अभिवृत्ती चाचणी – सी सॅट
उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांचे आकलन या पेपरमधून तपासले जाते. या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी पाठांतराचा फारसा उपयोग नाही. ऐनवेळी समोर आलेल्या प्रश्नांना विचारपूर्वक प्रतिसाद द्यायचा असतो आणि हा प्रतिसाद म्हणजे उत्तर बरोबर असावे लागते. एकूण २०० गुणांसाठी ५६ पानी पेपरमध्ये एकूण ८० प्रश्न प्रत्येकी २.५ गुणांसाठी विचारण्यात येतात. आणि त्यातील ७५ प्रश्नांसाठी प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे एक चतुर्थांश (२५%) गुण वजा करण्यात येतात. पेपरचे व प्रश्नांचे हे स्वरूप लक्षात घेता हा पेपर, पेपर एक पेक्षा जास्त अवघड, जास्त आव्हानात्मक समजला जातो.
राज्य सेवा पूर्व परीक्षेचा अनुभव
सन २०१३ पासूनच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेतील कट ऑफ लाईनच्या विश्लेषणावरून पेपर दोन हा परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये पेपर एकपेक्षा जास्त योगदान देतो हे वारंवार सिद्ध झाले आहे. उमेदवारांना प्रत्येकी २०० पैकी पेपर एक मध्ये सर्वसाधारणपणे ६० ते ८५ तर पेपर दोन मध्ये ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. म्हणून सी सॅट हा अनावश्यक दडपण न घेता तयारी करायचा विषय आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण उमेदवारांनी सोडविलेल्या प्रश्नांचे आणि त्यांच्या गुणांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात.
ज्या उमेदवारांनी निगेटिव्ह मार्किंगच्या हिशोबाने ठराविक मार्क मिळविण्याचे उद्दीष्ट ठरवून त्यासाठी किती प्रश्न सोदवावे लागतील हे लक्षात घेऊन पेपर सोदविला त्या उमेदवारांना तुलनेने कमी प्रश्न सोडवूनही चांगले गुण मिळाले आहेत. जास्तीत जास्त पेपर कव्हर करण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनावधानाने होणाऱ्या चुका (सिली मिस्टेक्स) जास्त होतात आणि जास्त प्रश्न सोडवूनही नकारात्मक गुणपद्धतीमुळे मार्क खूप कमी होतात.
ठराविक मार्कांचे उद्दिष्ट ठरविले की किती प्रश्न सोडवायचे याची मर्यादा आखून घेता येते. आणि ताण कमी होऊन नकारात्मक गुण ओढवून घेणाऱ्या चुका टाळता येतात.एकूण ८० पैकी ५ निर्णय क्षमतेचे प्रश्न वजा केले तर ७५ पैकी ५० ते ६०प्रश्न सोडविणे हे उद्दीष्ट असायला हरकत नाही. मात्र अचूकपणे सोडविता येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सरावाने वाढविणे आवश्यक आहे.
ज्या उमेदवारांनी आपल्या सरावाचे विश्लेषण करून आपले कम्फर्ट झोन आणि आव्हानात्मक वाटणारे प्रश्नप्रकार शोधले आणि त्यावर आधारीत सराव केला त्यांना सी सॅट पेपरमध्ये चांगले गुण मिळाले आहेत.
पूर्वतयारी
वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी व पेपर सोडविणे या दोन्हीसाठी योजना ठरवायला हवी.या पेपर मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे असतील तर सरावाशिवाय पर्याय नाही. सराव बरोबर उत्तरे शोधण्याचाही आणि वेळेच्या मर्यादेत बरोबर उत्तरे शोधण्याचाही! त्यामुळे वेळेचे नियोजन करून बरोबर उत्तरे शोधण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल.
आधी प्रश्नांचे स्वरुप ओळखीचे होईपर्यंत वेळ न लावता ते सोडवायचे. एकदा प्रश्नप्रकार ओळखीचा झाला की मग वेळ लावून कमीत कमी वेळेत तो सोडवायचा सराव करायचा. अशी तयारी जास्त परीणामकारक ठरते.
सरावासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका. यांच्या सरावातून कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे, कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच अवघड वाटतो या बाबी व्यवस्थित समजून घेता येतील आणि तयारीची दिशा ठरवता येईल.
जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितका सक्सेस रेट जास्त असतो हे खरेच. पण जेवढ्या प्रश्नपत्रिका सोडविल्या असतील त्यांचे विश्लेषण करून स्पर्धेत आपण कुठे आहोत आणि अजून किती आणि कोणती तयारी गरजेची आहे याचा वारंवार आढावा आवश्यक आहे.
सरावामध्ये सर्वात आधी तयारी करावी थोड्याफार तयारीने आत्मविश्वास वाढू शकेल अशा घटकांची, त्यानंतर आत्मविश्वास असलेल्या घटकांचा सराव करावा. पेपर दोनमध्ये ५३ ते ६० पानी पेपर व ऐनवेळी आकलन व विश्लेषण करून सोडविण्याचे प्रश्न असे स्वरूप असल्याने खूपच कठीण वाटणारे प्रश्न ऐनवेळच्या तयारीचा भाग होऊ शकत नाहीत. अशा घटकांसाठी थोडा जास्त वेळ लागतो व त्यांचा समावेश लाँग टर्म व्यवस्थापनामध्ये असणे आवश्यक असते.
आयोगाचा साधारणपणे ५० पेक्षा जास्त पानांचा पेपर १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. सलग सोडवत गेले तर ८० व्या प्रश्नापर्यंत पोचणासाठी दिलेला वेळ कधीच पुरणार नाही. यासाठी अवघड वाटणारे उतारे आणि प्रश्न बाजूला ठेवून गुण मिळवून देणारे प्रश्न आधी सोडविणे आवश्यक असते. पुरेसा सराव केलेला असेल तर उतारा किंवा प्रश्नाच्या सुरूवातीलाच तो वेळेत सोडविता येईल की नाही हे चटकन लक्षात येते. अवघड प्रश्न / उतारा बाजूला ठेवून मार्क देणाऱ्या प्रश्नाकडे वळता येते.
सी सॅट मध्ये १०० ते १२० गुण मिळवायचे असतील तर उत्तीर्ण होण्यासाठी २५% निगेटिव्ह मार्किंगचे गुण वजा करता एकूण किमान ४० ते ५० प्रश्नांचे गुण आवश्यक ठरतील. त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसलेले शेवटचे पाच प्रश्न आणि निगेटिव्ह मार्किंग असलेले कमाल ५० ते ५५ प्रश्न असे एकूण जास्तीत जास्त ५५ ते ६० प्रश्न सोडवायचे उद्दिष्ट योग्य ठरेल.
प्रत्यक्ष तयारीबाबत पुढील लेखांमध्ये पाहू.