सर, मी या वर्षी बीएला आहे. सायकॉलॉजी हा माझा मुख्य विषय आहे. दहावीला मला ८३ टक्के, बारावीला ८४ टक्के गुण होते. माझे खालील प्रमाणे विचार आहेत. बीएनंतर एमए करणे. नंतर कौन्सिलरची नोकरी करणे व पुढे पी.एचडी करणे. कौन्सिलिंगमध्ये टिचिंग /रिसर्च / प्रॅक्टिस करणे. एमए इंडस्ट्रिअल करून त्यामध्ये प्रॅक्टिस करणे. पी.एचडी करणे/ शिकवणे. वरील प्लॅन योग्य आहेत का? तसेच वरील दोन्ही प्लॅन मध्ये, पगार काय असतो? नोकरीच्या संधी कशा आहेत? नोंदणी आवश्यक आहे का? कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती. – गायत्री चौधरी, डोंबिवली
तुझे मनात असलेले व मला लिहिलेले सर्व रस्ते कागदावर उत्तम आहेत. मात्र, पुढच्या सात प्रश्नातील उत्तरे दिल्यानंतर तुला त्यातील कामातील माणसांना शोधून व भेटून योग्य निर्णय घ्यायचा आहे. बहुतेक कॉलेजमध्ये शिकवण्याचा रस्ता सध्या फक्त घड्याळी तासावर उपलब्ध आहे. सामान्यपणे आठ ते दहा वर्षे अशा पद्धतीत काढल्यावर कदाचित कायम नोकरीची शक्यता निर्माण होते. उत्पन्न पंचवीस हजार महिना. कौन्सिलिंगची प्रॅक्टिस करेन किंवा इंडस्ट्रियल सायकॉलॉजीमध्ये कन्सल्टिंग करेन या दोन्ही गोष्टीसाठी किमान पाच सहा वर्षांची उमेदवारी गरजेची असते. उमेदवारी दरम्यान मिळणाऱ्या रकमेस पगार समजत नाहीत. पीएचडी हा विषय सध्या पूर्णपणे बाजूला ठेवावा. त्यासाठी सेट/ नेट देऊन जेआरएफ मिळाली तरच त्याचा फायदा होतो. अन्यथा पाच ते सहा वर्षे संशोधन करताना पाच ते सहा लाख रुपयांचा खर्च करावा लागतो. नोंदणीची सध्या गरज नाही. परदेशात आवश्यक. काम आवडत असले तर आनंद मिळतो. इंडस्ट्रीजमधे नऊ तास काम असते. एमबीए एचआर केले तर मागणी आहे. अन्यथा अनुभवातून पगार वाढतो. ट्रेनिंगमधे शिरकाव झाला तर भरपूर वाव असतो.
हेही वाचा >>> नोकरीची संधी
नमस्कार सर, मी बी.टेक. मेकॅनिकल केलं आहे. मी गेल्या दोन महिन्यांपासून डिप्लोमा कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करते. गणित या विषयामध्ये वर्चस्व आहे. तर मला भविष्यात प्रोफेसर होण्यासाठी कुठल्या संधी उपलब्ध आहेत किंवा आणखी कुठला जॉब मी करू शकते. – आरती बटुळे
शिकवण्यासंदर्भातील सर्व प्रमोशन टाइम स्केलवर असतात. त्यासाठी एम.ई. गरजेचे राहील. पूर्ण प्रोफेसर बनण्याचा रस्ता सहसा पंधरा वर्षांनंतर सुरू होतो. त्या दरम्यान डॉक्टरेट केली तरच ते पद मिळू शकते अशी सध्याची गरज आहे. दुसरा अन्य रस्ता कोणता असे विचारले आहे. त्याचे उत्तर म्हणजे एम.ई. पूर्ण केल्यानंतर एखाद्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये पदवीसाठी शिकवता येणे शक्य आहे. जेईई साठीच्या घेतल्या जाणाऱ्या क्लासेसमध्ये गणित आवडत असेल तर फिजिक्स व गणित हे दोन विषय शिकवण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नाही. तिथे शिकवणारे विद्यार्थी प्रिय आणि यशस्वी शिक्षक यांचा पगार सामान्य इंजिनीअरिंग कॉलेजच्या पगारापेक्षा किमान दसपट तरी जास्त असतो. खरे तर शिकवायला लागून दोन महिने झाले आहेत एक वर्ष शिकवून संपूर्ण अभ्यासक्रम संपल्यानंतर मग या पर्यायांचा विचार करावा. जोडीला आपल्या विषयातील अवांतर वाचन चालू ठेवणे खूप फायद्याचे ठरते.
सर, माझे २०२० मध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग पूर्ण झाले. त्यानंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. जोडीला पाचवी ते दहावीसाठी क्लासेस पण घेत होते. मध्यंतरी कम्बाईन डिफेन्स सर्विसेसची परीक्षा देऊन पाहिली. आता पुन्हा राज्यसेवा स्पर्धा परीक्षेवर लक्ष केंद्रित करावे असे वाटते. कृपया योग्य मार्गदर्शन करावे. – शालू चाळके
आपल्याला नेमके काय करायचे आहे हा पहिला मुद्दा. त्यासाठी घरच्यांचा किती पाठिंबा आहे याची पूर्ण खात्री करून घेणे हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आज तुझे वय २४ असावे. तर यानंतर राज्यसेवा स्पर्धा परीक्षेसाठी किती वर्षे देणार हा तिसरा मुद्दा. त्यात यश न मिळाल्यास सिव्हिल इंजिनीअरिंग विसरून गेलेले असेल हा शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा. या प्रत्येकाची नीट उत्तरे तुला मिळाली तर अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकशील. नाहीतर त्यासाठीचे प्रयत्न करण्यामध्ये पुरेसा फोकस तयार होणे खूप कठीण. शिवाय आजवरच्या प्रवासातील तुझ्या कोणत्याच मार्कांचा उल्लेख नसल्यामुळे अन्य स्पर्धकांसंदर्भात तू कुठे आहेस याचा अंदाज लावणे कठीण. दहावी पासून पदवीपर्यंत ७० टक्के पुढे मार्क असतील तर अर्थातच यशाची शक्यता वाढते. एकत्रित सारासार विचार करावा व नंतर निर्णय घ्यावा.