डॉ. भूषण केळकर, डॉ. मधुरा केळकर

आपण मागील दोन लेखात असं म्हटलं की कोणती एआय टूल्स ही विशेषतः विविध कार्यक्षेत्रामध्ये नव्यानेच पदार्पण केलेल्या सर्वच युवक-युवतींनी वापरायला आणि जाणून घ्यायला हवीत. त्याची माहिती आपण एकूण तीन लेखांमध्ये देऊ. त्यामधील हा तिसरा लेख.

१. मायक्रोसॉफ्ट को-पायलट आणि झेपीयर एआय : कामांचे स्वयंचलन सोपे करा.

कित्येक वेळा तरुण व्यावसायिकांना पुनरावृत्तीची, कंटाळवाणी कामे करावी लागतात – जसे डेटा कॉपी करणे, रिपोर्ट तयार करणे किंवा ईमेल्स पाठवणे. मायक्रोसॉफ्ट को-पायलट आणि झेपीयर एआय सारख्या साधनांनी हे सर्व ऑटोमेट करता येते.

उदाहरणार्थ, तुम्ही ठरवू शकता की ‘जेव्हा नवीन ग्राहक साइन-अप करेल, तेव्हा झेपीयर आपोआप ईमेल पाठवेल आणि अपडेट करेल.’ अशा प्रकारचे ऑटोमेशन तरुणांना अधिक धोरणात्मक आणि सर्जनशील कार्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मोकळीक देते.

२. रिक्लेम एआय आणि टुडूइस्ट एआय : वैयक्तिक आणि व्यावसायिक संतुलनासाठी.

आजची तरुण पिढी वर्क लाइफ बॅलन्स साधण्यासाठी झगडते. रिक्लेम एआय हे टूल तुमचे कॅलेंडर आणि वैयक्तिक उद्दिष्टे (जसे व्यायाम, वाचन, विश्रांती) यांना स्वयंचलितपणे शेड्यूलमध्ये समाविष्ट करते.

तर टुडूइस्ट एआय तुमच्या कामांच्या प्राधान्यक्रमावरून बुद्धिमत्तेने स्मार्ट वेळापत्रक सुचवते.

३ . मानसिक स्वास्थ्य आणि कार्यक्षमता संतुलित ठेवणारी एआय ॲप्स

कामाच्या दडपणात मानसिक संतुलन राखणे तितकेच आवश्यक आहे. यासाठी विसा (Wysa), रेप्लिका , आणि माइंडसेरा सारखी एआय आधारित वेलबीइंग ॲप्स उपलब्ध आहेत.

ही ॲप्स संवादाद्वारे तुमचा मूड समजून घेतात, तणाव व्यवस्थापनाचे उपाय सुचवतात, आणि मन शांत ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतात. एआय आता केवळ उत्पादकतेसाठी नव्हे तर मानसिक आरोग्यासाठी देखील एक सहाय्यक बनत आहे.

काही जणांना भीती वाटते की एआयमुळे नोकऱ्या कमी होतील. पण वास्तविकता अशी आहे की, तरुणांनी जर ही साधने योग्य प्रकारे आत्मसात केली, तर त्यांचे कामकाज जलद, सुबोध, आणि परिणामकारक बनेल – आणि त्यांना त्यांच्या कारकिर्दीत अधिक संधी मिळतील. एआय साधने आजच्या तरुण व्यावसायिकांसाठी केवळ एक तांत्रिक सुविधा नाहीत, तर एक जीवनशैलीतील परिवर्तनाचे साधन आहेत.

आपण गेल्या ३ लेखात एकूण २० एआय टूल्स बघितली. ही अत्यंत सोपी आणि मोबाइल वापरू शकणाऱ्या सर्वांसाठी अत्यंत सुलभ आहेत. ही सर्व साधने तरुणांना त्यांच्या उत्पादकतेचा नवा स्तर गाठण्यासाठी, वेळेचा उत्तम वापर करण्यासाठी आणि जीवनात संतुलन राखण्यासाठी सहाय्य करतात.

गेल्या दोन लेखांच्यापासून आणि खरंतर त्या आधीपासूनच आम्हाला बरेच वेळा विचारण्यात आलं आहे की आम्ही कला शाखेतले किंवा वाणिज्य शाखेतले आहोत आणि म्हणजे शास्त्र किंवा इंजिनीअरिंग मधील नाही; किंवा ३०-३५ वर्षाच्या पुढचे आहोत; तर आम्हाला एआय आणि एआय टूल्स शिकणे अवघड होईल का? त्याचं मी तुम्हाला एक साधं सोपं उत्तर सांगतो : तुम्ही महाराष्ट्रात कुठेही “इथे आठवड्याभरात चॅट जीपीटी शिकवून मिळेल नाहीतर पैसे परत” अशी जाहिरात पाहिली आहे का?

जसं चॅटजीपीटी, कोपायलट हे शिकण्यासाठी कुठल्याही क्लासची गरज नसून ते स्वतःच स्वतः शिकता येतं, त्याच धर्तीवर थोडा वेळ खर्च करून, थोडा प्रयत्न करून आणि ज्याला आपण ‘कॉमन सेन्स’ म्हणतो तो वापरून, ज्यांना ज्यांना मोबाइल वापरता येतो अशा सर्वांना, शिकता येतात!

एआय टूल्सच्या एकदिवसीय कार्यशाळा आम्ही आमच्या सहकाऱ्यांसोबत, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात, अनेक वेळा घेतल्या आहेत आणि त्यात वय वर्ष १२ चा मुलगा ते ८३ वर्षाच्या आजी या सर्वांना १५ ते २० टूल्स स्वतःला त्यांच्या त्यांच्या मोबाइलवर सहज वापरता आली आहेत, आता बोला !!

भविष्यातील यश हे फक्त ज्ञानावर नाही, तर त्या ज्ञानाचा एआयच्या साहाय्याने केलेल्या बुद्धिमान उपयोगावर अवलंबून असेल. म्हणूनच आजच एआयला आपला स्मार्ट सहकारी बनवा – आणि उद्याच्या जगातील ‘पहिले पाऊल’ दमदार टाका !!