आदिवासींच्या जगण्यातला अतिशय महत्त्वाचा भाग असलेला मोह वृक्ष महिलांच्या सौंदर्यात भर घालू शकेल का, हा विचार गावातून शहरात शिकायला गेलेल्या एका मुलाच्या मनात आला आणि त्यातून मोहाच्या बियांपासून तयार होणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांचे स्टार्टअप उभे राहिले. सार्जेनिक व्हेंचर्स प्रा. लि. असे या कंपनीचे नाव असून तिच्या ‘सोहराई ब्युटी’ या नावाच्या उत्पादनांविषयी सांगत आहेत कंपनीचे संस्थापक रुपेश पवार.

नांदेड जिल्ह्यात लसनवाडी नावाच्या एका खेडेगावातला माझा जन्म आणि शिक्षण. अभ्यासात हुशार होतो. नांदेडच्या यशवंत महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकलो. सीईटीत खूप चांगले गुण होते. घरच्यांचा पाठिंबा होता. नांदेडमध्ये अभियांत्रिकीपेक्षा वैद्यकीय शिक्षणाकडे तरुणांचा अधिक कल आहे. घरच्यांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे, पण मेडिकलला जाण्याइतके पैसे नव्हते. शिवाय माझा कल अभियांत्रिकीकडे होता. मला रसायनशास्त्रात रस होता. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत केमिकल टेक्नॉलॉजी प्रवेश मिळाला. २०२० ला पदवी मिळाली. इतर अनेक मुलांप्रमाणे अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचेच माझे स्वप्न होते. पण पदवी मिळण्याआधी काही महिने कोविड आला आणि मला गावी जावे लागले. आमच्या गावात मोहाची खूप झाडे आहेत. माझी आई, मावशी सर्व पहाटे उठून मोहाची फुले गोळा करायची. गावात मोहाची दारू भरपूर बनायची. दरम्यान, केवळ बसून राहण्यापेक्षा मी गावात शिकवणी सुरू केली. हळूहळू ७० मुले माझ्याकडे शिकायला येऊ लागली. यापैकी काही आदिवासींची मुले होती. त्यांच्यासोबत गावात फिरायचो. मोहाच्या फुलापासून इथेनॉल बनतं, त्यामुळे सॅनिटायझर बनू शकते, हा विचार मी केला.

मोहाचा मोह

मे महिन्यात मोहाच्या झाडाला फुले येतात. जूनमध्ये फळे लागतात. त्याच्या बिया गोळा केल्या जातात. या बियांपासून तेल काढून त्याचा वापर जेवणात, कुठे काही दुखले खुपले तर त्यावर लावण्यासाठी करतात. केसांनाही तेच तेल लावतात. हे पाहिल्यावर मला लक्षात आले की याचे जर इतके उपयोग होऊ शकत असतील तर यापासून नक्कीच काही करता येईल. दरम्यान, कोविडची लाट थोडी ओसरल्यावर मला कॅम्पस इंटरव्ह्यूमधून रिलायन्स कंपनीत नोकरी मिळाली. पण तिथे वर्क फ्रॉम होम असूनही मला ती नोकरी रुचेना. एक्सेल शीट भरण्यापलीकडे त्यात काही वाव नव्हता, दोन-तीन महिन्यांत मी नोकरी सोडली आणि एका स्टार्टअपमध्ये नोकरी केली. तेथे मी वर्षभर काम केले. कॉस्मेटिक फॉर्म्युलेशन्स मी तेथे करत होतो. डोक्यातून मोहाच्या बियांचा विचार जात नव्हता. मग त्यावरही संशोधन कर, माहिती गोळा कर असं सुरू होतं. काही बिया मी मुंबईला घेऊन आलो होतो, आयसीटीच्या प्रयोगशाळेत त्यावर प्रयोग सुरू केले.

स्टार्टअपचं स्वप्न

अमेरिकेत जाण्याचं खूळ डोक्यातून निघून त्या जागी आता स्टार्टअपचं स्वप्न मूळ धरू लागलं. डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीची (डीबीटी) एक फेलोशिप असते सोशल इनोव्हेशन इमर्शन प्रोग्राम, त्यासाठी मी अर्ज केला. त्याद्वारे व्हेंचर सेंटर, पुणेमध्ये मला मुग्धा लेले आणि सेंटरचे संचालक डॉ. प्रेमनाथ यांच्यासारखे मेंटॉर लाभले. पाच लाख रुपयांचा निधी मिळाला आणि मी नोकरी सोडली. आणि माझ्या संकल्पनेवर काम सुरू केले. त्या फेलोशिपमध्ये सहा महिने देशभर फिरून आपण हाती घेतलेली समस्या आणि त्यावरील उपाय म्हणजे आपली संकल्पना ही खरेच गरजेची आहे का, तिची व्याप्ती किती याचा अभ्यास करायचा होता. सहा महिन्यांत मी अनेक राज्यांतील जंगले फिरलो.

