Jayaram Banan Success Story In Marathi : नोकरीवर पर्मनंट (पर्मनंट म्हणजे कायमस्वरूपी नोकरीवर घेण्याचा निर्णय) होण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इंटर्नशिप, रिटेनर करून छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःला सिद्ध करावे लागते. कॉलेजमध्ये जाण्यासाठी आधी आपल्याला शाळेत जावे लागते. तसेच मोठे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आधी आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करावी लागते. तर आज आपण अशाच एका व्यक्तीची गोष्ट जाणून घेणार आहोत. ज्यांनी एकेकाळी १८ रुपयांमध्ये भांडी धुतली, टेबल साफ केले; पण आज ते ‘डोसा किंग’ म्हणून ओळखले जातात.

जयराम बनन हे कर्नाटकातील उडुपी या किनारी शहरातील रहिवासी आहेत. जयराम बनन यांचा एका साध्या घरात जन्म झाला. लहानपणी ते अभ्यासात फारसे हुशार नव्हते. पण, वयाच्या १३ व्या वर्षी परीक्षेत नापास झाल्यानंतर त्यांनी स्वतःचे जीवन बदलणारा निर्णय घेतला. एक मोठं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी वडिलांच्या खिशातून थोडेसे पैसे घेऊन घरातून निघून गेले.

कोणताही प्लॅन डोक्यात नव्हता आणि खिशातसुद्धा मोजके पैसे होते. तरीही १९६७ मध्ये जयराम मुंबईला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसले. काही दिवसांनी त्यांना एका रेस्टॉरंटमध्ये नोकरी मिळाली. कोणतेही पूर्वकौशल्य नसतानाही त्यांनी भांडी धुणे, टेबल साफ करणे अशा छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात केली. यासगळ्यातून त्यांना फक्त १८ रुपये पगार मिळत असे.

जयराम यांच्या मेहनतीचे हळूहळू त्यांना फळ मिळायला लागले. सहा वर्षांत त्यांचा पगार १८ रुपयांवरून २०० रुपये झाला. अखेर त्यांना वेटर ते रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून बढतीही मिळाली. या काळात त्यांनी मुंबईत दक्षिण भारतीय जेवणाची लोकप्रियता कशी वाढत आहे हे अगदी जवळून पाहिले; ज्यामुळे त्यांच्या डोक्यात भविष्यासाठी एक कल्पना आली.

१९७४ मध्ये जयराम दिल्लीत गेले. दक्षिण भारतीय जेवण दिल्लीतील लोकांसाठी अगदी नवीन गोष्ट होती. मग त्यांनी एक कॅन्टीन चालवण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या बाजारात अन्नाचे कसे व्यवस्थापन करायचे हेदेखील शिकायला मिळाले. त्यामुळे त्यांना स्वतःचे रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी मदत झाली.

पहिले रेस्टॉरंट उघडले (Success Story)

जयराम यांनी १९८६ मध्ये दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये त्यांचे पहिले रेस्टॉरंट सागर रत्न या नावाने उघडले. पहिल्याच दिवशी त्यांच्या रेस्टॉरंटने ४०८ रुपये कमावले. उत्तर भारतात लोक, दक्षिण भारतीय पाककृतींसाठी उत्सुक आहेत हे दाखवण्यासाठी एवढे पुरेस होते. रेस्टॉरंटची लोकप्रियता वाढत असताना, जयराम यांनी दिल्लीच्या लोधी मार्केटमध्ये दुसरे आउटलेट उघडले.

इतर स्पर्धकांपेक्षा २० टक्के जास्त दराने पदार्थ विकले जात असले तरी गुणवत्ता आणि चवीमुळे ग्राहक जयराम यांच्या रेस्टॉरंटमध्ये परत येऊ लागले. त्यामुळे त्यांच्या यशस्वी ब्रँड ‘सागर रत्न’चा पाया रचला गेला आणि लवकरच घराघरात तो लोकप्रिय झाला. प्रथम दिल्ली, नंतर उत्तर भारत आणि इतर अनेक भागांमध्ये ‘सागर रत्न’चा विस्तार वेगाने झाला. आज ‘सागर रत्न’ भारत आणि परदेशात ९० हून अधिक आउटलेट चालवते, ज्यामध्ये कॅनडा, सिंगापूर आणि बँकॉकमधील काही ठिकाणांचा समावेश आहे.

२००१ मध्ये जयरामने ‘स्वागत’ नावाचे आणखी एक रेस्टॉरंट सुरू केले. यामुळे अन्न उद्योगातील एक आघाडीचे उद्योजक म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले. जयराम बनन यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळणारे डोसे आणि सांबार इतके लोकप्रिय होते की, त्यांच्या रेस्टॉरंटबाहेर अनेक किलोमीटरपर्यंत ग्राहक रांगेत उभे असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज जयराम बनन यांना ‘डोसा किंग’ म्हणून ओळखले जाते. फायनान्शियल एक्स्प्रेसनुसार, ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे त्यांचे आता साम्राज्य आहे. जयराम बनन यांची गोष्ट एक डिशवॉशरसुद्धा एक यशस्वी उद्योजक कसा बनू शकतो याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. त्यांची कहाणी भारतातील असंख्य स्वप्न पाहणाऱ्यांना प्रेरणा देत आहे. डिशवॉशर ते यशस्वी उद्योजक हा त्यांचा प्रवास कठोर परिश्रम आणि दृढनिश्चयाच्या एक पुरावा आहे.