विद्यार्थी मित्रांनो, या लेखात आपण यूपीएससी मुख्य परीक्षा ‘जीएस २’ या पेपरमधील ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ हा घटक समजून घेणार आहोत. ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ समजून घेताना त्यातील मुलभूत संकल्पना आपण समजून घ्यायला हव्यात तसेच चालू घडामोडीतील आंतरराष्ट्रीय मुद्दे यासाठी अभ्यासणे अपेक्षित आहे.

२०२४ च्या मुख्य परीक्षेत ‘आंतरराष्ट्रीय संबंध’ या घटकावर २५० पैकी ५० गुणांचे प्रश्न विचारले आहेत. यातून आपणास या घटकाचे ‘जीएस २’ मधील महत्त्व लक्षात येते.

आयोगाने यासाठी दिलेला अभ्यासक्रम :

● भारत आणि शेजारील राष्ट्र यांचे संबंध.

● द्विपक्षीय, प्रादेशिक व जागतिक गट आणि भारताचा समावेश असणारे आणि / किंवा भारताच्या हितसंबंधाला बाधा पोहोचवणारे करारनामे

● विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा व राजकारणाचा भारताच्या हितसंबंधांवर आणि भारतीय भांडवलदारांवर होणारा परिणाम.

● महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, अभिकरणे, मंच, त्यांची रचना व जनादेश.

इथे अभ्यास करताना उदा. युक्रेन झ्र रशिया युद्धाचा विचार केल्यास त्यांच्यातील वादाचे कारण म्हणजेच त्यांच्या संबंधाचा इतिहास आपण जाणून घ्यायला हवा. या युद्धाचा भारतावर व जगावर होणारा परिणाम आपण समजून घ्यायला हवा. याच बरोबर भारताचे या दोन्ही देशांशी असणारे संबंधही समजून घेणे गरजेचे आहेत. जसे की रशिया हे भारताचे मित्र राष्ट्र आहे तर युक्रेन बरोबर पुढील बाबींमुळे भारताचे संबंध काहीशे तणावाचे राहीले आहेत

● भारताच्या अणुचाचणीवर केलेली टीका

● पाकिस्तानला संरक्षण उपकरणांचा पुरवठा

● कश्मीर धोरण

आंतरराष्ट्रीय संबंधाचा एक मजबूत वैचारिक पाया तयार करण्यासाठी वास्तववाद, उदारमतवाद आणि रचनावाद यासारख्या मूलभूत सिद्धांतांना समजून घ्यायला हवे. उदा. आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उदारमतवाद हा एक सिद्धांत आहे जो जागतिक घडामोडींना आकार देण्यासाठी सहकार्य, परस्परावलंबन आणि संस्थांना प्रमुख घटक म्हणून महत्त्व देतो, जो स्वार्थपूर्ण, संघर्ष-प्रवण आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या वास्तववादी दृष्टिकोनाच्या विरुद्ध आहे. आंतरराष्ट्रीय कायदा, संघटना आणि आर्थिक संबंधांमुळे सामायिक हितसंबंध शांतता आणि समृद्धीकडे नेऊ शकतात असे यात मानले जाते.

आंतरराष्ट्रीय संस्थांचा अभ्यास करताना त्या संस्थांचे जागतिक महत्त्व, त्यात भारताची भूमिका याचा विचार करणे अपेक्षित आहे. इथे आपण जी७ चे महत्त्व जाणून घेवू. २०२५ मधील जी७ चे शिखर सम्मेलन १५ ते १७ जून २०२५ दरम्यान कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतातील कॅननास्कीस येथे आयोजित करण्यात आले होते. हे ५१वे जी७ शिखर सम्मेलन होते. पहिल्या जी७ बैठकीचा ५०वा वर्धापन दिन होता. त्यामुळे आगामी काळात इथे प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे.

भारत आणि जी७

भारत हा जी७ चा सदस्य नाही परंतु त्याच्या आउटरीच सत्रांमध्ये वारंवार आणि प्रभावशाली आमंत्रित म्हणून गटाशी त्याचे महत्त्वपूर्ण संबंध आहेत. २०२५ पर्यंत भारताने बारा जी७ शिखर परिषदेच्या आउटरीच सत्रांमध्ये भाग घेतला आहे, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जून २०२५ मध्ये कॅनडामध्ये झालेल्या ५१ व्या जी७ शिखर परिषदेत सलग सहाव्यांदा उपस्थित होते. हे जी७ राष्ट्रांसोबत भारताच्या वाढत्या सहभागाचे प्रतीक आहे.

भारत अनेकदा जागतिक दक्षिणेचा (ग्लोबल साऊथ) आवाज म्हणून काम करतो, जी७ व्यासपीठावर विकसनशील देशांच्या चिंता आणि प्राधान्यक्रमांवर प्रकाश टाकतो. तसेच जागतिक दक्षिणेतील पायाभूत सुविधा प्रकल्पांना निधी देण्याच्या उद्देशाने चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला प्रतिसाद म्हणून जी७ च्या पार्टनरशिप फॉर ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंट (पीजीआयआय) सारख्या उपक्रमांमध्ये भारत महत्त्वाची भूमिका बजावतो.

२०२४ च्या मुख्य परीक्षेत याच्याशी संबंधित पुढील प्रश्न बघा

● प्र. प्रादेशिक आणि जागतिक भू-राजकारणात त्यांचे वाढते महत्त्व अधोरेखित करणारे मध्य आशियाई प्रजासत्ताक सोबत भारताचे विकसित होत असलेले राजनैतिक, आर्थिक आणि धोरणात्मक संबंधांचे टीकात्मक विश्लेषण करा. (१५० शब्दात उत्तर द्या)

● प्र. ‘चीनच्या पुरवठा साखळीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि चीनच्या राजकीय आणि आर्थिक वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी एक धोरणात्मक सहयोगी म्हणून पश्चिमेकडील देश भारताला पर्याय म्हणून प्रोत्साहन देत आहेत.’ हे विधान उदाहरणांसह स्पष्ट करा. (१५० शब्दांत उत्तर द्या)

● प्र. ‘जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद हा एक महत्त्वाचा धोका बनला आहे.’ आंतरराष्ट्रीय स्तरावर या धोक्याला संबोधित करण्यात आणि कमी करण्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समिती आणि त्याच्या संबंधित संस्थांची प्रभावीता मूल्यांकन करा. (२५० शब्दात उत्तर)

● प्र. जागतिक व्यापार आणि ऊर्जा प्रवाहावर लक्ष केंद्रित करून भारतासाठी मालदीवचे भू-राजकीय आणि भू-सामरिक महत्त्व यावर चर्चा करा. आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान हे संबंध भारताच्या सागरी सुरक्षा आणि प्रादेशिक स्थिरतेवर कसा परिणाम करतात यावर देखील चर्चा करा? (२५० शब्दांत उत्तर)

वरील प्रश्न बघितल्यास हे लक्षात येते की, हे सर्व प्रश्न चालू घडामोडींवर आधारित आहेत. त्यामुळे नियमितपणे जागतिक स्तरावरील घडामोडींचे विश्लेषण आपण करायला हवे. त्यावर आधारित काही अपेक्षित प्रश्न स्वत: तयार करून त्यासाठीच्या उत्तराचे मुद्दे नोट्स स्वरूपात लिहून ठेवायला हवेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sushilbari10 @gmail. com