Success Story IPS Ashish Tiwari : यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी होणे हे अनेक इच्छुकांसाठी एक स्वप्न असते. काही जण हे स्वप्न पूर्ण करण्यासठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडतात. तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी आयआयटीमधून पदवी प्राप्त केली. लंडनमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. पण, नंतर यूपीएससी नागरी सेवा परीक्षेसाठी ती नोकरी सोडली आणि आता ते एक आयपीएस अधिकारी आहेत.
@dnaindia ने दिलेल्या वृत्तानुसार या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आशीष तिवारी असे आहे. आयपीएस आशीष तिवारी सध्या उत्तर प्रदेशातील सहारणपूर येथे एसएसपी म्हणून कार्यरत आहेत. आशीष यांनी लंडन आणि जपानमधील चांगल्या पगाराच्या नोकऱ्या नाकारून आयपीएस होण्याचा निर्णय घेतला होता. आशीष २०१२ च्या बॅचच्या यूपी कॅडरचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी ऑल इंडिया रँक ३३० मिळवली आणि ते भारतीय महसूल सेवेत (आयआरएस) सामील झाले. पुढच्या प्रयत्नात त्यांनी अजून जास्त मेहनत घेतली आणि २०१२ मध्ये ऑल इंडिया रँक मिळून २१९ सह ते आयपीएस अधिकारी झाले. आशीष यांना यूपी कॅडर (आयपीएस-आरआर २०१२) देण्यात आले आहे.
आयपीएस आशीष तिवारी यांची पार्श्वभूमी सांगायची झाल्यास ते मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील कैलाश नारायण तिवारी हे रेल्वेमध्ये अभियंता होते. आशीष यांनी त्यांचे शालेय शिक्षण होशंगाबाद येथील केंद्रीय विद्यालय (केव्ही) येथून पूर्ण केले. २००७ मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) खरगपूर येथून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक. (एच) आणि एम.टेक पदवी प्राप्त केली. त्यांनी अलीकडेच हार्वर्ड केनेडी स्कूलमधून सार्वजनिक प्रशासनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
आयपीएस आशीष यांनी एएसपी झांशी, एसपी ग्रामीण वाराणसी, एसपी मिर्झापूर, एसएसपी एटाह, एसपी जौनपूर, एसएसपी अयोध्या, संस्थापक कमांडंट-स्पेशल सिक्युरिटी फोर्स (एसएसएफ), एसपी इलेक्शन (यूपी), एसएसपी फिरोजाबाद अशी पदे भूषवली आहेत. लेहमन ब्रदर्स आणि नोमुरा या गुंतवणूक बँकांमधील कार्य आणि आयकर सहायक आयुक्त (आयआरएस) म्हणून केलेले काम यांचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. कम्युनिटी पोलिसिंग, बनावट बातम्यांचा सामना करणे आणि डिजिटल प्रशासन या क्षेत्रातील त्यांच्या नावीन्यपूर्ण धोरणांना सार्वजनिक आणि व्यावसायिक स्तरावर चांगल्या प्रकारे प्रसिद्धी मिळाली आहे.