मिलिंद आपटे
१) मी २०१९ ची इंजिनीअरिंग पदवीधर आहे. त्यानंतर मी तीन वर्षे आयटीत नोकरी केली, आणि याच वर्षी माझे लग्न झाले. लग्नांआधी मी माझा नोकरी सोडली. पण आता घरी बसून मला एमपीएससीची आवड निर्माण होत आहे आणि मी अभ्यास देखील सुरू केला आहे. मला माझ्या मेहनतीवर पूर्ण विश्वास आहे आणि आता माझे ध्येयही हेच आहे. मला रोज किती अभ्यास केला पाहिजे आणि अभ्यासाची स्ट्रॅटेजी काय हवी, याचे कृपया मार्गदर्शन करावे.

– अमृता

— पाच वर्षे आयटीत जॉब करून एमपीएससीचे ध्येय ठेवताय, नक्कीच धाडसाचे आहे, माझ्या खूप शुभेच्छा. सर्वात प्रथम राज्य सेवा पूर्वपरीक्षेसाठी ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाचे मन लावून वाचन करावे. मागील कमीत कमी दहा वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे संकलन आणि वाचन, प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अध्ययन साहित्य जमवणे, अभ्यास नियोजन, सराव प्रश्नपत्रिका सोडवणे.

बाजारात उपलब्ध असलेल्या मार्गदर्शक साहित्यावर अवलंबून न राहता विषयांची संदर्भ पुस्तके वाचणे उत्तम . जसे विज्ञान, भूगोल या विषयांसाठी आठवी ते दहावीपर्यंतच्या शालेय पाठ्यपुस्तकांचे वाचन.

प्रत्येकाने आपल्या वाचनाचा, पाठांतराचा वेग लक्षात घेऊन अभ्यासाचे नियोजन करावे. ठरावीक दर्जेदार पुस्तकांचीच उजळणी करणे उत्तम. सुरुवातीला प्रत्येक घटकाचे प्राथमिक वाचन करावे. मग द्वितीय वाचन शांतपणे करावे. यात न समजलेला भाग अधिक चांगल्या पद्धतीने वाचण्यावर भर द्यावा.

एक अभ्यासू वृत्ती जोपासावि लागेल , वृत्तपत्रातील फक्त बातम्यांकडे भर द्यावा, तूर्तास संपादकीय टाळावे, मिळालेल्या माहितीच्या आधारे तुमचे मत आधी तयार करण्याची क्षमता तयार करावी मग संपादकीय वाचावे.

२) सर मी आता कला या शाखेत पहिल्या वर्षात आहे आणि मला दहावीत ६०% होते आणि (कला शाखा)बारावीत ७९% होते. मला बारावी पासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण झाली. मला यूपीएससी परीक्षेत प्रवेश घेऊन पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण व्हायचे आहे त्या अनुषंगाने मला तयारी कुठून आणि कशी करायला हवी?

– राहुल सिंग

‘मला यूपीएससी परीक्षेत प्रवेश घेऊन पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण व्हायचे आहे’ हेच ध्येय ठेवून तयारी करावी , कला शाखेत प्रथम वर्षात आहात , विषय आपण कळवले नाहीत असो…

यूपीएससी परीक्षेसाठी अनिवार्य विषयांचा अभ्यासक्रम सामान्यतः पुस्तकांमधून घेतला जात नाही. सर्वप्रथम अभ्यासक्रम चांगल्या प्रकारे समजून घेणे. जर तुम्हाला अभ्यासक्रम चांगला समजला तर संबंधित पुस्तके मिळवणे आणि संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करणे सोपे होईल.

यूपीएससी परीक्षेसाठी अनिवार्य विषयांचा अभ्यास करण्यासाठी योग्य पुस्तक निवडणे खूप महत्त्वाचे आहे. तज्ज्ञांनी शिफारस केलेली पुस्तके निवडा. चालू घडामोडींबद्दल अपडेट राहणे अत्यंत आवश्यक आहे.

यूपीएससीच्या संपूर्ण प्रवासात संतुलित मानसिकता राखणे. मानसिक आरोग्य हे शैक्षणिक तयारीइतकेच महत्त्वाचे आहे. शारीरिक हालचालींमध्ये सहभागी व्हावे आणि ताण प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी सराव करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खूप शुभेच्छा