प्रा. रवींद्र कुलकर्णी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात प्रा. रमेश सर आज कोणती नवी माहिती उलगडून सांगणार याविषयी सारे उत्सुक होते. आता या अनौपचारिक स्वरूपाच्या साप्ताहिक बैठकीला शिक्षण संस्था चालवणारे अनेक जण उपस्थित राहात होते. रमेश सर आले. त्यांनी सर्वांना हसून अभिवादन केलं आणि म्हणाले, ‘‘आज आपण क्लस्टर ऑफ कॉलेजेस आणि त्यांच्या द्वारे उच्च शिक्षण संस्थांची निर्मिती कशी करता येईल ते समजून घेऊ या? ’’

वेदांतने प्रश्न विचारला, ‘‘सर, क्लस्टर म्हणजे समूह ना? एका उद्देशाने एकत्र आलेली मंडळी.’’ रमेश सरांनी कौतुकानं त्याच्याकडे पाहिलं व म्हणाले, ‘‘बरोबर बोललास. हा झाला डिक्शनरीतला अर्थ. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार क्लस्टर ऑफ कॉलेजेस ही एक अभिनव संकल्पना आहे. एकाच कॅम्पसमध्ये किंवा जवळपास कार्यरत असलेली विद्यमान महाविद्यालये एक क्लस्टर तयार करू शकतात बरं का.’’

प्रा. सुनील सरांनी विचारलं, ‘‘सर, आमच्या महाविद्यालयाच्या कँपसमध्ये पारंपरिक शिक्षण देणारं म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स शाखांचं एक महाविद्यालय आहे, यात अनुदानित आणि विनाअनुदानित वर्ग चालतात; दुसरं महाविद्यालय आहे ते लॉचं; तिसरं मॅनेजमेंट महाविद्यालय; एक आहे फार्मसी महाविद्यालय आणि एक आहे इंजिनीअरिंग महाविद्यालय. यांचं क्लस्टर होईल का?’’

प्रा. रमेश सरांनी उत्तर दिलं, ‘‘अरे वा, ही परिस्थिती महाविद्यालयांच्या क्लस्टरसाठी म्हणजे समूहासाठी अगदी उत्तम आहे. फक्त समूह महाविद्यालये (क्लस्टर कॉलेजेस) तयार करू इच्छिणाऱ्या संस्थांना त्यांच्या भागीदार संस्थांसोबत सहकार्यासाठी लिखित सामंजस्य करार करावा. सामंजस्य करारामध्ये सहयोगाचे उद्दिष्टे आणि संबंधित तरतुदी, भागीदारी संस्थांमधील नातेसंबंधाचे स्वरूप आणि व्याप्ती आणि क्लस्टरच्या कार्यपद्धतीचा स्पष्टपणे समावेश करणे आवश्यक असेल. हा करार करत असताना त्यांनी सहयोगी कार्यक्रमांशी संबंधित अशी माहिती, त्यांच्या सार्वजनिक प्रकटनामध्ये अनिवार्यपणे सर्वासाठी उपलब्ध करून द्यायची हे लक्षात घ्यायला हवं, त्याचबरोबर या सामंजस्य करारामध्ये सहयोगी संस्थांच्या संस्थात्मक विकास योजनेचा (IDP) भाग दिलेला असणे आवश्यक आहे. समूह महाविद्यालयांमध्ये जे जे बहुविद्याशाखीय कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार आहेत त्यांचे संपूर्ण प्रस्ताव संबंधित संस्थांनी विद्यापीठांच्या नियमांनुसार आणि/ किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यापीठांच्या वैधानिक संस्थांद्वारे मंजूर करून घ्यावेत. या प्रस्तावांत अभ्यासक्रमाचा कालावधी, त्या त्या विषयात किती विद्यर्थ्यांना प्रवेश द्यायचा ती प्रवेश संख्या, पात्रता, प्रवेश प्रक्रिया, शुल्क, अभ्यासक्रम आणि कार्यक्रम अंमलबजावणी; मूल्यांकन आणि मूल्यमापन पद्धती; कर्मचारी आणि शिक्षक, पात्रता, पायाभूत सुविधा आणि शिक्षण सुविधा या सर्वाचा समावेश करण्यात यावा.’’

संस्थाचालक मुश्रीफ यांनी विचारलं, ‘‘रमेश सर, एका समूह महाविद्यालयाच्या गटात किती महाविद्यालये असू शकतात? यात सामील होऊ  इच्छिणाऱ्या महाविद्यालयांची स्वत:ची काही पात्रता असायला हवी का?’’

