सन २०२२-२३ पासून आयोगाकडून राजपत्रित पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे स्वरूप बदलण्याबाबतच्या महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा केली जात आहे. या बदलांप्रमाणे राजपत्रित पदांवसाठीच्या परीक्षांच्या मुख्य परीक्षा या वर्षीपासून सुरू होतील फक्त राज्यसेवा मुख्य परीक्षा ही बदललेल्या पॅटर्ननुसार सन २०२५ पासून सुरू होईल. आयोगाकडून वेळोवेळी अभ्यासक्रम, परीक्षा पद्धत, गुणांकन, प्रश्नप्रकार अशा बाबतीत कालानुरुप बदल करण्यात येतात. राज्य लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घोषित केला, की त्या बाबत खूप चर्चा, विरोध, नाराजी अशा प्राथमिक प्रतिक्रिया ठरलेल्या असतात. काही वेळा उमेदवारांकडून आयोगाबाबत काही अपेक्षाही व्यक्त केल्या जातात. बदलांचे स्वागतही होते पण बरेच वेळा विश्लेषण मांडले गेल्यावर आणि बदलांचा फायदा होणार हे कळल्यावर.

सन २०२१मध्ये आयोगाकडून वेगवेगळ्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल किती वेळा संधी घेता येईल आणि या संधी कशा प्रकारे मोजल्या जातील याबाबतची घोषणा करण्यात आली तेंव्हा संधींची मर्यादा आखण्याचे UPSC चे धोरण तर आयोगाने स्वीकारले, पण मग याच धर्तीवर पूर्व परीक्षेतील सी सॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याबाबत निर्णयही आयोगाने घ्यावा, परीक्षाही वेळच्या वेळी नियमितपणे घ्याव्यात, भरतीसाठी भरपूर पदेही उपलब्ध करून द्यावीत असा सूर उमटू लागला. यातील बऱ्याच अपेक्षा आयोगाकडून पूर्ण होताना दिसत आहेत. संधींची मर्यादा घालून देणारा निर्णय आयोगाने नंतर मागे घेतला आहे. आयोगाने UPSCच्या धर्तीवर सीसॅट पेपर क्वॉलिफाइंग स्वरूपाचा करण्याच्या निर्णयाची घोषणा केलेली आहे आणि त्याचे सर्वच उमेदवरांकडून जोरदार स्वागतही झाले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mpsc mantra increasing opportunities in public service commission competitive exams amy
First published on: 12-04-2024 at 10:11 IST