– आशुतोष शिर्के
भारतीय विद्यार्थ्यांसाठी परदेशात, पदव्युत्तर उच्चशिक्षण घेणे हा नेहमीच आकर्षणाचा विषय ठरला आहे. उच्च दर्जाचे शिक्षण, जागतिक अनुभव, आणि करिअरमध्ये मोठा बदल घडवणाऱ्या संधी या कारणांमुळे अनेक विद्यार्थी याबद्दल उत्सुक तर असतात, परंतु परदेशातील शिक्षणासाठीचा खर्च इतका प्रचंड असतो की सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक प्रज्ञावान विद्यार्थिनी-विद्यार्थी त्याबद्दल विचारही करत नाहीत. अशावेळी आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती ही अशा विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी ठरते.
भारतातील विद्यार्थ्यांसाठी इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी तीन-चार प्रमुख शिष्यवृत्त्या विशेष प्रसिद्ध आहेत – शेवनिंग (Chevening Scholarship), कॉमनवेल्थ (Commonwealth Scholarship), इनलॅक्स शिवदासानी ( Inlaks Shivdasani Scholarship) आणि फेलिक्स स्कॉलरशिप.
शेवनिंग स्कॉलरशिप
ही ब्रिटन सरकारची प्रतिष्ठित शिष्यवृत्ती आहे. ही एक वर्षाच्या मास्टर्स डिग्रीसाठी (पदव्युत्तर पदवी) दिली जाते. निवडीच्या प्रक्रियेत तुमची शिक्षणातील कामगिरी, नेतृत्वगुण आणि करिअर आणि भविष्याबद्दलाचा तुमचा दृष्टिकोन या गोष्टी पाहिल्या जातात. तुम्ही समाजात किंवा तुमच्या क्षेत्रात बदल घडवू शकणारे नेते होऊ शकता का, हे इथे महत्त्वाचे असते.
तयारी कशी करावी?
तुमच्या क्षेत्रात लक्षणीय काम किंवा प्रकल्प केलेले असणे महत्त्वाचे. स्टेटमेंट ऑफ पर्पज ( SOP) मध्ये तुमचं करिअर व्हिजन स्पष्ट असायला हवे. इंग्रजीवर चांगले प्रभुत्व असावे आणि पुस्तकी अभ्यासाबरोबर सामाजिक उपक्रम, नेतृत्वाची संधी व नेटवर्किंग याकडे लक्ष देणे फारच महत्त्वाचे आहे.
कॉमनवेल्थ स्कॉलरशिप
ही शिष्यवृत्ती कॉमनवेल्थ देशांतील विद्यार्थ्यांसाठी असते. ती प्रामुख्याने शैक्षणिक गुणवत्ता आणि संशोधन क्षमता पाहून दिली जाते. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान अशा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही मोठी संधी उपलब्ध आहे.
तयारी कशी करावी?
तुमचा शैक्षणिक प्रवास उत्कृष्ट असावा. संशोधनाची दिशा, प्रकल्पांची कल्पना आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम स्पष्ट असावा. प्राध्यापक आणि आजवरचे मार्गदर्शक यांच्याकडून मिळालेली शिफारस पत्रे महत्त्वाची असतात.
इनलॅक्स शिवदासानी स्कॉलरशिप
ही शिष्यवृत्ती भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे आणि कला, डिझाइन, सामाजिक शास्त्रे, व्यवस्थापन, व इतर क्षेत्रांसाठी उपयुक्त आहे. या शिष्यवृत्तीच्या निवडीमध्ये तुमच्या टॅलेंट आणि क्रिएटिव्हिटीवर भर दिला जातो.
तयारी कशी करावी?
पोर्टफोलिओ किंवा तुमच्या कामाचे नमुने उत्कृष्ट असावेत. मुलाखतीत तुमची प्रेरणा आणि दृष्टिकोन स्पष्टपणे मांडता यावा. शैक्षणिक पदव्या, प्रश्स्तीपत्रके या सोबतच वैयक्तिक योगदान अतिशय महत्त्वाचे मानले जाते.
