Success Story of Rithuparna KS: कर्नाटकच्या रितुपर्णा के. एस. यांना इंजिनियरिंगच्या शिक्षणादरम्यान जगप्रसिद्ध रॉल्स रॉयस कंपनीकडून ७२.३ लाख रुपये वार्षिक पगाराचे प्री-प्लेसमेंट ऑफर मिळाले आहे. त्यांचं हे यश हे दाखवतं की, मेहनत आणि चिकाटीने कोणाचेही स्वप्न पूर्ण होऊ शकते.
स्वप्न होते डॉक्टर होण्याचे; पण…
कर्नाटकमधील तीर्थहल्ली तालुक्यातील कोडूर गावची रहिवासी असलेल्या रितुपर्णा यांनी सुरुवातीचे शिक्षण सेंट अॅग्नेस स्कूलमध्ये घेतले. मीडिया रिपोर्टनुसार, पीयूसी (Pre-University Course) नंतर त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते; पण नीट (NEET) परीक्षेत सरकारी सीट न मिळाल्यामुळे त्यांनी CET च्या माध्यमातून इंजिनियरिंगची वाट निवडली आणि सह्याद्री कॉलेजमध्ये रोबोटिक्स व ऑटोमेशन इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घेतला.
शेतकऱ्यांसाठी बनवलेला रोबोट, अनेक पुरस्कार जिंकले
मीडिया रिपोर्टनुसार, कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर रितुपर्णा यांना रोबोटिक्समध्ये आवड निर्माण झाली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पहिला प्रोजेक्ट तयार केला होता. त्यामध्ये त्यांनी सुपारीच्या शेतीत उपयोगी पडेल अशी रोबोटिक सिस्टीम तयार केली. हे इनोव्हेशन गोव्यामधील INEX स्पर्धेत सादर करण्यात आले, जिथे त्यांच्या पथकाला सुवर्ण व रजत पदक मिळाले. त्यानंतर रितुपर्णा यांनी NITK सुरथकल येथे रोबोटिक सर्जरीवर काम केले आणि सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटसाठी एक ॲप तयार करण्यात प्रशासनाला मदत केली.
रोल्स रॉयसपर्यंतचा प्रवास
रितुपर्णा यांनी आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्यासाठी रॉल्स रॉयस कंपनीत इंटर्नशिपसाठी अर्ज केला. सुरुवातीला कंपनीनं त्यांच्या पात्रतेबाबत शंका घेतली आणि म्हटले की, त्या एकही काम वेळेत पूर्ण करू शकणार नाहीत. पण, रितुपर्णा यांनी एका महिन्याची डेडलाइन असलेले काम फक्त एका आठवड्यात पूर्ण करून दाखवले. त्यानंतर कंपनीने त्यांना अनेक प्रोजेक्ट्स दिले आणि सलग आठ महिने त्यांचे मूल्यांकन केले.
कठोर परिश्रमाची गोड फलप्राप्ती
मीडिया रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२४ मध्ये रॉल्स रॉयस कंपनीने रितुपर्णा यांना जेट इंजिन मॅन्युफॅक्चरिंग विभागात प्री-प्लेसमेंट ऑफर दिली. जानेवारी २०२५ पासून त्या रात्री १२ वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत कंपनीसाठी रिमोट काम करू लागल्या आणि दिवसभर त्यांनी कॉलेजचे शिक्षणही सुरू ठेवले. एप्रिल २०२५ मध्ये कंपनीने त्यांचा पगार वार्षिक ३९.६ लाख रुपयांवरून वाढवून ७२.३ लाख रुपये केला. आता त्या सातवे सेमिस्टर पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेतील टेक्सासमध्ये असलेल्या युनिटमध्ये काम सुरू करणार आहेत.
यशाची नवी व्याख्या
फक्त मोठ्या शहरांमधील किंवा प्रसिद्ध कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनाच आंतरराष्ट्रीय संधी मिळतात, या विचाराला रितुपर्णा यांची कहाणी आव्हान देते. त्यांनी हे सिद्ध केले की, जर जिद्द आणि मेहनत असेल, तर कुठलाही विद्यार्थी जगातील मोठ्या कंपन्यांमध्ये आपली जागा मिळवू शकतो.