आशुतोष शिर्के
‘डिझाइन थिंकिंग’ ही समस्या सोडवण्याची एक आधुनिक प्रक्रिया म्हणून जगभर मान्यता पावली आहे. हे क्षेत्र केवळ सर्जनशीलतेला वाव देत नाही, तर मानवी गरजा केंद्रस्थानी ठेवून नाविन्यपूर्ण उपाय शोधायला शिकवते आणि हेच कौशल्य जगभरच्या उद्योगांना हवे आहे.

आजच्या जगातडिझाइन ही फक्त एखादी सौंदर्य किंवा कलेशी निगडित बाब उरलेली नाही. मोबाइल अॅप्सच्या इंटरफेसपासून ते सार्वजनिक वाहतुकीच्या प्रणालींपर्यंत, उत्पादनांच्या पॅकेजिंगपासून ते आरोग्यसेवा देणाऱ्या यंत्रणांपर्यंत – सर्वत्र डिझाइनचा खोलवर प्रभाव दिसून येतो. ‘डिझाइन थिंकिंग’ ही समस्या सोडवण्याची एक आधुनिक प्रक्रिया म्हणून जगभर मान्यता पावली आहे. त्यामुळेच केवळ डिझाइन शाखेचे विद्यार्थीच नव्हे, तर अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, व्यवस्थापन, सामाजिक शास्त्र अगदी वाणिज्य व विज्ञान अशा अनेक शाखांतील विद्यार्थीही आज डिझाइनच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. कारण हे क्षेत्र केवळ सर्जनशीलतेला वाव देत नाही, तर मानवी गरजा केंद्रस्थानी ठेवून नाविन्यपूर्ण उपाय शोधायला शिकवते आणि हेच कौशल्य जगभरच्या उद्याोगांना हवे आहे.

भारतात डिझाइन पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी-

भारतात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (एन.आय.डी.), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एन.आय.एफ.टी.), एम.आय.टी. इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (पुणे), सृष्टी इन्स्टिट्यूट (बंगळुरू) यांसारख्या संस्थांतून पदवी घेतलेले विद्यार्थी परदेशातील पी.जी. कोर्सेसकडे आकर्षित होत आहेत. यामागे दोन महत्त्वाचे हेतू असतात — एक म्हणजे जागतिक दर्जाचा अनुभव मिळवणं आणि दुसरं म्हणजे विशिष्ट उपक्षेत्रात ( specialisation) कौशल्य विकसित करणं. यूएक्स/यूआय डिझाइन, सर्व्हिस डिझाइन, स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट, सस्टेनेबल डिझाइन, डिझाइन फॉर सोशल इनोव्हेशन असे अनेक अभ्यासक्रम परदेशी विद्यापीठे अत्यंत सखोलपणे शिकवतात.

युनायटेड किंगडम (यू.के.), जर्मनी, नेदरलँड्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे देश डिझाइन शिक्षणासाठी विशेष नवाजले जात आहेत. रॉयल कॉलेज ऑफ आर्ट (लंडन), पर्सन्स स्कूल ऑफ डिझाइन (न्यूयॉर्क), यूमेओ इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन (स्वीडन), टी.यू. डेल्फ्ट (नेदरलँड्स), पोलितेक्निको दी मिलानो (इटली) यांसारख्या संस्था यामध्ये अग्रेसर आहेत.

डिझाइन पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठीही संधी

विशेष म्हणजे, ज्यांना डिझाइनचा पारंपरिक अनुभव नाही, पण ज्यांना समस्या सोडवण्यात, मानवी गरजांच्या खोलात जाण्यात व सर्जनशील दृष्टिकोनातून विचार करण्यात रस आहे अशा विद्यार्थ्यांनाही अनेक परदेशी विद्यापीठं प्रवेश देत आहेत. अशा विद्यार्थ्यांना फाऊंडेशन किंवा प्री-मास्टर्स कोर्सेस करणं अनिवार्य असतं. हे कोर्सेस त्यांना डिझाइनच्या मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठी मदत करतात.

उदाहरणार्थ, ह्युमन-सेंटर्ड डिझाइन, सस्टेनेबल डिझाइन, इनोव्हेशन डिझाइन इंजिनीअरिंग अशा काही अभ्यासक्रमांना विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकतो. त्यासाठी तुमचा पोर्टफोलिओ, तुमचं उद्दिष्ट स्पष्ट करणारा ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ आणि तुमच्या कल्पकतेचं व विचारशक्तीचं प्रतिबिंब दाखवणारे प्रोजेक्ट्स महत्त्वाचे ठरतात.

