विक्रांत भोसले
विद्यार्थी मित्रहो, सामान्य अध्ययन ४ या पेपरचा अभ्यासक्रम पुढील तीन प्रमुख घटकांमध्ये विभागाला जाऊ शकतो.
१. नैतिक तत्त्वज्ञान ( Moral Philosophy)
२. सामाजिक मानसशास्त्र ( Social Psychology)
३. लोकप्रशासनातील नैतिकता ( Ethics in Public Administration)
या पुढच्या काही लेखांमध्ये आपण या विषयांवर गेल्या काही वर्षांत आणि विशेषत: २०२३ मध्ये येऊन गेलेल्या काही प्रश्नांच्या उत्तरांची आणि त्या अनुषंगाने आवश्यक असलेल्या तयारीची चर्चा करणार आहोत. आज आपण नैतिक तत्त्वज्ञान या घटकावर २०२३ सालच्या मुख्य परीक्षेत विचारलेल्या काही प्रश्नांची चर्चा करूयात.
प्रश्न २ ( a) ‘‘ Corruption is the manifestation of the failure of core values in the society.’’ In your opinion, what measures can be adopted to uplift the core values in the society?
‘‘भ्रष्टाचार असणे हे समाजातील मूलभूत मूल्यांच्या अपयशाचे द्याोतक आहे.’’ तुमच्या मतानुसार, समाजामध्ये मूलभूत मानवी मूल्ये वृद्धिंगत व्हावी यासाठी काय उपाय केले जाऊ शकतात? (१० गुण, १५० शब्द)
(उत्तर लेखनासाठीची सूचना – या प्रश्नाचे उत्तर अभ्यासक्रमात वर नमूद केलेल्या तीनही घटकांचा वापर करून लिहिता येऊ शकते. जसे की सद्गुणांवर आधारित नीतिशास्त्राचा सिद्धांत विशेषत: अॅरिस्टॉटलच्या सिद्धांताचा वापर करता येऊ शकतो. तसेच हे उपाय वृत्ती बदलण्याबद्दलही आहेत म्हणून सामाजिक मानसशास्त्राचाही भाग इथे उपयोगी पडतो. तसेच प्रशासकीय व्यवस्था या समाजाचाच भाग आहेत म्हणून त्यांचे अपयश हे समाजाचेदेखील अपयश आहे. म्हणून लोकप्रशासनातील नैतिकता या घटकाचाही वापर केला जाऊ शकतो. तसेच दुसऱ्या प्रशासकीय सुधारणा आयोग्याच्या ४ थ्या अहवालाच्या पहिल्या प्रकरणात भ्रष्टाचाराच्या कारणांची चर्चा केली आहे. तिथेही आपल्याला योग्य मुद्दे सापडू शकतात. या सर्व मुद्द्यांवरून तुमच्या असे लक्षात येईल की विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप हे आंतरविद्याशाखीय ( Interdisciplinary) आहे. आणि तसा विचार करणे हे एक चांगले उत्तर लिहिण्यासाठी अनिवार्य आहे.)
हेही वाचा >>> UPSC-MPSC : भारतातील नगरपालिकेची रचना नेमकी कशी आहे? त्याचा कालावधी आणि अधिकार कोणते?
उत्तर : नागरी सेवा ही फक्त नोकरी नाही तर ती सेवा आहे की जी करण्याची संधी समाजाने काही निवडक व्यक्तींनाच दिलेली असते. जे एका अवघड निवड प्रक्रियेला यशस्वीरित्या पार करतात. एकप्रकारे हा विश्वास जनतेने या नागरी सेवकांच्या क्षमता, ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे त्यांचे चारित्र्य या सर्वांवर दाखवलेला असतो. अशा व्यक्तींच्या हातात अगदी तरुण वयातच महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार दिला जातो. अशावेळी जेव्हा यातील काहीजण नियम, मूल्ये आणि कायदे यांच्याशी तडजोड करून सत्तेचा गैरवापर सुरू करतात तेव्हा ते फक्त त्यांचेच अपयश नसते तर संपूर्ण समाजाचे अपयश असते. याच्याही पुढे जाऊन जेव्हा समाज आणि प्रशासकीय व्यवस्था अशा भ्रष्टाचाराला आळा घालायला अपयशी ठरतात तेव्हा मूलभूत मूल्यांचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते. अशा मूलभूत मूल्यांना वृद्धिंगत करण्यासाठी पुढील उपाय केले जाऊ शकतात :
१. समाजासमोर योग्य नैतिक आदर्श ठेवणे.
२. सुप्रसिद्ध आणि प्रभावी व्यक्तींच्याद्वारे नैतिक संदेश समाजाला देणे.
३. शालेय आणि महाविद्यालयीन मूल्यमापनाच्या चाचण्यांमध्ये नैतिक वर्तनाचा अंतर्भाव करणे.
४. नैतिक वर्तन सातत्याने दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांचा आणि नागरिकांचा गौरव करणे.
५. सत्तेचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींना तातडीने आणि निश्चितपणे शिक्षा करणे.
६. नैतिक वर्तनाची एक अचूक आणि योग्य चौकट घालून देणे.
७. कायदे निर्मिती अशा प्रकारे करणे की जिथे नैतिक वर्तनासाठी सुयोग्य वातावरण तयार होईल आणि अनैतिक वर्तनासाठी प्रभावी निर्बंध निर्माण होतील. जसे की कार्यक्षम न्यायव्यवस्था आणि संवेदनशील आणि प्रशिक्षित नागरी सेवकांची भरती करणे.
८. समाजामध्ये सर्वसमावेशक सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे की जेणेकरून नागरिकांकडे आवश्यक सर्व सोयी सुविधा येतील आणि मग अनैतिक मार्गांचा वापर करून कसेबसे जीवन जगण्याची वेळ येणार नाही.
९. सामाजिक विषमतेचे व्यवस्थापन करणे.
१०. नागरी सेवकांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा यासाठी नैतिक आचारसंहिता तयार करणे आणि तिच्या अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देणे.
या सर्व उपायांचा जर समाजाने आणि विशेषत: प्रशासकीय यंत्रणेने पाठपुरावा केला तर समाजामध्ये मूलभूत मूल्यांची रुजवण करणे, त्यांची जोपासना करून त्यांना वाढीस लावणे यामध्ये नक्की यश मिळेल. या पुढील लेखामध्ये आपण सुविचारांवर आधारित प्रश्नांची ( Quote based questions) चर्चा करणार आहोत.