Success Story: आज महिला प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहे. घर, कुटुंब सांभाळून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करत आहे. आज आपण अशाच एका महिलेविषयी जाणून घेणार आहोत, ज्या समाजातील इतर महिलांसाठी प्रेरणा आहेत. कोल्हापूर येथील मोनिका मोहिते या एक कृषी महिला उद्योजक आहेत. त्यांनी त्यांचे पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक विचारसरणी एकत्र करून, शेतीत एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. मोनिका केवळ स्वतःला एक यशस्वी कृषी महिला उद्योजक म्हणून प्रसिद्ध केले नाही, तर त्यांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
मोनिका यांच्या सेंद्रिय शेतीचा प्रवास
२००८ मध्ये मोनिका यांच्या मुलाने व्यावसायिक रेसिंगमध्ये कारकीर्द सुरू केली, तेव्हा आहारतज्ज्ञांनी त्यांना सांगितले की. त्यांना ताकद आणि सहनशक्तीसाठी एनर्जी बार आणि प्रोटीन सप्लिमेंट्सची आवश्यकता असेल. एक आई असल्याने मोनिका यांच्या लगेच लक्षात आले की, बाजारात उपलब्ध असलेल्या उत्पादनांमध्ये त्यांच्या मुलासाठी आवश्यक असलेली शुद्धता आणि पोषण नाही. त्यांनी ठरवले की जर असे स्वच्छ, नैसर्गिक अन्न बाजारात उपलब्ध नसेल, तर ते त्या स्वतः निर्माण करतील. या विचारातून ‘परखी ऑरगॅनिक फार्म्स’ सुरू करण्यात आले. परखी हे नाव मोनिका यांच्या सासू पार्वती आणि मुलगी ख्याती यांच्या नावावरून ठेवण्यात आले, ज्या त्यांच्या आयुष्यात प्रेरणास्रोत होत्या. परखी म्हणजे खऱ्या आणि नकलीमध्ये फरक करू शकणारी व्यक्ती.
शेतीचे ज्ञान नसतानाही मिळवले यश
कोणत्याही कृषी प्रशिक्षणाशिवाय मोनिका यांनी २०१० मध्ये हा प्रवास सुरू केला. त्यांनी कार्यशाळांमध्ये भाग घेतला, तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि स्वतःच्या अनुभवातून त्या सर्व काही शिकल्या. भोपाळमधील ICAR-CIAE येथे प्रशिक्षणादरम्यान त्यांना कळले की, सोयाबीनचे पीठ इतर पिठांसोबत योग्य प्रमाणात मिसळल्याने प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. अशा शोध आणि प्रयोगांनी त्यांनी उत्पादनांना आकार दिला.
आज त्यांचे ४० एकरांवर पसरलेले शेत एक स्वयंपूर्ण परिसंस्था आहे, जिथे पिके, डाळी, पशुधन आणि कुक्कुटपालन सर्व एकत्रित केले जाते. सोयाबीन, ऊस, तांदूळ, ज्वारी व डाळी यांसारखी पिके तिथे घेतली जातात.
लोकांनी उडवली खिल्ली
मोनिका यांच्या सर्वांत मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे सहकारी शेतकरी आणि कामगारांना सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे. अनेकांना शेतीत बनवलेल्या खत आणि नैसर्गिक कीटकनाशकांच्या फायद्यांबद्दल शंका होती. शेणापासून अगरबत्ती बनवण्याच्या त्यांच्या कल्पनेची अनेकांनी खिल्ली उडवली. पण, मोनिका त्यांच्या निर्धारावर ठाम राहिल्या. हळूहळू जेव्हा त्यांच्या कामाचे परिणाम दिसू लागले, तेव्हा त्यांच्या आजूबाजूचे लोक त्यांच्यावर विश्वास ठेवू लागले.
मोनिका यांचे शिक्षण
मोनिका मोहिते यांनी इंग्रजी साहित्यातून एमए केले आहे. त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली आहे. त्यांनी क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये डिप्लोमादेखील केला आहे. मोनिका यांना स्वच्छ आणि नैसर्गिकरीत्या पिकवलेल्या अन्नाद्वारे जगाला निरोगी बनवायचे आहे. मोनिका ग्लोबल फार्मर बिझनेस नेटवर्क (GFBN) च्या सदस्यदेखील आहेत.