मिलिंद आपटे
१) यंदाच्या वर्षीच्या दहावीच्या परीक्षेत मी ८० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालो. मला गणित या विषयात ६० गुण मिळाले आहेत. कॉमर्स शाखेत प्रवेश घेऊ इच्छितो.माझा प्रश्न हा आहे की जर मी अकरावी बारावीला गणित हा विषय निवडला नाही तर मला पदवीसाठी किंवा पदवीनंतरच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी येऊ शकतात का? मी कॉमर्स शाखेत अजून कोणते करिअर मार्ग निवडू शकतो? कृपया मार्गदर्शन करावे.- यज्ञय शिंदे

— गणित विषयाला आम्ही एक व्यावसायिक गरजेचा विषय समजतो, तो नसल्यास प्रवेश परीक्षा असण्याऱ्या बहुतेक ठिकाणी अडचण जाते अगदी विधि अभ्यासक्रमासाठी CLAT च्या तयारीसाठीही गणित लागते. तसेच टॅक्सची प्रॅक्टिस असो सीए असो किंवा अगदी व्यावसायिक स्पर्धा परीक्षा असो गणित या विषयाला पर्याय नाही, अन्यथा बीबीए, लॉ, अर्थशास्त्र असे विषय घेता येतील.

२) मी इयत्ता नववीचा केंद्रीय विद्यालयमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे. माझे आवडते विषय हिंदी, इंग्रजी व विज्ञान आहेत. मला बारावीनंतर एनडीए जॉईन करून भारतीय सैन्यात सहभागी व्हायचे आहे. मी त्यासाठी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे. कृपया मला मार्गदर्शन करावे की केव्हापासून एनडीएचा अभ्यास करायचा व त्यासाठी कोणता अभ्यासक्रम, कुठून मिळवायचा व कोणती पुस्तके वाचायची?- वंश अहिरराव

वंश अहिरराव, सर्व प्रथम तुमचे अभिनंदन की तुम्ही सैन्यात जाण्याची इच्छा दर्शवली , एनडीए ही परीक्षा अशा उमेदवारांसाठी घेतली जाते जे १२वी उत्तीर्ण झाले आहेत किंवा त्यात बसत आहेत. एनडीए च्या हवाई दल आणि नौदल शाखांमध्ये आणि १० २ कॅडेट प्रवेश योजनेत सामील होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना १२ वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास करावा लागतो. एनडीएच्या निवडप्रक्रियेचे प्रमुख टप्पे असतात –

लेखी परीक्षा, मुलाखत (SSB), वैद्यकीय चाचणी आणि अंतिम गुणवत्ता यादी.

लेखी परीक्षा एकूण ९०० गुणांची असते. यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी, सामान्यज्ञान, इंग्रजी इत्यादी विषयांचा आठवी ते बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो. लेखी परीक्षेसाठी रोजचे वर्तमान पत्र वाचन महत्त्वाचे आहे. चालू घडामोडी, सामान्यज्ञान यांच्या तयारी बरोबरच इतरही अनेक गोष्टींची तयारी यातून होते.

बारावीत उत्तम गुण घेणाऱ्यांची एनडीए परीक्षा पण उत्तीर्ण होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे बारावीत उत्तम मार्कांचे टार्गेट ठेवणे चांगले. खूप शुभेच्छा