मागील लेखात लिहिल्याप्रमाणे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले अनेक उमेदवार ही परीक्षा देतात. अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये हे उमेदवार शिकलेले असू शकतात. त्यामुळे त्या विशिष्ट शाखेबद्दलचे आणि एकूणच अभियांत्रिकी संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात.
गेल्या आठवड्यात नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर झाला. अनेक उमेदवार यशस्वी झाले. संघ लोकसेवा आयोगाच्या कामाचा झपाटा असा की उमेदवारांचे मार्कसुद्धा उपलब्ध झाले. नागरी सेवा परीक्षेच्या अंतिम निकालात मुख्य परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी या दोन्ही टप्प्यांमध्ये मिळालेल्या गुणांची बेरीज होते आणि यशस्वी उमेदवारांची यादी जाहीर होते. उमेदवारांचे मार्क पाहून लक्षात येते की व्यक्तिमत्त्व चाचणीमधले गुण खूप महत्त्वाचे असतात. मुख्य परीक्षेत कमी गुण मिळाले पण व्यक्तिमत्त्व चाचणीत उत्तम गुण मिळाले आणि म्हणून रँक वर आली अशीही उदाहरणं दिसतात. एखाद्या उमेदवाराला व्यक्तिमत्त्व चाचणीत खूपच कमी गुण मिळतात आणि तो स्पर्धेत मागे पडतो. व्यक्तिमत्त्व चाचणीत २७५ पैकी २१२ गुण मिळाले आणि तरीही निवड झाली नाही अशीही उदाहरणं दिसतात. त्यामुळेच परीक्षेच्या सर्वच टप्प्यांची तयारी व्यवस्थित केली पाहिजे.
यावर्षीच्या निकालात व्यक्तिमत्त्व चाचणीत सर्वोच्च २१६ गुण हे १८४ रँकर आयुषी शर्मा या आमच्या मार्गदर्शन समूहातील विद्यार्थिनीला मिळाले याचा आम्हाला आनंद आहे. व्यक्तिमत्त्व चाचणीत १७५ पर्यंत गुण हे सरासरी गुण म्हणता येतील. त्या मर्यादेच्या पुढे जाण्यासाठी निश्चितच मेहनत करावी लागते. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत इंग्रजी विषयात ३५ गुण आले म्हणून मागे वळून न पाहता सुनील स्वामी या नांदेड जिल्ह्यातील कंधार च्या विद्यार्थ्यांने MSc Agricultutre मध्ये सुवर्णपदक मिळविले आणि या वर्षी UPSC परीक्षेत चांगली रँक संपादन करत मुलाखती मध्ये २०६ गुण मिळविले.व्यक्तिमत्त्व चाचणीत गुण वाढविण्यासाठी नेमके मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही आमच्या या सदरातून करत आहोत.
गेल्या काही लेखांमध्ये आपण वैकल्पिक विषयांवर काय प्रश्न येऊ शकतात हे पाहत आहोत. आत्तापर्यंत आपण पोलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, भूगोल, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, गणित , मेडिकल सायन्स या वैकल्पिक विषयांवर काय प्रश्न विचारले जाऊ शकतात हे पाहिो आहे. काही उमेदवारांनी आम्हाला ईमेल करून आणखी काही वैकल्पिक विषयांवरच्या प्रश्नाबद्दल लिहायला सांगितले आहे. त्याबद्दल आम्ही लिहिणार आहोत. गेल्या वेळच्या लेखात लिहिल्याप्रमाणे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले अनेक उमेदवार ही परीक्षा देतात. अभियांत्रिकीच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये हे उमेदवार शिकलेले असू शकतात. त्यामुळे त्या विशिष्ट शाखेबद्दलचे आणि एकूणच अभियांत्रिकी संदर्भातले प्रश्न विचारले जाऊ शकतात.
सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल,इलेक्ट्रॉनिक्स,मेटॅलर्जी,कम्प्युटर सायन्स, माहिती आणि तंत्रज्ञान या अभियांत्रिकीच्या काही शाखा आहेत. साधारणत: यातल्या एखाद्या शाखेतून अभियांत्रिकी शिक्षण घेणारे उमेदवार असतात. त्यांना विचारला जाऊ शकणारा एक कॉमन प्रश्न म्हणजे तुमच्या अभियांत्रिकीच्या शिक्षणाचा प्रशासनात काय उपयोग आहे? किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो कि अभियांत्रिकी शिक्षण हे व्यावसायिक स्वरूपाचं शिक्षण आहे मग त्याच क्षेत्रात न जाता तुम्हाला प्रशासनात का यायचं आहे? तुमच्या तांत्रिक शिक्षणावर झालेला खर्च वाया गेला असं तुम्हाला वाटत नाही का?
