डॉ.श्रीराम गीत

यंदाच्या वर्षीचे माझे काही वेगळेच अनुभव मी वाचकांसोबत वाटून घेऊ इच्छितो. तसे ते गेले काही वर्ष क्वचित क्वचित येत असतात. मात्र यंदाच्या वर्षी दर आठवडय़ाला असे एखादे उदाहरण मला भेटत आले. आपला विषय खरे तर स्पर्धेत धावण्यापूर्वीची तयारी. त्या अंगाने लिहायचे झाले तर छान तयारी असलेली एखादी मुलगी किंवा मुलगा तोपण स्पर्धेचा विजेता किंवा किमान पहिल्या तीनात येण्याची शक्यता असणारा अचानकपणे स्पर्धा सुरू झाल्यानंतर मधेच माघार घेताना सापडला तर कसे वाटेल?

तसे काहिसे मला या प्रत्येक उदाहरणात वाटत होते. सगळय़ात गमतीची गोष्ट म्हणजे या मुलांच्या पालकांना मात्र तसे अजिबातच वाटत नव्हते. किंबहुना ही स्पर्धा तू का सोडत आहेस असा प्रश्न त्यांच्यापुढे पडतही नव्हता. काळजीचा त्यांचा सूर एकच होता की ही वर्षे वाया जाणार.. अशी बरीच उदाहरणे समाजात, आसपासच्या माहितीत घडताना जेव्हा आढळू लागतात तेव्हा काही प्रश्न नक्कीच उभे राहतात. हे प्रश्न आजचे नाहीत. किंबहुना असे प्रश्न वृत्तपत्रातून अनेक वेळेला गंभीरपणे चर्चिलेही गेले आहेत. पण त्या वेळेला त्याचे स्वरूप जरा वेगळे होते. डॉक्टर झालेली व्यक्ती भलतेच काहीतरी करू लागते तेव्हा समाजाने त्याच्यावर केलेल्या खर्चाचे काय? आयआयटीतून पास झालेला मुलगा जेव्हा देश सोडून जातो किंवा भलत्याच संबंध नसलेल्या कामांमध्ये, इंजीनिअरिंग सोडून देऊन मोठय़ा पगारास्तव काम स्वीकारतो तसेच एखादा सायन्स पदवीधर बँकेमध्ये काम करतो अशा स्वरूपाच्या गोष्टींवर चर्चा कायमच होत आली आहे. आजचा विषय पूर्णपणे वेगळा अशासाठी की या मंडळींनी निदान घेतलेले रस्ते पूर्ण करून त्या त्या पदव्या छान पद्धतीत यशस्वीरित्या मिळवल्या व नंतर इतर कामात ते रममाण झाले.                               

अर्ध्यातच कोर्स सोडणारे

मला दिसलेली उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत. आत्ता सायन्सला प्रवेश घेतला. इंजीनिअरिंग प्रवेशाचे क्लासेस लावले त्याचा  किमान खर्च पाच लाख रुपये आई-वडिलांनी केला. आता निकालानंतर मुलगा म्हणतो मला इंजीनिअरिंग करावेसे वाटत नाही. वेगळेच काहीतरी करावेसे वाटते. अशाच हट्टा पायी बारावी सायन्स झालेल्या एका मुलीने लिबरल आर्ट्सला प्रवेश घेतला. पहिले वर्ष संपल्यावर असे लक्षात आले, या साऱ्यांमध्ये कष्ट खूप आहेत. मग पुन्हा सीईटी देऊन इंजीनिअरिंग का करू नये? अशा प्रश्नात ते सारे कुटुंब अडकले. उत्तम संस्थेतील हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रवेशासाठी काही लाख खर्चून सुरुवात केल्यावर हे काम मला आवडत नाही. आता मी कॉमर्स कडे जातो, हे होते तिसरे उदाहरण. अजून एक वेगळाच प्रकार अधूनमधून पुढे येत आहे. दहावीला मार्क ९५ टक्के असताना कॉमर्स घेणार आहे. मात्र, सीए, एमबीए सोडून वेगळे काय ते सांगा असे विचारणारे जसे भेटतात, तसेच डॉक्टर व्हायचे नाही इंजीनिअर व्हायचे नाही आर्किटेक्चर मध्ये रस नाही. तुम्हीच नवीन काय ते सांगा म्हणूनही विचारणारे असतात. या साऱ्या प्रकाराला मी नेहमीच एक विनोदाने नाव देतो. हा प्रकार म्हणजे रेल्वे स्टेशनवर तिकीट काढण्याकरता जायचे. खिडकी आल्यानंतर कुठे जायचे हे न सांगता ‘मला तिकीट द्याना एक’, म्हणून दोन हजाराची या सप्टेंबरात नामशेष होणारी लाल नोट पुढे करायची. ऐकणारे व मागचे रांगेतले यांची करमणूक होते एवढेच. या वाक्याचा अनेक पालकांना राग येईल किंवा आश्चर्य वाटेल. पण इयत्ता दहावीची परीक्षा झाल्यानंतर हातात किमान शंभर दिवस असताना दर चार दिवसांनी एक अशा पद्धतीत किमान पंचवीस करिअर बद्दलची प्राथमिक माहिती गोळा करण्याची जबाबदारी खरे तर आई-वडील व विद्यार्थी यांच्यावर असते. कारण सारा प्रवास त्यांना करायचा असतो. या प्रवासासाठी लागणारे तहान लाडू, भूक लाडू त्यांनाच जमवायचे असतात. खरे तर किमान २५ करिअरची माहिती मिळते. असा निर्णय घेण्याची वेळ जवळपास कोणावरही येत नसते. फार तर दहालाच हा आकडा थांबत असतो. तीच स्पर्धेची खरी तयारी असते. अतिहुशारांचे अती चिकित्सक प्रश्न आणि न रुजणाऱ्या रोपटय़ाला घातलेले खत पाणी याअशा काहीशा स्व रूपाबद्दल खरे तर दूरगामी चर्चा व्हायला पाहिजे. करिअर वृत्तांतच्या चिकित्सक वाचकांनी तरी यावर सखोल विचार करावा ही विनंती.