Success Story: जगात आलेल्या प्रत्येकाला आयुष्यात काहीतरी खास आणि नवीन काहीतरी करायचं असतं ज्यामुळे स्वतःची ओळख निर्माण होईल. अनेक अभिनेते, राजकीय नेते, व्यावसायिक, खेळाडूंच्या प्रेरणादायी प्रवासाच्या अनेक कथा तुम्ही ऐकल्या असतील. आज आपण अशाच एका अभिनेत्री, नृत्यांगना असलेल्या तरुणीच्या IPS अधिकारी होण्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत.
आयपीएस श्रुती अग्रवाल हिने खऱ्या आयुष्यातही असेच काहीतरी केले आहे. तिच्या कठोर परिश्रम, समर्पण व दृढनिश्चयाच्या जोरावर श्रुतीने देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळविले आणि ती आयपीएस अधिकारी बनली.
अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून ओळख
श्रुती मूळची झारखंडमधील गिरिडिहची आहे. श्रुती दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊसमध्ये नृत्यांगना व अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होती. परंतु, २०२३ मध्ये श्रुती यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण होऊन, अखिल भारतीय स्तरावर ५०६ वा क्रमांक मिळवला. आता ती भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी झाली आहे.
श्रुतीने तिचे सुरुवातीचे शिक्षण झारखंडमधील देवघर येथे केले. मॅट्रिकनंतर तिने बोकारो येथून इंटरमिजिएट केले. श्रुती लहानपणापासूनच अभ्यासासह नृत्य व अभिनयातही खूप रस होता. ती अनेकदा सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. श्रुतीने दिल्ली विद्यापीठातील मिरांडा हाऊसमधून पदवी प्राप्त केली आहे. मिरांडा हाऊसमध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनय आणि नृत्यासाठी ती लोकप्रिय होती. श्रुती कॉलेजमध्ये अनेकदा नृत्य आणि नाट्य कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची.
पहिल्या दोन प्रयत्नांत अपयशाची धनी
पदवीनंतर श्रुतीने UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा देऊन IPS होण्याचा निर्णय घेतला. आयपीएस होण्याच्या मार्गावर तिला अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये श्रुतीच्या पदरी फक्त अपयश आणि निराशाच आली. पण, तिसऱ्या प्रयत्नात श्रुतीने जे करण्याचा संकल्प केला होता, ते साध्य करून दाखवले. २०२३ मध्ये श्रुतीने UPSC नागरी सेवा परीक्षेत ऑल इंडिया रँक ५०६ मिळवली आणि IPS केडरमध्ये आपले स्थान निश्चित केले.