अभियांत्रिकीच्या विशिष्ट शाखेसंबंधी प्रश्नही विचारले जाऊ शकतात. कधी कधी त्याचा चालू घडामोडींशी संबंध असू शकतो. उदाहरणार्थ, एखादा मुंबईचा उमेदवार असेल तर त्याला अटल सेतू किंवा वरळी वांद्रे सागरी पूल हे कसे बांधले आहेत किंवा मुंबईतील वाहतुकीची कोंडी कशी सोडवावी ते सिव्हिल अभियंत्याच्या भूमिकेतून सांगायला सांगू शकतात. मध्यंतरी बोगद्याची कामे चालू असताना दगड इत्यादी कोसळून मोठे अपघात झाले हे असे अपघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी असे तुम्हाला वाटते? किंवा हे असे अपघात होण्यामागची तांत्रिक कारणे कोणती अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. नुकताच म्यानमार मध्ये भूकंप झाला त्या अनुषंगाने भूकंप ग्रस्त भागात घरे बांधताना काय काळजी घ्याल? मागील वर्षी देशाला सेन्ट्रल विस्टा ही संसदेची नवीन वास्तू मिळाली. ती वास्तू त्रिकोणी आकाराची का आहे आणि ती कशी बांधली गेली. स्थापत्य अभियंता असणार्यांचे व्यावहारिक ज्ञान तपासण्यासाठी विचारले जाणारे प्रश्न म्हणजे बांधकामासाठी वापरात येणाऱ्या विटांची स्टॅंडर्ड साईझ काय आहे? त्या विटा उत्तम प्रतिच्या आहेत का याची तुम्ही प्रत्यक्ष साईटवर कशी फिल्ड टेस्ट कराल? UPSC च्या मुलाखती साठी ज्या वास्तूत तुम्ही प्रवेश केला त्या बिल्डिंग चे स्ट्रक्चरल इंजिनीअरिंग कोणत्या प्रकारचे आहे? मुलाखती च्या खोलीची किंवा त्या खोलीतील टेबलची साईझ किती आहे? Fly ash bricks कशा तयार करतात? इटली मधील पिसाचा मनोरा का झुकलेला आहे? लो कॉस्ट हाऊसिंगसाठी प्रसिद्ध केरळच्या लॉरी बेकर यांच्या मॉडेल विषयी काय माहित आहे?
मेकॅनिकल इंजिनियर्सना सुद्धा थिअरीपेक्षा उपयोजित स्वरूपाचे प्रश्न जास्त विचारले जाऊ शकतात. थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय? त्याचा रोजच्या आयुष्यात कुठे आणि कसा उपयोग होतो? डिझेल इंजिन कसं काम करतं ते सांगा ? रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मेकॅनिझम म्हणजे काय? इम्पॅक्ट टेस्टिंग मशीन तुम्हाला माहीत आहे का? एनर्जी म्हणजे नक्की काय? industrial revolution 4.0 म्हणजे काय? थ्री डी प्रििटिंग आणि मशीन लर्निंग विषयी काय माहिती आहे? Mechanized फार्मिंग कसे करतात? इलेक्ट्रिकल इंजिनियरला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? ओहम चा law , Faradey चा law आणि Kinchof प्रिसिंपल काय आहे? एसी आणि डीसी करंट मध्ये काय फरक असतो? इलेक्ट्रकि सर्किट चे प्रकार कुठचे असतात? कपॅसिटर म्हणजे काय? इलेक्ट्रकिल रेसिस्टन्स चा अर्थ काय? भारतात ट्रान्समिशन लॉसेस जास्त प्रमाणात होत आहेत का आणि ते कसे कमी करता येतील? भारत सरकारची उजाला योजना गेल्या दहा वर्षात कितपत यशस्वी झाली? भारताचे २०३० सालचे पर्यायी ऊर्जा स्राोत टार्गेट किती ऊर्जा निर्मिती करण्याचे आहे आणि आज आपण सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जा क्षेत्रात जगात कोणत्या रँकवर आहोत? कुठच्याही शाखेचा अभियंता असो, त्याच्या विषयातल्या मूलभूत संकल्पना त्या उमेदवाराला व्यवस्थित माहिती असल्या पाहिजेत आणि त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोगही माहिती असला पाहिजे.
वेगवेगळ्या भाषांच्या साहित्याचाही वैकल्पिक विषयांमध्ये समावेश असतो. अलीकडे साहित्य हा वैकल्पिक विषय म्हणून घेणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण कमी झाले आहे. तरीही या वैकल्पिक विषयावर काय प्रश्न येऊ शकतात हे आपण पुढच्या लेखात पाहू.
mmbips@gmail.com
supsdk@gmail.com