मोहाच्या बिया

मोहाच्या बिया खूप जास्त प्रमाणात तयार होतात, त्यातील अत्यंत कमी प्रमाणातील बियांपासून तेल निघते. बाकीच्या बिया वाया जातात. मी त्या बियांपासून अत्यंत रिफाइंड तेल बनवले आणि त्या तेलापासून विशिष्ट प्रक्रिया करत बटर बनवले. शिया, पाम, कोका बटरची अनेक सौंदर्यप्रसाधने बाजारात आहेत. पण ही उत्पादने इंडोनेशिया, मलेशिया, आफ्रिका येथून आपल्या देशात येतात आणि ती खूप महाग असतात. त्यांना जर उत्तम भारतीय पर्याय देता आला तर तो खूपच स्वस्त आणि तितकाच उत्तम गुणवत्तेचा असेल असा विचार करून मी त्या मोहाच्या बटरपासून विविध उत्पादने करायचे ठरवले. त्या मोहाच्या बटरचे पेंटटही माझ्या नावावर आहेत. फेलोशिपनंतर मला डीबीटीचा आणखी दहा लाखांचा निधी मिळाला आणि त्यातून ही उत्पादनांच्या प्रक्रियेवर काम करता आले.

सार्जेनिक व्हेंचर्सची सुरुवात

एकदा रेल्वेच्या जागृती यात्रेद्वारे भारत फिरत असताना माझी ट्रेनमध्ये माझी खनक गुप्ता हिच्याशी ओळख झाली. तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी घेतली आहे आणि ती अमेरिकेत नोकरी करत होती. तिला ही संकल्पना आवडली आणि तिने ऑक्टोबर २०२३ पासून या स्टार्टअपला जॉइन केले. मग आम्ही ही सार्जेनिक व्हेंचर्स प्रा. लि. कंपनी सुरू केली. खनक गुप्ता कंपनीची सहसंस्थापक आहे आणि माझी बहीण शिवानी पवार कंपनीची संचालक आहे.

सोहराई

आदिवासी जमातींच्या एका विशिष्ट उत्सवाचे नाव ‘सोहराई’ आहे. दिवाळीच्या आसपास हा सण साजरा होतो. या दिवसांत कापणी झालेली असते. या सणाला गोधनाची पूजा करून निसर्गाचे आभार मानले जातात. त्यामुळे हे नाव आमच्या उत्पादनांना योग्य वाटले.

फेस वॉश, लीप बटर, फेस क्रीम, फेस क्लिंझर आणि मॉस्किटो शिल्ड अशी आमची पाच उत्पादने सध्या बाजारात आहेत. ही सोहराई नावाने असलेली उत्पादने नायका, अमेझ़ॉनसारख्या इ कॉमर्स संकेतस्थळांवर तसेच आमच्या स्वतःच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत आणि त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही सर्व उत्पादने मोहापासून तयार केलेली आहेत. ती स्कीन फ्रेंडली, नैसर्गिक, सिलिकॉन फ्री, मिनरल ऑइल फ्री आहेत. नायका कंपनीकडून आम्हाला २०२४ चा बेस्ट इम्पॅक्ट पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी खनक हिला व्हिजनरी अवॉर्ड मिळाला. आमचे कार्यालय पुणे येथे व्हेंचर सेंटरमध्ये तर गोदाम आणि उत्पादन मुंबईला तयार होतात. सरकारच्या वन धन केंद्रांमधून आम्ही मोहाच्या बिया, तेल घेतो. त्यामुळे ग्रामीण महिलांनाही रोजगार मिळतो.

स्टार्टअप सुरू करण्यासाठी निधी, चांगली प्रयोगशाळा, चांगली टीम गरजेची असते. सध्या सरकारच्या अनेक योजना यासाठी आहेत, त्यामुळे तुमची संकल्पना उत्तम असेल तर तुम्ही नक्की एक चांगले स्टार्टअप उभारू शकता, असे मी तरुणांना सांगेन.

(शब्दांकन : मनीषा देवणे)