शिष्यवृत्ती आणिशैक्षणिक अनुकूलता

डिझाइनसारख्या क्षेत्रात शिक्षणाचं आर्थिक ओझं मोठं असू शकतं, पण त्यासाठी अनेक शिष्यवृत्त्या आणि स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत. डी.ए.ए.डी. (जर्मनी), चेव्हनिंग (यू.के.), इरास्मस मुंडस (युरोपियन युनियन), फुलब्राईट (अमेरिका) अशा शिष्यवृत्ती डिझाइनच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतात. शिवाय काही विद्यापीठं स्वत:ची मेरिट-आधारित किंवा गरजेनुसार शिष्यवृत्तीही देतात.

डिझाइन ही केवळ एक कलाक्षेत्र नाही – ती एक दृष्टी आहे. आपल्याला सभोवतालचं जग अधिक समजून घेण्याची आणि त्यात चांगले बदल घडवण्याची प्रेरणा देणारी ही दिशा आहे. त्यामुळे डिझाइनच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी परदेशात जाणं हे केवळ कौशल्यविकासाचं पाऊल नसून, तुमचं दृष्टिकोन व्यापक करणारी आणि तुम्हाला एक ‘जागतिक विचार करणारा नागरिक’ बनवणारी संधी असते.

विदेशात डिझाइन शिक्षणासाठी प्रवेश घेताना…

योग्य कोर्स आणि देश निवडा

यूएक्स डिझाइन, सर्व्हिस डिझाइन, सस्टेनेबल डिझाइन, इनोव्हेशन डिझाइन, स्ट्रॅटेजिक डिझाइन मॅनेजमेंट ही उपक्षेत्र समजून घ्या. त्यानुसार देश (यू.के., जर्मनी, नेदरलँड्स, स्विडन, अमेरिका) आणि विद्यापीठाची निवड करा.

प्रवेशासाठी पात्रता तपासा

प्रत्येक कोर्ससाठी लागणारी पात्रता वेगळी असते. डिझाइन पार्श्वभूमी नसतानाही काही कोर्सेसना प्रवेश दिला जतो. यासाठी अनिवार्य असणाऱ्या फाऊंडेशन कोर्सेस किंवा प्री-मास्टर्स प्रोग्राम्सची माहिती मिळवा .पोर्टफोलिओ तयार करा

तुमचं काम, कल्पक विचारसरणी, डिझाइन प्रक्रियेतील समज याचं प्रतिबिंब असलेलं सशक्त पोर्टफोलिओ तयार करणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. डिझाइनची पार्श्वभूमी नसलेले विद्यार्थी कॉन्सेप्ट नोट्स, ऑब्झर्व्हेशन बेस्ड प्रोजेक्ट्स देऊ शकतात.

स्टेटमेंट ऑफ पर्पज ( SOP) लिहा

तुमचं ध्येय, या क्षेत्रात येण्याचा तुमचा उद्देश, तुमचा दृष्टिकोन काय आहे हे स्पष्ट शब्दांत मांडणारा ‘स्टेटमेंट ऑफ पर्पज’ लिहा.

शैक्षणिक कागदपत्रं आणि भाषा परिक्षा

अनेक परदेशी विद्यापीठंमध्ये IELTS किंवा TOEFL यांसारख्या इंग्रजी भाषा परिक्षा आवश्यक असतात. काही ठिकाणी Duolingo टेस्ट चालते. बरोबर तुमची मार्कशीट, शिफारसपत्रं ( Letters of recommendation) एकत्र करा.

विद्यापीठात अर्ज करा

कोर्सच्या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करा. काही ठिकाणी अर्जासाठी फी लागते.

शिष्यवृत्तींसाठी अर्ज करा

DAAD, Chevening, Erasmus Mundus, Fulbright व इतर शिष्यवृत्त्यांची वेळेत माहिती घेऊन त्यसाठी दिलेल्य वेळेत अर्ज करा.

व्हिसा आणि निवास व्यवस्था

प्रवेश मिळाल्यानंतर व्हिसा प्रक्रियेची सुरुवात करा. योग्य निवासासाठी पर्याय शोधा — हॉस्टेल, रेंटल अपार्टमेंट्स.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

mentorashutosh@gmail.com