स्पर्धा परीक्षा आणि त्यातलं यश हेच काही आयुष्य नाही. आयुष्यात इतर कितीतरी चांगल्या, सुंदर आणि समाधानकारक गोष्टी असतात. त्याकडे आपण नेहमीच लक्ष दिलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांमधला यशाचा दर अतिशय कमी असतो. त्यामुळे परीक्षा देण्याचा निर्णय घेतानाच पहिल्या तीन प्रयत्नांना यश मिळाले नाही तर प्लान बीचाही विचार निश्चितच केला पाहिजे.

काही दिवसांपूर्वी एक अतिशय अस्वस्थ करणारी बातमी वाचनात आली होती. संघ लोकसेवा आयोगाच्या शेवटच्या संधीमध्येही यश न आल्यामुळे एका उमेदवाराने आत्महत्या केली. हा उमेदवार राज्याच्या एका सेवेत होता. म्हणजे त्याला नोकरी होती. त्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी तर हृदय विदीर्ण करणारी होती. त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं, ‘माझ्या आत्महत्येची बातमी देऊ नका, स्पर्धा परीक्षा देणारे निराश होतील.’

ही बामती वाचल्यावर आमच्या हे लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या आमच्यासारख्या अधिकाऱ्यांवर खूप जबाबदारी आहे. स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन हा एक भाग झाला. पण स्पर्धा परीक्षांमधले यश म्हणजेच सर्व काही नाही हे उमेदवारांना पटवून देणे हीदेखील महत्त्वाची गोष्ट आहे. स्पर्धा परीक्षा म्हटली की काही उमेदवार यशस्वी होणार, काही उमेदवार यशस्वी होणार नाहीत. स्पर्धा परीक्षांमधल्या यशाने एक सन्मानाची नोकरी मिळते, समाजात उत्तम स्थान मिळतं, नोकरीबरोबर अनेक फायदे मिळतात. या सगळ्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या खूप वाढली आहे यात काही शंका नाही. जेवढ्या शिक्षणाच्या संधी वाढल्या त्या तुलनेत नोकरीच्या संधी वाढल्या नाहीत.

उमेदवारांनी सर्वात प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की स्पर्धा परीक्षांमधला यशाचा दर अतिशय कमी असतो. यूपीएससी सनदी सेवेसाठी देशभर १० लाख परीक्षार्थीं आपला अर्ज भरतात आणि शेवटी त्यातून एक हजार जणांची अंतिम यादीत निवड होते. यशवंतांची टक्केवारी फक्त एक ते दीड टक्का एवढीच असते. त्यामुळे परीक्षा देण्याचा निर्णय घेतानाच पहिल्या तीन प्रयत्नांना यश मिळाले नाही तर ह्यप्लान बीह्ण चाही विचार निश्चितच केला पाहिजे. यूपीएससी / एमपीएससी स्पर्धा परीक्षेत यश नाही मिळालं तर दुसऱ्या कोणत्या परीक्षा देता येतील काय याचा सविस्तर विचार करून ठेवावा.

उदाहरणादाखल गुप्तचर विभागात (आयबी) असिस्टंट सेन्ट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदासाठी, नाबार्ड, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विविध राष्ट्रीयकृत बँका मध्ये प्रोबेशनरी अधिकारी पद, स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे निवड होत असलेली पदे, एमपीएससीच्या पीएसआय, एसटीआय, असिस्टंट या पदांसाठीची परीक्षा याचा नक्की विचार करत त्यातून एखादी पोस्ट संपादन केली तर पुन्हा आपले अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी यूपीएससी सनदी वा इतर सेवा किंवा एमपीएससी वर्ग १,२ कडे वळत जोमाने अभ्यासाला लागावे.

अटेम्प्टची संख्या संपणार आहे वा वयही वाढते आहे, हातात काही नाही अशा वेळी आपल्या पदवीच्या विषयाला अनुसरून क्षेत्रात काही उच्च शिक्षण किंवा कौशल्य लागणार असतील तर ते कसे जमवता येईल याचाही विचार करावा. अनेक मराठी तरुण उद्याोजकतेकडे वळत नाहीत असा अनुभव आहे. शेतीकडेही अनेक सुशिक्षित तरुण पाठ फिरवताना दिसतात. उद्याोग क्षेत्र किंवा मार्केटचा विचार करत आधुनिक शेती, कुटिरोद्याोग याचा पर्यायी विचार स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी अवश्य करावा.

