Success Story: आपल्या प्रत्येकाचे आयुष्य अनेक संघर्षांनी भरलेले आहे; परंतु जर एखाद्याने त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा दृढनिश्चय केला, तर तो निश्चितपणे सर्व अडचणींवर मात करून इप्सित यश साध्य करू शकतात. भारतात असे अनेक व्यावसायिक, यशस्वी व्यक्ती आणि मोठमोठे अधिकारी आहेत की, ज्यांनी आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करीत यशाचा टप्पा गाठलेला आहे. आज आम्ही अशाच एका व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत, जे जवळपास ३३ वेळा परीक्षेत अनुत्तीर्ण झाले होते.

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील अजितपुरा हे एक छोटेसे गाव आहे. १४ वर्षांपूर्वी या गावात सुमारे २५० कुटुंबे राहत होती. आदित्य कुमार हे याच गावातील रहिवासी होते. १२वी पास झाल्यानंतर सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न ते पाहतात. या परीक्षेसाठी ते तयारी करतात, सरकारी भरतीसाठी फॉर्म भरतात. त्याची पहिली परीक्षा देतात; परंतु त्यात त्यांना अपयश येते. त्यानंतर ते दुसरी परीक्षादेखील देतात. तरीही त्यांना पुन्हा अपयश येते. एकामागे एक अशा आणखी ३० परीक्षा ते देतात; पण अपयश काही त्यांची पाठ सोडत नसते.

लोकांनी मारले टोमणे

परीक्षेत वारंवर अनुत्तीर्ण होण्याचा चटका बसूनही आदित्य कुमार यांनी हार मानली नाही. शेवटी एक मोठा निर्धार करून, ते यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या निर्धाराने २०१३ मध्ये गाव सोडून दिल्लीत गेले आणि तेथे ते पुन्हा परीक्षेच्या तयारीला लागले. पण, अपयशाने त्यांचा पाठलाग कायम ठेवला. UPSC परीक्षेमध्येही सलग तीन वेळा ते अनुत्तीर्ण झाले. त्यावरून लोकांनी त्यांना टोमणे मारले. जो सामान्य परीक्षा पास करू शकला नाही, तो UPSC सारखी अवघड परीक्षा कशी पास करू शकेल, असे उपहासगर्भ प्रश्न लोक त्यांना विचारू लागले. ३० वेळा सर्वसाधारण परीक्षा आणि तीन वेळा UPSC परीक्षेत नापास होऊनही, २०१७ मध्ये त्यांनी UPSC साठी चौथ्यांदा प्रयत्न केला आणि त्यांचे नशीब पालटले. UPSC च्या निकालात त्यांना ६३० वा क्रमांक मिळाला.

आदित्य कुमार सध्या पंजाबच्या संगरूर जिल्ह्यात एएसपी म्हणून तैनात आहेत. हिंदी माध्यमातून शिकलेल्या आदित्य कुमार यांनी आपल्या यशातून हे सिद्ध केले आहे की, प्रयत्नांना मर्यादा नसते. त्यांचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत आणि त्यांनीच आदित्य कुमारला लहानपणापासून प्रेरणा दिली होती.

हेही वाचा: Success Story: मूर्ती लहान; पण कीर्ती महान! वयाच्या १३व्या वर्षी अल्प गुंतवणुकीतून १०० कोटींच्या व्यवसायाची केली उभारणी; दरमहा दोन कोटींची कमाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वारंवार अपयशाचा फटका; पण जिद्द कायम

आयपीएस आदित्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या प्रवासाबद्दल खुलासा केला होता. त्यांनी UPSC परीक्षा देण्याआधी अखिल भारतीय अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा, केंद्रीय विद्यालय संघटना आणि बँकिंग यांसारख्या परीक्षा दिल्या होत्या. २०१४ मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा UPSC परीक्षेला बसले होते तेव्हा त्यांना प्रीलिमही पास करता आली नव्हती. त्याचप्रमाणे २०१५ मध्ये त्यांनी पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेत यश मिळावले पण, तेव्हा ते अतिआत्मविश्वासामुळे मुलाखतीत नापास झाले. २०१६ च्या परीक्षेतही ते पुन्हा नापास झाले. मात्र, २०१७ मध्ये आदित्य यांनी यश मिळवले.