नोकरी करताना बऱ्याच जणांना नोकरीविषयी असुरक्षितता जाणवताना दिसते. ही असुरक्षितता नवीन नोकरी लागलेल्यांना देखील जाणवते तसेच अनेक वर्षे एखाद्या कंपनीत काम करून देखील काहीजणांना ही असुरक्षितता जाणवते. नोकरीतील असुरक्षितता म्हणजे आपली नोकरी जाण्याच्या संभाव्य धोक्याविषयी वाटणारी सततची चिंता किंवा त्याची होणारी वारंवार जाणीव

नोकरी विषयक वाटणारी असुरक्षितता विविध कारणांमुळे दिसून येते. बऱ्याचदा ही वाटणारी असुरक्षितता काल्पनिक विचारसरणीमुळे असू शकते म्हणजेच काही जणांना प्रत्येक गोष्टीवर खूप जास्त विचार करायची सवय असते किंवा आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे सतत विश्लेषण करून त्यातून सतत वेगवेगळे निष्कर्ष काढायचे आणि त्याबद्दल कायम चिंता किंवा काळजी करायची अशी सवय देखील अनेक जणांमध्ये दिसून येते. काहीजण आयुष्यातील सर्व स्तरांवरच असुरक्षित असतात म्हणजे त्यांना तसं वाटत असतं त्यामुळे नोकरी करताना देखील ते मानसिक व भावनिक स्तरावर सतत असुरक्षिततेचा सामना करताना दिसतात. सतत जाणवणाऱ्या असुरक्षिततेचा मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होताना दिसून येतो. बहुतेक वेळा सततच्या वाटणाऱ्या असुरक्षिततेमुळे त्याचे मनोशारीरिक ( Psychosomatic) परिणाम होताना दिसतात. आपल्या प्रत्येक विचाराचे व विचारानंतर निर्माण होणाऱ्या सकारात्मक किंवा नकारात्मक भावनांचे आपल्या आरोग्यावर सतत परिणाम होत असतात.

सतत वाटणारी भीती, असुरक्षितता, भविष्याविषयी वाटणारी चिंता, सततची होणारी चिडचिड यामुळे डोकेदुखी, रक्तदाब, झोपेच्या तक्रारी, अनियमित लागणारी भूक व पचनाच्या तक्रारी, छातीत होणारी धडधड, पोटात खड्डा पडल्यासारखा जाणवणे, श्वासाची गती वाढणे, शरीरातील विशिष्ट भागाचे स्नायू आखडणे सतत मूड बदलणे अशी अनेक लक्षणे आपल्यामध्ये दिसून येतात. बऱ्याच वेळा अशा होणाऱ्या त्रासांसाठी शारीरिक उपचारच केले जातात. वास्तविक या सर्व त्रासाचे मुख्य कारणआपल्या मनात निर्माण होणाऱ्या नकारात्मक विचार व भावनांच्या मुळाशी असते हे समजून घेणे खूपच महत्त्वाचे आहे. नोकरी करताना जाणवणाऱ्या सततच्या असुरक्षिततेमुळे पुष्कळ जणांमध्ये अशी मनो शारीरिक आजाराची लक्षणे दिसून येतात. अशावेळी सततच्या जाणवणाऱ्या असुरक्षिततेचा धीराने व संयमाने सामना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते व त्यासाठी आपल्याला जाणवणाऱ्या असुरक्षिततेची कारणमीमांसा करणे महत्त्वाचे ठरते. आपल्याला जाणवणारी कारणे वास्तववादी आहेत का ती काल्पनिक आहेत हे वेळोवेळी तपासून पाहण्याची सवय लावून घेणेदेखील अत्यंत महत्त्वाचा आहे.

नोकरीत सतत जाणवणाऱ्या असुरक्षिततेची महत्त्वाची कारणे

● आर्थिक नियोजनाचा ताण : नोकरी लागल्यानंतर बरेच जण राहत्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देतात त्यामुळे एखादा फ्लॅट बुक करतात व त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. बहुतेक कर्ज ही दीर्घ मुदतीची असल्यामुळे त्याचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे लागते यामुळे बऱ्याच जणांना नोकरी करताना असुरक्षित वाटत असते.

● आर्थिक मंदी : बऱ्याच वेळा आर्थिक मंदीच्या काळात कंपन्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतात बरेचदा हा निर्णय अचानक घेतल्यासारखा जाणवतो. कर्मचाऱ्यांना दुसरी नोकरी शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यामुळे कर्मचारी तणावाला सामोरे जाताना दिसतात.

● संवादाचा अभाव : बऱ्याच वेळा कंपनी व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांना कंपनीच्या भविष्यातील धोरणाविषयी माहिती नसते तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या कामाच्या संधी विषयी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला जात नाही या सर्व गोष्टींचा परिणाम नोकरी विषयी व कंपनीतील आपल्या भविष्याविषयी असुरक्षित वाटण्यावर होताना दिसतो.

● संघटनात्मक बदल : पुनर्रचना, कंपनीचे विलीनीकरण आणि अधिग्रहण या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये नोकरी विषयी स्थिरता निर्माण होताना दिसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

● कमी मनोबल व प्रेरणेचा अभाव : सततची वाटणारी चिंता व काळजी यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे मनोबल कमी होताना दिसते रोजच्या कामांमध्ये नीट लक्ष लागत नाही व काम करताना उत्साह व प्रेरणेचा अभाव दिसून येतो असे दीर्घकाळ चालू राहिले तर आपल्या नोकरी विषयी व भविष्याविषयी खूपच सुरक्षितता जाणवू लागते. एकंदरीत नोकरी विषयक वाटणारी असुरक्षितता हा नोकरीतील कामगिरीवर व करिअर वर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक आहे हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.