IAS Prateek Jain Success Story In Marathi : दरवर्षी लाखो विद्यार्थी देशातील सगळ्या स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक असलेल्या ‘केंद्रीय नागरी सेवा’ परीक्षेला बसतात. पण, त्यापैकी काही मोजकेच विद्यार्थी प्रत्यक्षात त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि सरकारी अधिकारी बनतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आयएएस प्रतीक जैन यांची आहे; ज्याने दुसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करून दाखवले.
२०१८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी प्रतीक जैन मूळचे राजस्थानमधील अजमेर येथील रहिवासी आहेत. प्रतीक यांची शैक्षणिक पार्श्वभूमी तर अगदी कौतुकास्पद आहे. त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि नंतर बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (BITS) पिलानी येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले. जैविक विज्ञानाचा अभ्यास करून, त्यांनी आपले ज्ञान आणखी वाढवले आणि नंतर २०२० मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)मधून सार्वजनिक व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी मिळवली.
स्वप्नपूर्तीपर्यंतची वाटचाल… (Success Story)
@dnaindia ने दिलेल्या वृत्तानुसार आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. प्रतीक यांनी प्रीलिम्स आणि मेन्स अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या. पण, अंतिम फेरीत ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पण, त्याच वर्षी त्यांनी भारतीय वन सेवा (आयएफओएस) परीक्षेत ऑल इंडिया रँक ३ मिळवली. मग न डगमगता प्रतीक यांनी आयएएस अधिकारी होण्याच्या स्वप्नावर लक्ष केंद्रित केले आणि २०१७ मध्ये पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली. त्यांनी ८६ वी ऑल इंडिया रँक (एआयआर) मिळवली आणि त्यांचे स्वप्न यशस्वीरीत्या साकार केले. एवढेच नाही, तर वयाच्या २५ व्या वर्षी ते आयएएस झाले.
प्रतीक जैन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाल्यास त्यांचे लग्न अक्षिता अग्रवाल यांच्याशी झाले आहे, ज्या एक प्रतिष्ठित अधिकारी आहेत आणि २०१६ मध्ये भारतीय वन सेवा (IFoS) परीक्षेत ऑल इंडिया रँक ३ मिळवली होता. या जोडप्याने सार्वजनिक सेवेसाठी स्वतःला समर्पित केले आहे.
सध्या आयएएस प्रतीक जैन हे उत्तराखंडच्या हरिद्वार जिल्ह्यात मुख्य विकास अधिकारी (सीडीओ) म्हणून कार्यरत आहेत. प्रतीक यांच्या व्यावसायिक भूमिकांमध्ये त्यांनी डिसेंबर २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंत हरिद्वार जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यानंतर ते सध्या हरिद्वारचे सीडीओ म्हणून काम करत आहेत. त्यांनी नैनिताल जिल्ह्यात जवळजवळ दोन वर्षे उपजिल्हाधिकारी आणि एसडीएम म्हणूनही काम केले.