डॉ.भूषण केळकर डॉ.मधुरा केळकर
बऱ्याचदा आपण एका विभागात किंवा पदावर कार्यरत असतो, पण कंपनीतील इतर क्षेत्रांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. ‘जॉब शॅडोइंग’ म्हणजे आपल्या कंपनीतील इतर विभागातील किंवा पदावरील एखाद्या सहकाऱ्याच्या मागे ‘छायेसारखे’ राहून त्याचे काम, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि आवश्यक कौशल्ये प्रत्यक्ष पाहणे व समजून घेणे. यापुढील काळात जॉब शॅडोइंगचे महत्त्व वाढते राहील.
एक वित्त कंपनीमधील अलीकडेच छान सुरुवात केलेला सौरभ आमच्याकडे समुपदेशनाला आला होता. सौरभला आम्ही आमच्या गेस्टाल्ट टेस्ट वरून असे सांगितले, की जशी त्याची आर्थिक / वाणिज्य क्षेत्रात काम करण्याची ताकद आहे, तेवढीच त्याची मानसिक धाटणी ही समाजोपयोगी काम करण्याचीदेखील आहे; आणि म्हणून त्याने त्याही क्षेत्राचा अनुभव घेऊन पाहावा- नोकरी न सोडता! त्याने ते ‘जॉब शॅडोइंग’ (job shadowing) करून केले आणि कंपनीला त्याचे तेच काम इतके आवडले, की सहा महिन्यांत सीएसआरचा प्रमुख म्हणून त्याला नेमला. सौरभ छान पगार पण मिळवतोय आणि मुख्य म्हणजे तो आत्ता खुशही आहे. अजून २-३ वर्षांत तो परत त्याचे आर्थिक वाणिज्य क्षेत्रात काम करेल हेही नक्की!!
आजच्या कॉर्पोरेट जगात नोकरी म्हणजे फक्त स्थिर पगाराचे साधन नाही, तर वैयक्तिक विकास आणि करिअर घडवण्याची संधी आहे. बऱ्याचदा आपण एका विभागात किंवा पदावर कार्यरत असतो, पण कंपनीतील इतर क्षेत्रांबद्दल आपल्याला फारशी माहिती नसते. कधीकधी आपल्याला वाटतं – ‘माझ्या कौशल्यांना दुसऱ्या टीममध्ये चांगलं व्यासपीठ मिळेल का?’, ‘नवीन भूमिका मला जास्त अनुरुप असेल का?’ अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे भनभनभन‘जॉब शॅडोइंग’!
जॉब शॅडोइंग म्हणजे आपल्या कंपनीतील इतर विभागातील किंवा पदावरील एखाद्या सहकाऱ्याच्या मागे ‘छायेसारखे’ राहून त्याचे काम, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि आवश्यक कौशल्ये प्रत्यक्ष पाहणे व समजून घेणे. यात आपण निरीक्षण करता, शंका विचारता आणि कधी कधी लहानसहान कामांमध्ये सहभागीही होता.
आमच्या मते यापुढील काळात जॉब शॅडोइंगचे महत्त्व वाढते राहील. यात कंपनीतील अन्य विभागांची संधींची खरी ओळख आपल्याला होऊ शकते -मुख्य म्हणजे नोकरी न बदलता किंवा राजीनामा न देता नवा विभाग अनुभवता येतो. स्वत:च्या आवडी व कौशल्यांचे मूल्यांकन करता येते.
व्यावसायिक नेटवर्क वाढते, इतर विभागातील सहकाऱ्यांशी ओळख निर्माण होते, ज्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो. नव्या भूमिकेसाठी कोणती कौशल्ये विकसित करावी लागतील हे स्पष्ट होते. नवा अनुभव घेतल्याने भविष्यातील बदलांना सामोरे जाण्याची तयारी होते. ‘एखादा विभाग / भूमिका मला खरंच आवडेल का?’ या प्रश्नाचे उत्तर प्रत्यक्ष अनुभवावरून मिळते आणि योग्य माहितीच्या आधारे आपण करिअरचा पुढचा टप्पा ठरवू शकतो.
जॉब शॅडोइंग कसे करावे?
स्वत:चा हेतू ठरवा
सर्वप्रथम विचार करा- कोणता विभाग किंवा भूमिका तुम्हाला समजून घ्यायची आहे? ती का आवडते? त्या विभागात तुम्ही काय शिकू शकता?
वरिष्ठांशी किंवा एचआरशी चर्चा करा
आपल्या मॅनेजरशी किंवा एचआर विभागाशी प्रामाणिकपणे बोला. कंपनीतील बहुतेक ठिकाणी अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाते.
योग्य सहकारी निवडा
तुम्हाला ज्यांची भूमिका पाहायची आहे, त्या व्यक्तीची तयारी आणि वेळ महत्त्वाची आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय जॉब शॅडोइंग शक्य नाही.
औपचारिक विनंती करा
ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटीतून जॉब शॅडोइंगची विनंती करा. आपला उद्देश स्पष्ट सांगा आणि किती दिवस किंवा तास तुम्हाला निरीक्षण करायचं आहे हे ठरवा.
तयारी करा
त्या विभागाविषयी आधी माहिती मिळवा विचारायचे प्रश्न तयार ठेवा. निरीक्षणशील व सक्रिय रहा
फक्त पाहून थांबू नका
शंका विचारा, चर्चा करा, शक्य असल्यास काही लहानसहान कामात मदत करा.
आभार व्यक्त करा
जॉब शॅडोइंग पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीचे व टीमचे आभार माना. हे व्यावसायिकतेचे लक्षण आहे.
अनुभवाचा आढावा घ्या
स्वत:ला विचारा -मला ही भूमिका आवडली का? माझ्या कौशल्यांमध्ये काय कमी-जास्त आहे? या अनुभवावर आधारित पुढील पावले ठरवा.
जॉब शॅडोइंग हा करिअर बदल किंवा प्रगतीसाठी कमी जोखमीचा, पण अत्यंत प्रभावी मार्ग आहे. ही प्रक्रिया कदाचित तुमच्या पुढच्या मोठ्या संधीचं दारही उघडू शकते.
bhooshankelkar@hotmail.com/ mkelkar_2008@yahoo.com