एआयच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठीचा एक मार्ग म्हणजे या संदर्भातली उमेदवारी (इंटर्नशिप) शोधणं. याचं कारण म्हणजे थेट नोकरी द्यायला अनेक कंपन्या तयार नसतात. त्यांना संबंधित उमेदवार दिलेलं काम कशाप्रकारे करू शकतो, हे आधी बघायचं असतं. जर दिलेलं आव्हान तो नीट प्रकारे हाताळू शकत असेल तर त्याला नोकरीवर घेण्याचा विचार कंपनी करू शकते. साहजिकच अशा प्रकारची उमेदवारी मिळवण्यासाठीचे जोरदार प्रयत्न या क्षेत्रात येऊ पाहत असलेल्या तरुण-तरुणींनी करणं गरजेचं आहे. यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, याची ही तोंडओळख.
अगदी पहिली गोष्ट म्हणजे आपण एखाद्या कंपनीसाठी कुठल्याही प्रकारचं कम करणार असू, तर त्यापूर्वी आपल्याकडे त्यासाठीची किमान कौशल्यं तरी असायला हवीत. म्हणजेच फक्त आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण झालं किंवा होत आलं म्हणून आपण अशी उमेदवारी करण्यासाठी सक्षम आहोत; असं अजिबात नसतं. पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष विश्वातलं काम यांच्यामध्ये कमालीचा फरक असतो. खास करून आपलं महाविद्यालय किंवा आपलं विद्यापीठ अगदी पारंपारिक पद्धतीचे अभ्यासक्रम चालवत असेल किंवा आपल्याला शिकवणारा प्राध्यापक वर्ग पुस्तकी प्रकारचा असेल तर आपल्या पदवीचा कामासाठी अक्षरश: नगण्य उपयोग असतो, हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. साहजिकच आपल्याला जिथून शिकणं योग्य आणि परवडण्यासारखं वाटत असेल तिथून पायथन भाषा, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, नॅचरल लँग्वेज प्रॉसेसिंग (एनएलपी) यासारख्या एआयशी संबंधित असलेल्या विषयांचा तसंच माहिती साठवणं, मिळवणं, दाखवणं यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठीच्या अभ्यासक्रमांची पूर्वी माहिती दिलेलीच आहे. तसंच संख्याशास्त्राचीही ओळख करून घ्यायला हवी.
आपण शिकलेल्या गोष्टी लोकांसमोर कशा आणणार? अर्थातच यासाठी एआयशी संबंधित असलेले निरनिराळे प्रश्न घेऊन ते सोडवण्यासाठी स्वत: छोटे प्रकल्प हाती घेणं गरजेचं आहे. यासाठी ‘कॅगल’सारख्या संकेतस्थळावर असंख्य प्रश्न उपलब्ध असतात. ते इतरांनी कसे सोडवले आहेत याचा अभ्यास करणं आणि स्वत: मुळापासून प्रयत्न करून ते सोडून दाखवणं यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. उदाहरणार्थ संख्याशास्त्रामधल्या ‘रिग्रेशन’ या संकल्पनेचा वापर करून घराचा आकार, त्यामधल्या खोल्या इत्यादि माहितीच्या आधारे घराची किंमत किती असेल याविषयीचा अंदाज बांधण्यापासून चित्रामध्ये दाखवलेली वस्तू ओळखण्यापर्यंतची असंख्य आव्हानं यात विचारात घेता येतील. आपण केलेलं काम पुन्हा या कॅगलच्याच संकेतस्थळावर आपल्याला ठेवता येतं, तसंच जगभरात प्रसिद्ध असलेल्या गितहबच्या संकेतस्थळावरही हे सादर केलं पाहिजे. याचं कारण म्हणजे कंपन्यांशी आपण जेव्हा उमेदवारीसाठी संपर्क साधतो तेव्हा कंपन्यांना ते अपेक्षित असतं.
उमेदवारीसाठीच्या संधी लिंक्डइन, एंजललिस्ट, इंटर्नशाला, कॅगल, गितहब अशा संकेतस्थळांवर उपलब्ध असतात. त्या शोधत राहून योग्य अशा संधींचा पाठपुरावा करत राहणं आवश्यक असतं. अर्थात हे करत असताना काही जण अशी संधी मिळत नसल्यामुळे वैतागून कमालीचे आतूर असल्याचं दिसतं आणि याचा गैरफायदा घेण्यासाठी काही ठकही बसलेले असतात. त्यांच्यापासून सावध राहणं खूप गरजेचं असतं.
कॅगल, झिंदी तसंच इतर अनेक ठिकाणी निरनिराळे प्रश्न सोडवण्यासाठीच्या ‘हॅकॅथॉन’ स्पर्धांचं आयोजन केलं जातं. त्यात सहभागी झाल्यास किमान जगात काय सुरू आहे, आपण त्यात कुठे आहोत, आपल्याला आणखी काय केलं पाहिजे अशा गोष्टींचं भान येतं. अनेक कंपन्या, विद्यापीठं, महाविद्यालयं अधूनमधून अशा स्पर्धा भरवत असतात. त्यांच्याकडे लक्ष ठेवून सहभागी होणं आणि हळूहळू आपल्या कौशल्यांना आणखी धारदार बनवणं आजच्या जगात अतिशय गरजेचं झालं आहे. तसंच यापेक्षा मोठ्या स्तरावर भरवल्या जात असलेल्या ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ किंवा जागतिक पातळीवरच्या ‘टेकक्रंच डिस्राप्ट’ अशा स्पर्धांमध्येही आपल्याला संधी मिळू शकते का, हे बघावं.
एआयच्या क्षेत्रात काम करत असलेल्या लोकांच्या किंवा या क्षेत्रामधल्या आपल्या उत्पादनांची अप्रत्यक्षपणे जाहिरात करण्यासाठीच्या कंपन्यांच्या अनेक अधूनमधून जाहीर बैठका होत असतात. यात अनेकदा काही तंत्रज्ञानाशी संबंधित असलेल्या विषयांवरची सत्रंही भरवली जातात. आपल्या गावात किंवा ऑनलाइन प्रकारे अशा प्रकारची सत्रं कुठे होत असतील तर त्यांना उमेदवारीच्या काळात तरी नक्कीच हजेरी लावावी. यातून आपल्याला ठाऊक नसलेल्या असंख्य गोष्टी समजतात, खूप नव्या ओळखी होतात, संधींविषयीची माहिती मिळते.
हे सगळं करत असताना अर्थातच एआयच्या जगात काय सुरू आहे याची सातत्यानं खबरबात ठेवणं, त्यासाठी पुस्तकं, इंटरनेट, व्हिडीओ, स्वत: प्रयोग करून बघणं हे सगळं गरजेचं आहे.
एकूण काय, तर मार्ग तसा खडतर आहे; पण हे आव्हान स्वीकारण्यात तर खरी मजा आहे!
akahate@gmail. Com