काही वेळा नोकरीत असुरक्षित वाटताना काही महत्त्वाची कारणे दिसून येतात जी वास्तववादी व खरी असतात तर बऱ्याचदा ती काल्पनिक असतात. ज्यावेळी आपलं मन काळजी आणि चिंता करत असतं किंवा त्याला तशी सवय असते त्यावेळी मनामध्ये काही अविवेकी मनोधारणा घर करून बसतात ज्यामुळे मन अवास्तववादी व काल्पनिक परिस्थिती निर्माण झाली तर आपलं नक्की कसं होणार याविषयी सतत विचार करू लागतं व त्यातून असुरक्षिततेची भावना अधिक वाढू लागते. नोकरीतील असुरक्षिततेचा सक्षमपणे सामना करण्यासाठी स्वत:मध्ये म्हणजेच आपल्या विचारसरणीमध्ये जाणीवपूर्वक बदल करावा लागतो त्याचबरोबर काही ठोस उपायांची अंमलबजावणी करावी लागते ज्यामुळे नोकरीत जाणवणारे असुरक्षितता कमी व्हायला नक्कीच मदत होते.

● असुरक्षिततेचे मूळ कारण शोधा. तुम्हाला वाटणाऱ्या असुरक्षित भावनेचे नक्की कारण काय आहे त्या भावने मागचा नक्कीच स्त्रोत कुठला आहे? हे शोधून काढा ज्यामुळे त्यावर ठोस उपाययोजना करणे शक्य होईल.

● तुमचे व्यावसायिक प्रोफाइल तपासा व अपग्रेड करा. तुम्ही ज्या क्षेत्रात व ज्या पदावर काम करत आहात या पदासाठी लागणारे आवश्यक कौशल्य आपल्याकडे आहे का? तसेच कंपनीने ठरवलेल्या धोरणाशी आपण सहमत आहोत का? तसे काम आपण करतो आहोत का? हे वेळोवेळी तपासा.

● तुमच्या क्षेत्रात सतत कार्यरत राहण्यासाठी व स्पर्धेत टिकून राहण्यासाठी गरजेप्रमाणे योग्य कोर्सेस तसेच आवश्यक असे प्रशिक्षण वेळोवेळी घेत राहा. सतत तंत्रज्ञानामध्ये होणारे बदल जाणून घ्या व त्यासाठी लागणारे आवश्यक कौशल्य स्वत:मध्ये विकसित करा.

● एक मजबूत नेटवर्क निर्माण करा. आपल्या क्षेत्रात काम करणाऱ्या इतर व्यावसायिकांशी तसेच त्यातील तज्ञ उद्याोजकांशी सतत संपर्कात रहा. त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन वेळोवेळी घेत राहा. हा संपर्कच तुम्हाला पुढे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होण्यासाठी मदत करणार आहे हे लक्षात ठेवा.

● सकारात्मक व सक्रिय मानसिकता जोपासा. नोकरीत वेळोवेळी निर्माण होणाऱ्या आव्हानांकडे एक संकट म्हणून न पाहता शिकण्याची व प्रगती करण्याची संधी म्हणून पहा ज्यामुळे तुम्ही व्यावसायिक स्तरावर सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल.

● लवचिक मानसिकता विकसित करा. नोकरीच्या ठिकाणी वेळोवेळी होणारे बदल व त्यातून निर्माण होणारी अनिश्चितता यांचा खंबीरपणे सामना करण्यासाठी विचारांमध्ये व वर्तनामध्ये लवचिकता असणे आवश्यक आहे नाहीतर सतत अपेक्षाभंग होतील व त्यातून ताणतणावांची निर्मिती होईल.

● सतत सजग रहा व स्वत:ची काळजी घ्या. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सतत सजग राहणे महत्त्वाचे ठरते व त्याचबरोबर स्वत:च्या अंतर्बाह्य व्यक्तिमत्त्वाकडे व त्यामध्ये होणाऱ्या बदलांकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक असते. स्वत: मध्ये होणारे बदल ओळखून व स्वीकारून स्वत:ची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. किंबहुना त्याची तशी सवय लावण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● ताणतणावांचे योग्य व्यवस्थापन करा. आयुष्यामध्ये संकटे येतच राहतात त्यामुळे अनिश्चितता देखील आपल्या आयुष्यामध्ये असतेच त्यामुळे वेळोवेळी निर्माण होणारे ताण-तणाव ओळखा तसेच हे ताणतणाव तात्कालिक आहेत व त्यावर मी नक्कीच मात करू शकतो हे स्वत:ला सांगा. विविध ताणतणावांचे नियोजन करण्यासाठी संतुलित आहार, पुरेशी झोप व विश्रांती, त्याचबरोबर सकारात्मक मानसिकता जोपासा. प्राणायाम, योगासने, ध्यानधारणा यासारखी विविध तंत्र शिकून घेतल्यास त्याचा मानसिक, भावनिक व शारीरिक आरोग्य नीट राहण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.