रमेश सर म्हणाले, ‘‘हो तर, पण त्याविषयीचा आराखडा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या विचारार्थ आहे. काही दिवसांतच समूह महाविद्यालयांतील ज्या महाविद्यालयाला अग्र महाविद्यालयाचा (लीड कॉलेजचा) दर्जा द्यायचा आहे, त्या महाविद्यालयाकडे नॅक किंवा एन्.बी.ए.ची कोणती श्रेणी असणे आवश्यक आहे, समूह महाविद्यालयांत जास्तीत जास्त किती महाविद्यालये असू शकतील, ही महाविद्यालये भौगोलिक अर्थाने एकमेकांच्या किती नजिक असावीत यांबद्दलचे निकष, DPR तयार करण्याच्या पद्धतीसंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे कोणती असावीत याबाबत उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून लवकरच निर्देश जाहीर केले जातील. त्यासाठी थोडं थांबू या.’’

बाबर सरांनी प्रश्न विचारला, ‘‘सर, समूह महाविद्यालयांच्या संचालनाचं काय? त्यासंबंधी काही माहिती द्याल का?’’

रमेश सर म्हणाले, ‘‘महत्त्वाचा प्रश्न आहे हा सर. समूह महाविद्यालयांच्या सुरळीत कामकाजासाठी, एक संचालक मंडळ असेल. मित्रांनो, समूह महाविद्यालयांच्या बाबतीत बोलत असताना मी कधी कधी क्लस्टर हा शब्द वापरेन. ते जरा समजून घ्या. खाजगी महाविद्यालये जर असा समूह महाविद्यालये स्थापन करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांचं संचालन करत असलेल्या विश्वस्त संस्था किंवा मंडळ किंवा कंपनी ही धर्मादाय पद्धतीची आणि ‘ना नफा’ तत्त्वावर चालणारी असणं गरजेचं आहे. क्लस्टरमधील विद्यार्थ्यांच्या सर्वागीण फायद्यासाठी, क्लस्टरमधील प्रत्येक महाविद्यालयांमधील सुविधांचा कमाल वापर करायला हवा. यामुळे क्लस्टरमधील महाविद्यालयांच्या स्वतंत्र संसाधनांवर होणारा खर्च कमी केला जाईल आणि यातून निर्माण होणारा व सर्वाना जोडून घेणारा सामायिक खर्च हा सर्व विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरू शकेल. आर्थिक अडचणींमुळे, तसेच रोजगाराभिमुख, नाविन्यपूर्ण बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांचा अभाव असल्यामुळे ज्या एकल—शाखीय संस्था आणि बहुविद्याशाखीय संस्थांना विद्यार्थी संख्येचा प्रश्न भेडसावत असेल, त्या समूह महाविद्यालय स्थापित करून, त्या क्लस्टरचे सदस्य बनून आणि सर्जनशील असे बहु—विद्याशाखीय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देऊन त्यांचे विद्यार्थी संख्येचे आणि अन्य स्वरूपाचे प्रश्न एकत्रितरित्या सोडवू शकतात. क्लस्टर महाविद्यालये ही विविध विद्यापीठे मान्यताप्राप्त संस्था, प्रतिष्ठित उद्य्ोगसमूह यांच्याबरोबर सामंजस्य करार करून, त्यांचे सहकार्य मिळवून आपले अभ्यासक्रम हे अधिक प्रभावशाली आणि गतिमान करू शकतात. याचबरोबरीने क्लस्टर महाविद्यालये ऑनलाइन आणि खुल्या व दूरस्थ अध्ययन पद्धतीचाही अवलंब करू शकतील. विद्यार्थी हा अभ्यास कार्यक्रम अंशत: पालक संस्थेत आणि अंशत: क्लस्टरमधील भागीदारी संस्था(संस्थांमध्ये) घेऊ  शकतील.’’

महेश सरांनी विचारलं, ‘‘सर, क्लस्टर महाविद्यालयांतील विविध महाविद्यालयांचे वेगवेगळे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी निवडले तर वेळापत्रकाची पंचाईत होणार. त्यातून मार्ग कसा काढता येईल.’’

