डॉ. श्रीराम गीत

माझे आत्ता बीसीए झाले आहे. मला दहावीला ८६ टक्के व बारावीला जनरल सायन्समधून ६७ टक्के पडले आहेत. सीईटीमधे मला ८४.६८ पर्सेटाइल पडले होते. बीसीए झाले आहे पण कोडींगविषयी ज्ञान जेमतेमच आहे. कारण २ वर्ष करोनामध्ये गेले. कॉम्प्युटरविषयी ज्ञान चांगले असून टायिपग स्पीड ४० आहे. एमपीएससी सरळसेवा करायची तीव्र इच्छा आहे आणि मेहनत करायची पण तयारी आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे घरातून जास्त आर्थिक मदतीची अपेक्षा नाही. आता माझे वय २१ वर्ष आहे.

– नागेश्वर पटवारी

आर्थिक परिस्थिती चांगली नसताना कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या नादी लागणे हे जास्त मनस्ताप वाढवणारे असते, तोही स्वत:चा व घरच्यांचा. आपल्या मुलाला किंवा मुलीला पदवीधर होईस्तोवर त्याची फी भरत अन्य खर्च भागवत पालकांनी खर्च केलेला असतो त्यांच्याही काही अपेक्षा असतात. याची जाणीव मोजक्या मुलांना असते. मात्र, स्वत:च्या स्वप्नांचा पाठलाग करताना ते साऱ्या घराची फरपट करतात. तुला तशी जाणीव आहे हे तुझ्या प्रश्नातून दिसते. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यानंतर सहसा यश तिसऱ्या प्रयत्नात मिळते. अर्थातच त्यासाठी तीन वर्षे तुझा राहण्याचा, क्लासचा व अन्य खर्च कोण करणार? इकॉनॉमिकल वीकर सेक्शनमधून तुझी पदवी झाली आहे, असे तूच लिहिलेले आहेस. इथे क्लाससाठी किंवा दुसऱ्या शहरात राहण्यासाठी अशी कोणतीही आर्थिक मदतीची सोय नाही. तीन वर्षांचा खर्च किमान पाच लाख रुपये येतो. या साऱ्याचा विचार करून घरच्यांच्या संमतीने स्पर्धा परीक्षेचा रस्ता धरायचा वा नाही याचा निर्णय तुझा तुलाच घ्यायचा आहे. अन्यथा चांगला कॉम्प्युटर ऑपरेटर या स्वरूपाची तुला नक्की नोकरी उपलब्ध आहे. त्या दिशेने शोध घ्यायला सुरुवात कर. त्या नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर वयाच्या पंचविशीनंतर तुला एमपीएससीसाठी प्रयत्न करणे स्वत:च्या बळावर शक्य राहील. तोपर्यंत रोज अर्धा तासाचे स्पर्धा परीक्षेसाठीचे प्राथमिक वाचन चालू ठेवावे. तीन वर्षांचे असे वाचन खूप उपयोगी पडेल हे नक्की.

हेही वाचा >>> १० वी पास आणि पदवीधर उमेदवारांना मुंबईत नोकरीची मोठी संधी! मुंबई कस्टम्स अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु

 माझे एम.ए., बी.एड. झाले असून मी सेट/ नेट पास आहे. राज्यशास्त्र विषय आहे आणि सध्या सोलापूर विद्यापीठमध्ये पीएच.डी. करत आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर २०१५ ते २०१८ एमपीएससीसाठी अभ्यास केला. त्यात बऱ्याच मेन्स दिल्या. प्लॅन बी म्हणून शिक्षण क्षेत्राकडे वळलो. परंतु तिथे भरती बंद आहे. राज्यशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला प्रायव्हेटमध्ये जॉब संबंधी कोणत्या संधी मिळू शकतात?  पीएच.डी.नंतर पोस्ट डॉक करण्याचा विचार करत आहे. टेट पण दिली आहे. त्यात ११८ मार्क आहेत. मागील दोन वर्षांपासून सिनिअर कॉलेजमध्ये घडय़ाळी तासावर वर शिकवत आहे.   – अभिजित लोंढे

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यास आणि पदव्यांचा हव्यास यातून जो रस्ता कुठेही जात नाही अशा साऱ्या रस्त्यांचा आपण पाठलाग करत आहात असे नमूद करावेसे वाटते. एमपीएससी अनेक वेळा दिली आणि यश मिळाले नाही याचे दु:ख पूर्णपणे बाजूला ठेवावे. सेट/ नेट देऊन सुद्धा घडय़ाळी तासावर काम करावे लागत असताना पीएच.डी.चा अभ्यास जोमाने चालू आहे. पण ती हाती येण्याच्या आधीच आपण पोस्ट डॉकचा विचार करत आहात. ते कोण व कशात देणार याचा विचार ही आपण केलेला नाही. राज्यशास्त्र हा विषय तौलनिक अभ्यासाचा व त्याचवेळी सामाजिक व राजकीय प्रश्नांची एकत्रित सांगड घालून विश्लेषणात्मक मांडणी करण्याचा असतो. त्याला संगणकीय उत्तम हाताळणीची जोड दिली तर निवडणुकांसंदर्भात काम करणाऱ्या विविध कंपन्यांमध्ये कदाचित काम मिळण्याची शक्यता निर्माण होते. सध्या पाच राज्यांच्या निवडणुका होत आहेत हे माहिती असावे. पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या साऱ्या संदर्भात नीट अभ्यास करून तो रस्ता जमणार आहे असे वाटले तर नोकरीची खासगी क्षेत्रातील शक्यता निर्माण होते. हे सारे सरसकट सगळय़ांना जमते असे नाही. दोन प्रादेशिक भाषा व इंग्रजी यावर प्रभुत्व असेल तर मात्र राजकीय विश्लेषण करणाऱ्या विविध यूटय़ूब चॅनेलमध्ये सुद्धा आपण मदतनीस म्हणून काम करू शकता. माहिती देण्याचे काम केले आहे शक्य आहे व नाही हे आपल्यालाच ठरवायचे आहे.