Ravindra Kumar Success Story : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वांत कठीण स्पर्धात्मक परीक्षांपैकी एक आहे. इच्छुक उमेदवार यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी भरपूर मेहनत घेतात आणि आयएएस, आयएफएस, आयआरएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करतात. पण, त्यापैकी काही जणच ही स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. यूपीएससीची परीक्षा पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा व मुलाखत अशा या तीन टप्प्यांत विभागली गेली आहे. तर, आज आपण रवींद्र कुमार यांच्या यशोगाथेचा प्रवास जाणून घेणार आहोत, ज्यांचा प्रवास माउंट एव्हरेस्टच्या उंचीएवढा मोठा आहे आणि जो त्यांनी सहज पार केला आहे.
रवींद्र कुमार यांचा बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातील चेरिया बरियारपूर या छोट्याशा गावापासून सुरू झालेला प्रवास त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) प्रतिष्ठित पदापर्यंत घेऊन गेला आहे. आज ते आझमगडचे जिल्हा दंडाधिकारी (DM) म्हणून काम करतात आणि हजारो तरुणांसाठी प्रेरणास्रोत म्हणून ते उभे आहेत.
रवींद्र कुमार यांचा जन्म एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला आणि त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूपच आवड होती. त्यांनी त्यांच्या गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९९९ मध्ये आयआयटी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली. पण, अभियांत्रिकी कारकीर्द करण्याऐवजी त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये सामील होण्याचा पर्याय निवडला. त्यांनी मुंबईतील टीएस चाणक्य इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतले आणि २००९ पर्यंत त्यांनी मर्चंट नेव्हीमध्ये मुख्य अधिकारी म्हणून काम केले.
चक्क मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली (Success Story)
त्यानंतर २००९ मध्ये त्यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची तयारी करण्यासाठी चक्क मर्चंट नेव्हीची नोकरी सोडली आणि २०११ मध्ये ते आयएएस अधिकारी झाले. त्यांची पहिली पोस्टिंग सिक्कीम कॅडरमध्ये झाली, जिथे त्यांनी उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) ते साहसी संस्थेचे संचालक अशा विविध भूमिका बजावल्या. २०१६ मध्ये त्यांची उत्तर प्रदेशात बदली झाली.
कौतुकास्पद गोष्ट म्हणजे २०१३ मध्ये आणि २०१५ मध्ये रवींद्र कुमार यांनी दोनदा माउंट एव्हरेस्ट चढून इतिहास लिहिला आहे.. २०११ मध्ये सिक्कीम भूकंपानंतर मदतकार्यात त्यांच्यामध्ये गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. त्यांनी हिमालयन पर्वतारोहण संस्थेत प्रशिक्षण घेतले आणि असंख्य आव्हानांना न जुमानता, त्यांनी आपली आवड जोपासली. एकंदरीत त्यांचा उल्लेखनीय प्रवास हे सिद्ध करतो की, कोणतीही स्वप्नपूर्ती करणे ही खूप मोठी बाब नसते; फक्त त्यासाठी समर्पण, कठोर परिश्रम यांची साथ हवी असते.