर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे बाधित जिल्ह्यातील परिस्थिती आणखी बिकट झाली. त्याच वेळी, त्याच्या गावी त्याच्या मोबाईलवर सतत संदेश येत होते की त्याच्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा.

(अ) विजयकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

(ब) विजयला कोणत्या नैतिक दुविधांचा सामना करावा लागत आहे?

(क) विजयने ओळखलेल्या या प्रत्येक पर्यायाचे गंभीरपणे मूल्यांकन आणि परीक्षण करा.

(ड) विजयसाठी कोणता पर्याय सर्वात योग्य असेल असे तुम्हाला वाटते?

(२५० शब्दांत उत्तर द्या) २० गुण

अ) विजयसमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत?

● तातडीने केरळला जाणे: विजय आपल्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी त्वरित आपल्या गावी रवाना होऊ शकतो. यामुळे त्याचे वैयक्तिक आणि कौटुंबिक कर्तव्य पूर्ण होईल.

● तिथेच थांबून बचाव कार्याचे नेतृत्व करणे : यामुळे गंभीर परिस्थितीत आपले व्यावसायिक कर्तव्य बजावू शकतो.

● तात्पुरती जबाबदारी सोपवून निघणे : एखाद्या वरिष्ठ सहकार्याला, जसे की अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवून थोड्या कालावधीसाठी जाऊ शकतो. यामुळे त्याचे तातडीचे वैयक्तिक कर्तव्य पार पाडता येईल आणि प्रशासकीय कामकाजही सुरळीत राहील. एखाद्या नातेवाईकाला किंवा समुदायाच्या सदस्याला अंत्यसंस्कार करण्यास सांगणे.

● रजा आणि तात्पुरती बदली मागणे : जेणेकरून त्याचे आईचे अंत्यसंस्कार व्यवस्थित पार पडतील आणि महत्त्वाच्या आपत्कालीन परिस्थितीत अडथळा येणार नाही.

ब) विजयसमोर कोणती नैतिक कोंडी आहे?

● शासकीय कर्तव्य विरुद्ध वैयक्तिक कर्तव्य

● उपयोगितावाद विरुद्ध कर्तव्यशास्त्र

● भावनिक विरुद्ध तर्कसंगत निवड

● कुटुंबाची जबाबदारी विरुद्ध सार्वजनिक जबाबदारी

● एक उदाहरण प्रस्थापित करणे

क) विजयने निवडलेल्या प्रत्येक पर्यायाचे गंभीर मूल्यांकन आणि परीक्षण करा.

● तातडीने केरळला जाणे

● मूल्यांकन : हे विजयला भावनिक आधार देईल आणि त्याच्या आईचा सन्मान करेल, त्याची महत्त्वपूर्ण वैयक्तिक आणि सांस्कृतिक जबाबदारी पूर्ण करेल. तथापि, यामुळे गंभीर परिस्थितीत कर्तव्यात कसूर होईल.

● परीक्षण : जिल्हा आधीच गंभीर नुकसानीला तोंड देत आहे, संपर्क तुटला आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोक त्रस्त आहेत. मुसळधार पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत आहे. अशा स्थितीत नेतृत्वाचा अभाव बचाव आणि मदतकार्यात अडथळा आणू शकतो, ज्यामुळे अनेक लोकांचे प्राण धोक्यात येऊ शकतात. हा पर्याय सार्वजनिक हितापेक्षा वैयक्तिक गरजांना प्राधान्य देतो, जे ‘‘सेवेपेक्षा स्वत:ला महत्त्व’’ या तत्त्वाच्या विरुद्ध आहे.

याप्रमाणे इतर पर्यायांचे विश्लेषण करा.

ड) विजयने कोणता पर्याय स्वीकारावा, असे तुम्हाला वाटते आणि का?

विजयसाठी सर्वात योग्य पर्याय म्हणजे केरळमध्ये आपल्या आईचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक किंवा समुदायाच्या सदस्याला सांगून स्वत: बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्व करत राहणे. कारण –

● मोठ्या प्रमाणात लोकांचे हित साध्य करता येईल.

● सार्वजनिक सेवेचा उच्च आदर्श निर्माण होईल.

● हा पर्याय सर्वात संतुलित आणि व्यावहारिक आहे.

● हा निर्णय धैर्य आणि नैतिक लवचिकतेचे कार्य आहे.

यामुळे विजयाच्या आईच्या वारशाचा सन्मान होईल. तिच्या मुलाने गरजूंना निस्वार्थपणे मदत करणे, हे अभिमानास्पद आहे. कर्तव्याप्रती त्याचे समर्पण हे तिने त्याच्यात रुजवलेल्या मूल्यांना आदरांजली ठरेल.

ही केस स्टडी कर्तव्यानुसारी नीतिशास्त्रावर आधारित आहे. जे इमॅन्युएल कांटने सांगितले होते. प्रशासनात नागरी सेवकाद्वारे आपले कर्तव्यपालन महत्त्वाचे असून तोच सुप्रशासनाचा पाया आहे.

sushilbari10@gmail.com