‘चालू घडामोडी’ हा घटक नव्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी म्हट्ले तर इंटरेस्टिंग आणि म्हटले तर आव्हानात्मक ठरतो. खरे तर हा सामान्य अध्ययनाच्या सिलॅबस मधील नुसता काही मार्कांसाठी विचारला जाणारा केवळ एक घटकविषय नाही तर अभ्यासक्रमांतील प्रत्येक विषयाशी अनिवार्यपणे जोडलेला घटक आहे. घटक विषय कोणताही असो, बहुतेक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर एखादी राज्य – राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटना असतेच हे समजून घ्यायला हवे. म्हणून चालू घडामोडी हा अभ्यासाचा एक भाग न मानता तो अभ्यासाचा ‘बेस’ बनला पाहिजे. प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाच्या आधारे या घटकाची तयारी करताना पुढील मुद्दे लक्षात घ्यावेत:
जागतिक चालू घडामोडी
● यामध्ये क्रीडा, पुरस्कार, संमेलने, विज्ञान, व्यक्तीविशेष याबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बाबी येतात.
● विश्व चषक, ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा, इतर महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, त्यातील विक्रम, भारत / महाराष्ट्र यांची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.
● साहित्य क्षेत्रातील आंतरराष्टीय पुरस्कार, चर्चेतील महत्त्वाची पुस्तके व त्यांचे लेखक, चर्चेतील लेखकांबाबतच्या महत्त्वाच्या बाबी पहाव्यात.
● चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, संशोधन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात. भारतातील व्यक्तींना हे पुरस्कार मिळाले असल्यास त्यांच्या बाबतची अतिरिक्त माहिती असणे आवश्यक आहे.
● महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था तसेच संघटना यांची स्थापना, उद्देश, ठळक कार्ये, ब्रीदवाक्य, त्याचा भारत सदस्य केंव्हा झाला, भारताची संघटनेतील भूमिका, संघटनेचा नवीन ठराव किंवा इतर चर्चेतील मुद्दे या आधारावर तयारी करावी.
● आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे निर्देशांक व त्यातील भारताचे स्थान, निर्देशांक / अहवाल प्रकाशित करणारी संस्था / संघटना, महत्त्वाच्या निर्देशांकांचे निकष, त्यातील भारताचे अद्यायावत व मागील वर्षीचे स्थान हे मुद्दे लक्षात घ्यावेत.
सामान्य अध्ययन घटकांशी संबंधित चालू घडामोडी
● यामध्ये निवडणुका, नवीन विधेयके, धोरणे, कायदे या राज्यव्यवस्था घटकाशी संबंधित बाबी पहायला हव्यात. भारताचे द्वीपक्षीय तसेच संघटना सदस्य म्हणून आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाचा भाग आहेत. शासकीय धोरणे व चर्चेतील महत्त्वाचे निर्णय यांमधील महत्त्वाच्या तरतुदी समजून घ्याव्यात. नवीन धोरणांशी संबंधित आधीच्या धोरणांचा आढावा घेता आल्यास उत्तम.
● पर्यावरणाशी संबंधित वन अहवाल, प्रदूषणाशी संबंधित निर्देशांक, हवामान बदलाशी संबंधित अद्यायावत घडामोडी, संमेलने व त्यातील ठराव, कवउठच्या याद्यांमध्ये समाविष्ट भारतातील प्रजाती, असल्यास हरित न्यायाधिकरणाचे चर्चेतील निर्णय यांचा आढावा घ्यावा.
● अर्थव्यवस्था घटकाच्या चालू घडामोडींचा अभ्यास कशा प्रकारे करावा याबाबत स्वतंत्र लेखामध्ये याआधी चर्चा करण्यात आली आहे.
● खगोलशस्त्रीय शोध, वैज्ञानिक शोध, तंत्रज्ञानविषयक अद्यायावत माहिती, भारताचा सहभाग असलेले महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय प्रकल्प यांवा आढावा घ्यावा.
