– डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर

परवा आमच्याकडे काऊन्सेलिंगसाठी एक तरुण मुलगा आला होता आणि तो एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करतो. तो म्हणाला की तो आणि त्याचा मित्र दोघांना एक कल्पना सुचली आहे आणि त्याचं ते पेटंट (एकस्व) घेऊ इच्छितात. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करताना अनेक वेळा तांत्रिक, व्यवस्थापकीय किंवा उत्पादकतेशी संबंधित कल्पक कल्पना सुचतात. काही कल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण असतात – ज्या भविष्यात पेटंट मिळवू शकतात किंवा व्यवसायाला मोठा फायदा देऊ शकतात. परंतु या कल्पना खऱ्या अर्थाने आपल्याच असतात का? आपण त्या आपल्या नावावर पेटंट करू शकतो का? यासाठी कायदेशीर, नैतिक आणि व्यावसायिक पैलू समजून घेणे आवश्यक आहे.

तुम्ही जर एखाद्या एमएनसीमध्ये कर्मचारी असाल आणि त्या कामाच्या संदर्भात एखादी कल्पना सुचली असेल, तर ती कल्पना तुमच्या कंपनीच्या बौद्धिक संपदेच्या (इंटलेक्चुअल प्रॉपर्टी – आयपी) धोरणाखाली येते. बहुतांश कंपन्यांमध्ये ‘बौद्धिक संपदा करारा’मध्ये असे स्पष्ट असते की, कर्मचारी कंपनीच्या कामाच्या दरम्यान सुचलेल्या सर्व आयपीवर हक्क कंपनीचा असेल. त्यामुळे जर तुम्हाला एखादा विचार कार्यालयात काम करत असताना सुचला असेल – विशेषत: कंपनीच्या संसाधनांचा वापर करून – तर तो तुमच्याऐवजी कंपनीचा मानला जाऊ शकतो. भारतासह अनेक देशांमध्ये पेटंट कायदा असा सांगतो की, कोणतीही नवीन, नाविन्यपूर्ण व औद्याोगिक वापरासारखी कल्पना पेटंट होऊ शकते. पण, पेटंटच्या अर्जात ‘इन्व्हेंटर- संशोधक’ कोण हे सांगितले जाते, आणि ‘असायनी’ म्हणजे मालकी कोणाकडे हे वेगळे सांगितले जाते. एमएनसीमध्ये तुम्ही कर्मचारी असताना जर तुम्ही एखादी नवीन प्रणाली, यंत्रणा, सॉफ्टवेअर अल्गोरिदम इत्यादी तयार केली असेल, तर तुमचं नाव ‘संशोधक’ म्हणून येऊ शकतं, पण पेटंटचा मालक बहुधा कंपनी असेल. जर तुमच्या कल्पनेचा काहीही संबंध कंपनीच्या कामाशी, प्रोजेक्टशी किंवा ग्राहकांशी नसेल आणि ती तुम्ही पूर्णत: वैयक्तिक वेळेत व वैयक्तिक साधनसामग्री वापरून तयार केली असेल, तर ती तुमची वैयक्तिक बौद्धिक संपदा ठरू शकते. मात्र, अनेक कंपन्यांच्या धोरणांमध्ये ‘मूनलाइटिंग’ बाबत काही मर्यादा असतात. काही कंपन्या सांगतात की, कोणतीही आपी तयार करण्यापूर्वी कंपनीला पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही वैयक्तिक प्रकल्पावर काम करत असाल – जो कंपनीच्या व्यवसायाशी संबंधित नाही – तरीही तुम्ही एचआर किंवा लीगल टीमशी सल्ला घेणे योग्य ठरते.

पेटंट अर्ज करण्याची प्रक्रिया अशी असते : जर तुमची कल्पना कंपनीच्या कामाशी संबंधित असेल, तर : तुम्ही ती अंतर्गत इनोव्हेशन प्लॅटफॉर्मवर सादर करता. कंपनी ती तपासून पेटंट अर्ज आपल्या नावावर करेल व तुमचे नाव संशोधक म्हणून दाखवले जाईल. अनेक कंपन्या पेटंट सुचवणाऱ्यांना बक्षीसही देतात. जर वैयक्तिक कल्पना असेल, तर:तुम्ही स्वत: वकिलाच्या साहाय्याने भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पेटंट अर्ज करू शकता. सुरुवातीला प्रोव्हिजनल पेटंट अर्ज करून तुमचा हक्क सुरक्षित करता येतो. तुम्ही जर कंपनीच्या कामाच्या दरम्यान कल्पना सुचवली आणि ती वैयक्तिकपणे वापरायचा प्रयत्न केला, तर कंपनीकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते.

एकूणच आमचा सल्ला असा आहे की तुम्ही कंपनीच्या बौद्धिक संपदा धोरणची सखोल माहिती घ्या. कोणतीही कल्पना सुचल्यावर प्रथम एचआर किंवा लीगल विभागाशी संपर्क साधा. वैयक्तिक प्रकल्प असल्यास, तो कोणत्याही प्रकारे कंपनीच्या संसाधनांवर अवलंबून नाही याची खात्री करा आणि अनुभवी बौद्धिक संपदा वकिलाची मदत घ्या. एमएनसीमध्ये काम करताना बौद्धिक संपदेचा योग्य उपयोग आणि कंपनीच्या धोरणांचे पालन करत, तुम्ही तुमच्या कल्पकतेचा वापर करू शकता – आणि कधीकधी त्यातून तुमच्या नावावर पेटंटही मिळवू शकता, मात्र योग्य मार्गाने गेल्यास!!

bhooshankelkar@hotmail.com/mkelkar_2008@yahoo.com