एखाद्या उमेदवाराची घरची आर्थिक स्थिती चांगली नसेल आणि त्याला जास्त काळ स्पर्धा परीक्षा देत राहणे शक्य नसेल तर त्याने आधीच आपण किती वर्ष या परीक्षांसाठी देऊ शकतो याचा विचार करून ठेवायला पाहिजे. त्यानुसार या प्रक्रियेसाठी किती वर्ष आपण द्यावी हे त्या उमेदवाराने ठरवलं पाहिजे. याचा फायदा असा की स्पर्धा परीक्षेत यश मिळालं नाही तरी सर्व काही संपलेलं नाही असा विश्वास उमेदवाराला वाटेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना संपादन केलेले ज्ञान कधीही वाया जाणार नाही. स्वानुभवातून नमूद करू इच्छितो की आमच्यासोबत यूपीएससीची तयारी करणारी मंडळी अपयशी झाल्याने हताश न होता पत्रकारिता, सिनेसृष्टी, सामाजिक संस्था, वकिली, शेती, उद्याोजकता अशा विविध क्षेत्रांत आज नावलौकिक मिळवत आहेत आणि आपला यूपीएससीचा अभ्यास करताना विकसित झालेला सर्वंकष दृष्टिकोन कसा कामी आला ते अभिमानाने सांगत आहेत.

स्पर्धा परीक्षा आणि त्यातलं यश हेच काही आयुष्य नाही. आयुष्यात इतर कितीतरी चांगल्या, सुंदर आणि समाधानकारक गोष्टी असतात.

स्पर्धा परीक्षेतून मिळणाऱ्या नोकरीच्या माध्यमातून समाजासाठी चांगल्या गोष्टी करायची संधी मिळते. पण इतर अनेक क्षेत्रांमध्येसुद्धा समाजासाठी काहीतरी चांगलं करण्याची संधी मिळत असते. शिक्षणाच्या क्षेत्रात नवीन पिढीला घडवण्याचं समाधान मिळतं. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पर्यावरण, ग्रामीण विकास, पाणलोट क्षेत्र विकास, महिलांचे सक्षमीकरण, कुटिरोद्याोग अशा अनेक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळत असते. उदयोजक झालात तर आपण नोकरी करणाऱ्या कडून नोकरी देणाऱ्या वर्गात मोडले जातो हे विसरता कामा नये. करिअरचे असे अनेक पर्याय उपलब्ध असतात. आपल्याकडे संरक्षण सेवा सक्तीची नसली तरी अग्निविर आणि इतर सेना भरतीच्या माध्यमातून सरंक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करत प्रखर देशसेवा करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. याही एक प्रकारे स्पर्धा परीक्षाच असतात .

एकूण काय तर आयुष्य हे बहुमोल आणि सुंदर आहे. निव्वळ स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळालं नाही म्हणून आयुष्यच संपवायचं ही पळवाट अजिबातच योग्य नाही. आयुष्यात निराश मनस्थिती असेल तर आपले जुने दिवस एकदा आठवा. आज आहे ती परिस्थिती त्या दिवसांपेक्षा अधिक चांगली आहे हे तुम्हाला उमजेल. खिन्न मनस्थितीत आपले जवळचे मित्र, आप्त नातेवाईक, सगेसोयरे, तुम्हाला नेहमी प्रेरित करणारी तुमची श्रद्धास्थाने ज्यात तुमचे शिक्षकही असतील अशा सकारात्मक व्यक्ती, संस्थांकडे वळा. छोट्या छोट्या गोष्टीत समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. ह्यहे ही दिवस जातीलह्ण या आशावादी विचारसरणीचे अनुसरण करा. बलशाली भारताच्या उभारणीसाठी तुम्ही युवकच प्रकाशाची बेटं आहात. शुभेच्छांसह.

टेली मानस

केंद्र सरकारच्या स्वास्थ्य आणि परिवार कल्याण विभागातर्फे ह्यटेली मानसह्ण ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. १४४१६ या क्रमांकावर फोन केल्यास २४ ७ समुपदेशक उपलब्ध असतात. २० भाषांमध्ये ही सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा वापर गरज पडेल तेव्हा उमेदवार करू शकतात.

mmbips@gmail.com supsdk@gmail.com