● साथीचे रोग, त्यावरचे उपाय, जागतिक आरोग्य संघटनेच्या महत्त्वाच्या घोषणा यांचा आढावा घ्यायला हवा.
योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी प्रश्नांचे नेमके स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मागील वर्षाच्या प्रश्नप्रत्रिकांचे नियमित वाचन आणि विश्लेषण करायला हवे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात आले की, नेमके काय वाचायला हवे, ते कळते. वृत्तपत्रांतील ‘बातमी’ आणि स्पर्धा परीक्षेविषयी आवश्यक ‘माहिती’ यातला फरक परीक्षार्थीनी जाणून घेणे आवश्यक आहे.
अभ्यास नेमका काय करायचा, कशाचा करायचा आणि कोणत्या संदर्भ साहित्यातून करायचा हा अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास. उमेदवारांचा एक कॉमन अनुभव असा आहे की एका विषयाची, घडामोडीची माहिती वेगवेगळ्या दोन तीन संदर्भ पुस्तकात पाहिली की संभ्रम वाढतो. चालू घडामोडींबाबत हे जसेच्या तसे लागू पडते. एखादे दुसरे गाईड पाहून किंवा एकच स्त्रोत हाताळा आणि अभ्यास संपवा हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही.
आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहिल्या की ही मर्यादा आपल्या लक्षात येते. त्यामुळे किमान दोन संदर्भ वापरून माहितीची पडताळणी करुन मगच नोट्स काढणे आवश्यक आहे.
भारतातील आणि राज्यातील चालू घडामोडी
● केंद्र आणि राज्य शासनाच्या मागील पाच ते सात वर्षांमधील महत्त्वाच्या योजनांचे उद्दीष्ट, सुरू झालेले वर्ष, तरतुदी, लाभार्थ्यांचे निकष, अंमलबजावणी यंत्रणा, असल्यास अपवाद, असल्यास कालमर्यादेतील उद्दीष्टे यांचा टेबलमध्ये नोट्स काढून अभ्यास करावा. यामध्ये नव्या आणि प्रसिद्धी देण्यात येणाऱ्या योजनांवर भर देणे आवश्यक आहे.
● संरक्षण घटकामध्ये भारतातील क्षेपणास्त्रे, रणगाडे, लढाऊ विमाने, पाणबुड्या, युद्धनौका, रडार व इतर यंत्रणा यांचे नाव, प्रकार, वैशिष्ट्य, वापर, असल्यास अद्यायावत चाचणीचे परिणाम, भारतात विकसित करणारी संस्था किंवा विदेशातून आयात केले असल्यास सबंधित देश व कंपनी या मुद्द्यांच्या आधारे टेबलमध्ये नोट्स काढाव्यात.
● भारताचे शेजारी देशांशी असलेले विवाद किंवा नवे संयुक्त प्रकल्प दोन्हीचाही परिपूर्ण आढावा घेणे आवश्यक आहे. तसेच इतर देशांशी भारताने संयुक्तपणे सुरू केलेले प्रकल्प, युद्धाभ्यास यांचाही आढावा घेणे आवश्य्क आहे.
● राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा, त्यातील विजेते, महाराष्ट्राची कामगिरी यांचा आढावा घ्यायला हवा.
● राष्ट्रीय स्तरावरील साहित्य, चित्रपट, संगीत, पत्रकारिता, प्रशासन, शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार तसेच पद्मा पुरस्कार, शौर्य पुरस्कारप्राप्त व्यक्ती माहीत असाव्यात.
● महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, राज्य स्तरावरील महत्त्वाची संमेलने यांची माहिती असायला हवी.
● चर्चेतील व्यक्ती, त्यांचे कार्यक्षेत्र, नियुक्त्या, निवड, बढती यांचा आढावा घ्यायला हवा.
● महत्त्वाची साहित्यिक, सांस्कृतिक संमेलने, त्यांचे आयोजक, ठिकाण, अध्यक्ष, पूर्वीच्या संमेलनाचे अध्यक्ष आनी इतर ठळक माहितीच्या नोट्स काढाव्यात.