Success Story Of Falguni Nayar and Adwaita Nayar In Marathi : व्यवसाय क्षेत्रात फक्त पुरुषच उतरू शकतात, असे पूर्वी मानले जायचे. पण, आता व्यवसाय असो किंवा नोकरी स्त्रिया, तरुणी, महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उतरताना दिसत आहेत. तर आज आपण अशाच एका जोडीबद्दल जाणून घेणार आहोत; ज्यांनी भारतीय सौंदर्य आणि फॅशन उद्योगात क्रांती घडवून आणली.
सध्याच्या घडीला भारतामधील सर्वांत लोकप्रिय ब्युटी स्टार्टअप म्हणजे नायका. तर आज आपण ‘नायका’ फॅशनच्या संस्थापक फाल्गुनी आणि त्यांची मुलगी अद्वैता नायर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.
कोण आहे अद्वैता नायर?
नायका फॅशनच्या प्रमुख अद्वैता नायर ही भारतातील सर्वांत श्रीमंत स्वयंनिर्मित महिलांपैकी एक म्हणून ओळखली जाते. अद्वैता मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकली. त्यानंतर तिने येल विद्यापीठातून अप्लाइड मॅथेमॅटिक्समध्ये बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली आणि शेवटी हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएचे शिक्षण घेतले.
२०१२ मध्ये अद्वैता नायर न्यू यॉर्कमधील बेन अँड कंपनीमध्ये सल्लागार म्हणून कामाला लागली. जेव्हा अद्वैताच्या आईने नायका ही ऑनलाइन ब्युटी आणि कॉस्मेटिक्स रिटेलर सुरू केली. तेव्हा अद्वैताने चांगल्या पगाराची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून आई-लेकीने ‘नायका’ कंपनीला लक्षणीय यश मिळवून दिले आहे.
नायका फॅशन केलं लाँच (Success Story)
२०१७ मध्ये अद्वैताने ‘नायका फॅशन’ लाँच करून ब्रँडचा विस्तार केला. त्यामध्ये कपडे आणि ॲक्सेसरीजचासुद्धा समावेश होता. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फॅशनेबल, उच्च गुणवत्तेची उत्पादने प्रदान करता यावीत यासाठी नायका फॅशनने विविध फॅशन गरजा पूर्ण करणारे २० ड्रेसेस, आरएसव्हीपी, मिक्सट, लिखा व पिपा बेला असे अनेक उप-ब्रँड लाँच केले.
अद्वैताची आई फाल्गुनी नायर यांनी १९८७ मध्ये कोहलबर्ग क्रॅव्हिस रॉबर्ट्स (केकेआर) इंडियाचे सीईओ संजय नायर यांच्याशी लग्न केले. फाल्गुनी यांनी ए.एफ. फर्ग्युसन अँड कंपनीमध्ये सल्लागार म्हणून आपली कारकीर्द सुरू केली आणि नंतर त्या १९९३ मध्ये कोटक महिंद्रा ग्रुपमध्ये सामील झाल्या. त्यांनी लंडन, न्यू यॉर्कमधील संस्थात्मक इक्विटी ऑपरेशन्सवरही देखरेख केली.
२०१२ साली फाल्गुनी नायर यांनी कोटक महिंद्रा कॅपिटलमध्ये असणारी त्यांची मॅनेजिंग डायरेक्टरची नोकरी सोडली आणि वैयक्तिक बचतीतून दोन दशलक्ष डॉलर्स (जवळपास १६ कोटी रुपये) गुंतवून ‘नायका’ ही कंपनी सुरू केली. ही कंपनी नंतर शेअर बाजारात सूचीबद्ध झाली आणि फाल्गुनी नायर या भारताच्या सर्वांत श्रीमंत स्वबळावर यशस्वी झालेल्या महिलांपैकी एक बनल्या. फोर्ब्सनुसार जुलै २०२५ मध्ये फाल्गुनी नायर यांची एकूण संपत्ती २८,८३३ कोटी आहे आणि नायका कंपनीची एकूण किंमत ६२,९१२ कोटी एवढी आहे, असं मनीकंट्रोलनं सांगितलं आहे.