सचिन मेमाणे

सप्टेंबरमध्ये यूपीएसस सनदी सेवेची मुख्य परीक्षा पार पडली. या मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी भाषेचा पेपर हा अर्हताकारी (Qualifying) आहे. ३०० गुणांचा इंग्रजी या विषयाचा पेपर ३ तासांच्या वेळेमध्ये सोडविणे अनिवार्य असून त्यामध्ये २५ टक्के म्हणजेच किमान ७५ गुण प्राप्त करणारा परीक्षार्थी हा या विषयात पात्र समजला जातो. या पेपरमध्ये पात्र झाल्यासच इतर पेपर तपासले जातात. त्यामुळे यामध्ये पात्र होणे गरजेचे आहे. सुरुवातीला आपण या पेपरचे स्वरूप ढोबळमानाने समजून घेऊ. तसेच नुकत्याच पार पाडलेल्या परीक्षेतील इंग्रजीच्या पेपरबद्दल देखील सविस्तर चर्चा करू या.

इंग्रजी (अनिवार्य) या विषयात पुढील उपघटक आहेत –

Essay Writing (100 Marks)

Reading Comprehension (75 Marks)

Pré cis Writing (75 Mark)

English Grammar ( Usage) and Vocabulary (50 Marks)

हेही वाचा >>> UPSC-MPSC : २०११ चे राष्ट्रीय उत्पादन धोरण काय होते? त्यामागचा नेमका उद्देश कोणता?

प्रस्तुत पेपर हा क्वालिफायिंग असल्यामुळे तयारीच्या काळात काहीसा दुर्लक्षित राहणारा पेपर आहे. मुख्य परीक्षेची तयारी नसणाऱ्या उमेदवारांना मात्र हा पेपर एक आव्हान वाटू शकतो. मराठी माध्यमातून यूपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी सर्व अभ्याससाहित्य हे मराठी भाषेतीलच वापरत असतात. या पेपरमधील निबंध विषयाची तयारी करण्यासाठी देखील विद्यार्थी बहुधा मराठी वृत्तपत्रांमधील संपादकीय वाचताना दिसतात. एकंदरीत मराठी वाचन व मराठी लेखन याच साच्यामध्ये त्यांच्या तयारीची दिशा ठरलेली असते.

पूर्व परीक्षा पात्र झाल्यावर इंग्रजी पेपरची तयारी करणारे बहुतेक विद्यार्थी आढळतात. अचानक ३०० गुणांचा पेपर तब्बल तीन तास इंग्रजीमध्ये लिहिणे हे अवघड काम वाटू लागते. यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी एका पद्धतशीर व नियोजनपूर्वक या विषयासाठी रोज थोडा वेळ दिला तर ऐनवेळी होणारी दमछाक टाळता येऊ शकते. ते कसे यासाठी आजचा हा लेख नक्कीच फायदेशीर ठरेल.

Listening, Speaking, Reading आणि Writing ही भाषेची चार कौशल्ये मानली जातात. जसे उत्तम वक्ता होण्यासाठी उत्तम श्रोता असणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे उत्तम लिहिता येण्यासाठी संबंधित भाषेचे वाचन करणे क्रमप्राप्त आहे. प्रशासक म्हणून काम करताना अनेक महत्त्वाचे दस्तऐवज हे इंग्रजी भाषेमध्ये असतात. जसे की विविध अहवाल, न्यायालयीन निर्णय, शासकीय नियमावली इत्यादी संबंधित माहितीचे वाचन करून समजून योग्य निर्णय घेणे, तसा त्याच भाषेत लेखी पत्र किंवा अहवाल तयार करणे ही जबादारीची कामे बिनचूक अधिकारी/ प्रशासक म्हणून पार पाडावी लागतात. काही चूक झाल्यास गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांचे वाचन तसेच लेखन कौशल्य तपासणे हा एकमेव उद्देश इंग्रजी भाषा पेपरचा आहे.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : पर्यावरणासंदर्भात कोणत्या आंतरराष्ट्रीय परिषदा भरवण्यात आल्या? त्यांची उद्दिष्टे कोणती?

UPSC परीक्षेची तयारी करणारे बहुधा सर्व विद्यार्थी हे ‘द हिंदू’ सारखे इंग्रजी वृत्तपत्र नियमित वाचत असतात. त्यातील संपादकीय लेख हे विविध विषयांवर येत असल्याने त्यातून ज्वलंत विषयाची जाण होते व त्याचा उपयोग हा निबंध लेखन तसेच चालू घडामोडींसाठी होत असतो. हेच लेख वाचत असताना इंग्रजी भाषेची वाक्यरचना (Basic sentence structures) तसेच इंग्रजी शब्दसंग्रहाची (English Vocabulary) रोज थोडी थोडी तयारी केली तर त्याच अर्ध्या तासात इंग्रजी विषयाची तयारी देखील होऊ शकते; कारण शब्दसंग्रह उत्तम असेल तरच वाचलेले समजेल व समजलेले लिहिता देखील येईल. त्याचबरोबर त्याच लेखातील माहिती नसलेले १० शब्द रोज एका डायरी किंवा नोटबुकमध्ये लिहून त्याचे वाचन केल्यास वेगळी तयारी करण्याची गरज नाही.

इंग्रजी भाषेचा पेपर हा उमेदवाराची भाषिक क्षमता तपासणे हा असल्याने या उमेदवारांकडून परीक्षकाच्या पुढील अपेक्षा असतात.

१) हस्ताक्षर हे वाचनीय असावे.

२) लिहिताना व्याकरण व स्पेलिंगच्या चुका टाळायला हव्यात.

३) विरामचिन्हे अचूक वापरली जावीत.

४) विषय वस्तूची पद्धतशीर मांडणी केलेली असावी.

इंग्रजी सेक्शनमधील वर उल्लेख केलेल्या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी फक्त लेख वाचून कशी होऊ शकते, याचा थोडक्यात आढावा घेऊ.

निबंध लेखन (ESSAY WRITING)

यावर्षीच्या यूपीएससी मुख्य परीक्षेत खालील चार विषय देण्यात आले होते.

१. OTT and the future of Multiplexes

२. Global warming in an unequal world.

३. Social media and the marketing of the self.

४. Happiness is a state of mind. वरीलपैकी १ ते ३ या विषयांवर आपण वृत्तपत्रामध्ये नक्कीच वाचलेले असते कारण हे सर्व विषय ज्वलंत आहेत. परंतु बऱ्याचवेळा प्रत्येक विषयाचे शब्द हे आपणास माहीत असतातच असे नाही, त्यास आपण विशेषीकृत शब्दसंग्रह (Specialized vocabulary) असे देखील म्हणतो. त्यामुळे अशी शब्दरचना ही साधारण शब्दसंग्रहापेक्षा (General Vocabulary) वेगळी असल्याने आपणास तो विषय समजत नाही किंवा लिहिता देखील येत नाही. परंतु असे लेख आपण वाचले असल्यास आपणास त्या विषयाबद्दल माहिती असते, आकडेवारीचे ज्ञान असते. एकंदरीत चौफेर वाचन असणारा उमेदवार अशा कोणत्याही विषयावर अतिशय आत्मविश्वासाने निबंध लिहू शकतो.