आरोग्य विज्ञान क्षेत्रातील करिअर म्हणजे एमबीबीएस किंवा बीडीएस एवढाच विचार विद्यार्थी करतात आणि त्यात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक मार्क पडले नाहीत तर ‘ड्रॉप’ही घेतात, मात्र आरोग्य विज्ञान शाखेतील पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध उपलब्ध पर्यायांकडे तितकेसे लक्ष देत नाहीत हे दुर्दैव आहे.
बारावीनंतर आरोग्य विज्ञान शाखांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली राष्ट्रीय पातळीवरील ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे, त्यानंतर आरोग्य विज्ञान शाखांची प्रवेश प्रक्रियाही सुरू झाली आहे. आरोग्य विज्ञान क्षेत्रातील करिअर म्हणजे एमबीबीएस किंवा बीडीएस एवढाच विचार विद्यार्थी करतात आणि त्यात प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक मार्क पडले नाहीत तर ड्रॉपही घेतात, मात्र आरोग्य विज्ञान शाखेतील पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध उपलब्ध पर्यायांकडे तितकेसे लक्ष देत नाहीत हे दुर्दैव आहे. पॅरामेडिकल क्षेत्रातील विविध संधींची माहिती घेऊ यात ज्यासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे.
● फिजिओथेरपी : बारावीनंतर साडेचार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आहे ज्यात सहा महिन्यांची इंटर्नशिप अंतर्भूत आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी बारावी बोर्डाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये किमान ५० गुण आणि नीट परीक्षेचे मार्क हे महत्वाचे असतात. अनेक खाजगी विद्यापीठांमध्येही हा कोर्स उपलब्ध असून तिथे नीट परीक्षेचे मार्क ही अनिवार्य अट नाही. काही महाविद्यालयांत पदवीनंतर दोन वर्षांच्या मास्टर्स डिग्रीची पण सोय आहे. फिजिओथेरपी हा वैद्याकीय शाखेच्या जवळपास सर्वच स्पेशलायझेशन चा अविभाज्य भाग बनला आहे.
प्रौढ आणि लहान मुलांमधील मेंदूचे आजार , ऑर्थोपेडीक , कार्डिऍक , मेडिसीन , प्रसूतीपूर्व व प्रसूत्योत्तर, क्रीडावैद्याक अशा सर्वच रुग्णोपचारांमध्ये फिजिओथेरपीचे सहाय्य लागते. रुग्णांच्या शास्त्रशुद्ध हालचाली व व्यायाम यातून त्याला बरे करण्यासाठी मोलाची मदत फिजिओथेरपी मधून मिळते. अर्धांगवायू झालेल्या रूग्णांसाठी तर ही अत्यंत प्रभावी व टिकाऊ उपचार पध्दती आहे. या क्षेत्राची व्याप्ती आज फक्त रुग्णोपचारापुरती मर्यादित नाही तर सर्वसामान्य शारीरिक तंदुरुस्ती , त्याचबरोबर खेळाडूंची तंदुरुस्ती या क्षेत्रातही फिजिओथेरपीचे स्थान मोलाचं आहे. फिजिओथेरपी पदवीधरांना स्वत:ची स्वतंत्र प्रॅक्टिस करणे शक्य आहेच , परंतु त्याशिवाय विविध रूग्णालयात नोकरीच्या ही खूप संधी उपलब्ध आहेत. युरोप, ऑस्ट्रेलिया सह अनेक देशांत फिजिओथेरपी पदवीधरांना उत्तम संधी उपलब्ध आहेत.
● स्पीच थेरपी व ऑडिऑलॉजी :
बारावीनंतर हा चार वर्षांचा अभ्यासक्रम असून महाराष्ट्रातील तीन महाविद्यालयातच उपलब्ध आहे. बारावी बोर्डाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मध्ये किमान ५० गुण मिळवणारे विद्यार्थी यासाठी पात्र असतील, नीट परीक्षेतील गुण इथे प्रवेशासाठी उपयुक्त ठरतात. देशभरातील अनेक विद्यापीठांमध्ये तसेच संस्थांमध्ये हा कोर्स उपलब्ध असून अनेक ठिकाणी मास्टर्स कोर्स पण उपलब्ध आहे.
बोलण्यातील तोतरेपणा , बोबडेपणा अशा व्यंगांवर उपचारांचे शिक्षण यामध्ये दिले जाते. कॅन्सर वा अन्य रोगांमुळे स्वरयंत्रावर शस्त्रक्रियेमुळे झालेला परीणाम असो वा अर्धांगवायू मुळे बोलण्यावर झालेला परीणाम असो , स्पीच थेरपी उपयुक्त ठरते. याशिवाय श्रवण दोषांवर वर उपचार ही या शाखेत शिकवले जातात. हिअरींग एड्स वापरून श्रवण दोषांवर मात करण्यासाठी ची कौशल्ये ही शिकवली जातात.
● ऑक्युपेशनल थेरपी :
बारावीनंतर चार वर्षांचा हा पदवी अभ्यासक्रम आहे. शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या दुर्बल झालेल्या रुग्णांना परत एकदा उभे करणे आणि त्यांना त्यांची दैनंदिन कामे योग्य रितीने करता येण्यासाठी गरजेप्रमाणे उपचार करणे हे या उपचार पद्धतीचे मूळ तत्व आहे. यामध्ये अपघातांत अवयव गमावलेल्या लोकांपासून हे अल्झायमर्स , अर्थरायटीस , स्किझोफ्रेनिया यासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांवरील उपचारांचा समावेश होतो. ऑक्युपेशनल थेरपी पदवीधरांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी आपल्या देशात उपलब्ध आहेतच , परंतु त्याचबरोबर परदेशातही उत्तम संधी उपलब्ध आहेत.
● ऑप्टोमेट्री :
बारावीनंतर हा चार वर्षांचा बीएससी कोर्स आहे.
ऑप्टोमेट्री म्हणजे दृष्टी आणि डोळ्यांची काळजी घेण्याची एक शाखा आहे. यात डोळ्यांची तपासणी करणे , दृष्टीचे दोष शोधणे , चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स नंबर काढणे , डोळ्यांच्या काही आजारांचे निदान करणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे याचा समावेश होतो. यांना डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी नसते. या शाखेत पदव्युत्तर शिक्षण पण उपलब्ध आहे. या विद्यार्थ्यांना रुग्णालये, आय क्लिनिक , लेन्स आणि ऑप्टिकल कंपन्या , संशोधन, शैक्षणिक संस्था येथे करीअरच्या संधी मिळू शकतात.
vkvelankar@gmail.com