शिष्यवृत्तीसाठी निवड कोणत्या आधारावर?
शिष्यवृत्त्यांच्या केंद्रस्थानी आहे – तुमचा दृष्टिकोन. फक्त गुण आणि इंग्रजी पुरेसे नाहीत; तुम्ही स्वत:ला नेते, संशोधक किंवा परिवर्तन घडवणारे म्हणून पाहताय का? या मार्गावर सतत स्वत:ला विकसित करता आहात का, हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर विचारांचा विस्तार करण्यासाठी आहे ही मानसिकता हवी. परदेशात शिक्षण घेऊन तुम्ही समाजासाठी काय करू शकता, याचा विचार करा. कॉलेजमध्ये असतानाच प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप, सामाजिक काम आणि नेटवर्किंग याला सुरुवात करा. आणि याबरोबरच हवा, स्वत:वरचा विश्वास! या शिष्यवृत्त्य ‘मोठ्या लोकांसाठी’ नाहीत; तुमच्यासाठीही आहेत. तुमची मेहनत, स्पष्ट उद्दिष्ट आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर तुम्हीही हे साध्य करू शकता. आजपासून तयारी सुरू केली, तर पुढच्या दोन-तीन वर्षांत तुम्हीसुद्धा ह्या प्रतिष्ठित शिष्यवृत्तीसाठी सक्षम उमेदवार होऊ शकता.
दीपक चटप या विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीची गोष्ट
चंद्रपूर जिल्ह्यातील लखमापूर गावातील जिल्हा परिषद शाळेतून दीपकचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. त्यावेळी उच्च शिक्षणासाठी तो कधीतरी परदेशात जाईल असे त्याला कधीच वाटले नव्हते. पुण्यातील आय.एल.एस.लॉ कॉलेजला कायद्याचे शिक्षण सुरू असताना ब्रिटिश सरकारच्या शेवनिंग स्कॉलरशिपविषयी त्याला समजले. शेवनिंगसाठी लागणाऱ्या निकषांमधील रचनात्मक कामाचा ध्यास, नेतृत्वगुण व उच्चशिक्षण पूर्ण झाल्यानंतर भारतात परत येऊन काम करण्याचा मानस या गोष्टी दीपककडे होत्याच. कायद्याचे शिक्षण घेताना दीपकने चंद्रपूर-गडचिरोलीतील आदिवासी, शेतकरी व दुर्लक्षित घटकांच्या प्रश्नांवर मानवाधिकार आयोग व उच्च न्यायालयात केसेस दाखल केल्या होत्या, ते काम महत्त्वाचं ठरलं. समता फेलोशिपच्या माध्यमातून त्याने संविधानिक मूल्य विषयांवर कार्यशाळा आयोजित केल्या होत्या. त्याबरोबरच एका सामाजिक संस्थेची स्थापना करून शिक्षण, विधि व नेतृत्व बांधणी या विषयांत काम सुरू केलं होतं. शेवनिंग शिष्यवृत्तीमधून दीपकचे परदेशातील विद्यापीठातील संपूर्ण शुल्क, विमान प्रवास खर्च, दैनंदिन निर्वाह खर्च व मासिक मानधन हे सारे दिले गेले. लंडनमध्ये एल.एल.एम. चे पदव्युत्तर शिक्षण दीपकने पूर्ण केले. त्याकाळात वर्षभर तिथल्या विविध संस्थांमध्ये स्वेच्छिक काम केल्याने शेवनिंग गोल्ड व्हालंटरिंग पुरस्काराने फॉरेन-कॉमनवेल्थ डेवलपमेंट विभागाने त्याला सन्मानित केले. दीपकचं त्याच्या क्षेत्रातील काम गेल्या सात वर्षांपासून सातत्याने सुरू होतं आणि आता स्कॉलरशिप मिळाल्यानंतरही सुरू राहिलं आहे.
mentorashutosh@gmail.com