रमेश सरांनी उत्तर दिलं, ‘‘वेळापत्रकाची गडबड उडेल असं वाटणं स्वाभाविक आहे. पण, त्यातून मार्ग नक्की काढता येतो. क्लस्टरमधे सहभागी झालेल्या उच्च शिक्षण संस्थांनी परस्परांशी विचारविनिमय करून विद्यार्थ्यांना वेळापत्रकामुळे कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागू नये याची काळजी घ्यावी. ही काळजी घेताना विद्यार्थ्यांची सोय हा सर्वात प्राथमिक निकष ठेवावा. याबरोबरीनेच विद्यर्थ्यांनी दोने वेगवेगळ्या महाविद्यालयांतील दोन दोन वेगवेगळे अभ्यासक्रम निवडले असतील तर त्यांचं वेळापत्रक ठरवताना त्यांचे अध्यापनाचे तास एकाच वेळी असू नयेत (ओव्हरलॅप होऊ  नयेत) याची दक्षता संबंधित महाविद्यालयांनी घेणं आवश्यक राहील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे तो शिक्षण शुल्काचा. महाविद्यालयांनी आपण ज्या अभ्यासक्रमाचे शिक्षण देतो आहोत, तेव्हढय़ाच अभ्यासक्रमांचं शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारायला हवं.’’

एका संस्थेच्या संचालकांनी विचारलं, ‘‘सर, या क्लस्टर कॉलेजचं व्यवस्थापक किंवा नियामक मंडळ कसं असावं?’’

रमेश सरांनी उत्तर दिलं, ‘‘हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. समूह विद्यालये किंवा क्लस्टर महाविद्यालये सुरळीतपणे चालवण्यासाठी एक संचालक मंडळ असणं आवश्यक आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० ने याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत. ही तत्त्वे शासकीय समूह महाविद्यालयांसाठी आणि खाजगी समूह महाविद्यालयांसाठी वेगवेगळी आहेत.

शासकीय समूह महाविद्यालयांचं संचालक मंडळ पुढीलप्रमाणे असावं:

  •             अध्यक्ष- सरकारी, शैक्षणिक, उद्योग किंवा सार्वजनिक प्रशासनातील उच्च प्रतिष्ठित व्यक्ती. (राज्य सरकारद्वारे नामनिर्देशित)
  •             उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे संचालक किंवा त्यांचे नामनिर्देशित प्रतिनिधी
  •             संलग्न विद्यापीठाचे कुलगुरू किंवा त्यांचे नामनिर्देशित प्रतिनिधी
  •             क्लस्टर महाविद्यालयांतील दोन प्राचार्य
  •             संस्थांनी नामनिर्देशित केलेल्या दोन बा शिक्षण तज्ज्ञ व्यक्ती
  •             संस्थांनी नामनिर्देशित केलेले उद्योग समूहांतील एक तज्ज्ञ
  •             समूह महाविद्यालयांमधील शासनाने नामांकित केलेले एक प्राचार्य, हे प्राचार्य समूह महाविद्यालयाचे प्रमुख  असतील
  •             खासगी समूह महाविद्यालयांचे संचालक मंडळ
  •             अध्यक्ष- व्यवस्थापन मंडळाचे प्रतिनिधी,व्यवस्थापनाद्वारे नामनिर्देशित सरकारी, शैक्षणिक, उद्योग किंवा सार्वजनिक प्रशासनातील उच्च प्रतिष्ठित व्यक्ती
  •             व्यवस्थापन मंडळाचे तीन प्रतिनिधी
  •             राज्य सरकारचे नामनिर्देशित प्रतिनिधी
  •             संलग्न विद्यापीठाचे कुलगुरू किंवा त्यांचे किंवा तिचे नामनिर्देशित प्रतिनिधी
  •             समूह महाविद्यालयांतील महाविद्यलयांचे दोन प्राचार्य
  •             मंडळाने नामनिर्देशित केलेले दोन बा शिक्षण तज्ञ
  •             संस्थेने नामांकित केलेले उद्योगातील एक तज्ज्ञ
  •             समूह महाविद्यालयांमधील शासनाने नामांकित केलेले एक प्राचार्य, हे प्राचार्य समूह महाविद्यलयाचे प्रमुख असतील.’’

रमेश सर म्हणाले, ‘‘मंडळी, आज खूप उशीर झाला. पुढच्या वेळी हे संचालक मंडळ कशा पद्धतीने कार्य करेल हे आपण पाहू या.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुवाद : डॉ. नीतिन आरेकर