प्रा. ज्ञानेश्वर जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील लेखातून आपण ई-शासनाविषयी माहिती घेतली. या लेखातून आपण दबाव गट म्हणजे काय आणि त्याची व्याप्ती समजून घेऊ. समाजातील विविध घटक त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित होऊन ते एका सूरात मांडतात. कारण- त्यामुळे त्या प्रश्नांसंदर्भात शासकीय पातळीवर गांभीर्य निर्माण होते. अशा प्रकारचे संघटन निर्माण होण्यामागे दबाव गट संकल्पना कार्य करीत असते.

दबाव गट ही संकल्पना ठरावीक व्याख्येत बांधणे त्या दृष्टीने कठीण कार्य असले तरी या संदर्भात अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यातील एक महत्त्वाची व्याख्या अशी आहे की, ‘दबाव गट हा समान हितसंबंध असणाऱ्या लोकांचा समूह असून, हा समूह शासकीय धोरणांना प्रभावीत करून, त्यांचे हितसंबंध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो; ज्या अंतर्गत सामाजिक एकात्मता राजकीय अभिव्यक्ती व बदलाचे वाहक, अशी भूमिका दबाव गटामार्फत एकाच वेळी होताना दिसते. अधिकृतरीत्या शासनामध्ये सहभागी न होता, आपणास हवे असणारे धोरण, तसेच कायदे बनवून घेण्याची क्षमता दबाव गटात असते.

हेही वाचा – UPSC-MPSC : नागरिकांची सनद म्हणजे काय? त्याची उद्दिष्टे कोणती?

दबाव गटांची ऐतिहासिक पार्श्वभूमी

शासन यंत्रणेच्या उगमापासून दबाव गट विविध स्वरूपांमध्ये कार्यरत होते. हे दबाव गट व्यक्ती आणि व्यक्तींच्या समूहाचे हित साध्य करण्यासाठी कार्यरत असायचे, औद्योगिक क्रांती, तसेच बाजारकेंद्रित अर्थव्यवस्थेच्या प्रारूपापासून दबाव गटांना एक संरचनात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. जागतिक व्यापारात निर्माण होणारी एकाधिकारशाही, तसेच तंत्रज्ञानात्मक प्रगती यांतून दबाव गटांचे महत्त्व आणखी वृद्धिंगत होत गेले. जगभरात लोकशाही शासनप्रणालीचा झालेला प्रचार आणि प्रसार यांतूनदेखील दबाव गटांना संघटित होण्याच्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने मोकळा अवकाश मिळाला. कल्याणकारी राज्य, समाजवादी व्यवस्था यांतर्गत राज्याच्या सत्तेवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवण्यासाठी दबाव गटांची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली. सर्वसमावेशक राजकीय हितसंबंधांना सामावून घेणाऱ्या राजकीय पक्षांची कमतरता दबाव गटांच्या माध्यमातून भरून काढण्याचा प्रयत्न होऊ लागला. त्यातून दबाव गटांचे प्रमाण वाढले.

दबाव गटांची वैशिष्ट्ये

दबाव गट हे ठरावीक हितसंबंधाच्या आधारावर निर्माण होतात. त्यामुळे समाजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी दबाव गट उपयोगाचे ठरतात. संस्थात्मक संरचनेनुसार दबाव गटांच्या सदस्यांची संख्या कमी-जास्त होते. दबाव गटांचे महत्त्व हे त्यांच्या शासकीय धोरणांना प्रभावीत करण्याच्या क्षमतेवर आधारित असते. दबाव गट पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक पद्धतीने शासकीय धोरणनिर्मितीला अधिक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत; ज्यांतर्गत राजकीय पक्षांना निधी देणे, उमेदवारांना मदत करणे, तसेच निवडून आल्यानंतर ठरावीक उमेदवार, तसेच राजकीय पक्षांकडून पूर्वनिर्धारित कार्य करून घेणे ही दबाव गटांची मुख्य कार्ये आहेत.

दबाव गटांचा राजकीय कल त्यांच्या मागण्यांना पूरक ठरणाऱ्या बाजूने त्वरित बदलतो, हेदेखील त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. प्रातिनिधीक लोकशाहीमध्ये वैयक्तिक पातळीवरदेखील आपापल्या मागण्या मांडणे, तसेच त्यासाठी प्रयत्न करणे हे उपलब्ध असते. परंतु, वैयक्तिकपेक्षा सामूहिक दबावाला किंवा प्रयत्नांना शासकीय पातळीवर जास्त महत्त्व दिले जाते आणि त्यामुळे दबाव गट हे प्रतिनिधीक लोकशाहीसाठी महत्त्वाचे साधन ठरले आहे.

राजकीय पक्ष आणि दबाव गट यातील फरक

दबाव गट हे प्राथमिकदृष्ट्या राजकीय स्वरूपाचे नसतात; तर राजकीय पक्ष हे मूलतः राजकीय स्वरूपाचे संघटन असते. दबाव गटांना सत्ता हस्तगत करायची नसते; तर त्यांना सत्तेत असलेल्या लोकांकडून आपले हितसंबंध साध्य करून घ्यायचे असतात. याउलट राजकीय पक्षांचे सत्ता हस्तगत करणे हे मुख्य ध्येय असते. दबाव गट निवडणूक लढवीत नाहीत; तर राजकीय पक्ष निवडणूक लढवतात, प्रचार करतात, तसेच त्यांचे उमेदवारदेखील निवडणुकीत उतरवतात. दबाव गटांना राजकीय विचारधारा असेलच, असे नाही; तर राजकीय पक्षांना मुख्यतः विचारधारा असते. दबाव गटांची ध्येयधोरणे ही ठरावीक असतात; तर राजकीय पक्षांची ध्येयधोरणे ही बहुआयामी, तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभाव टाकणारी असतात. या स्वरूपात आपण दबाव गट आणि राजकीय पक्षांत तात्त्विक आणि प्रक्रियात्मक अंगांनी फरक करू शकतो.

हेही वाचा – UPSC-MPSC : भारत सरकारचे ई-शासनासंदर्भातील धोरण आणि प्रकल्प

दबाव गटांची उदाहरणे

दबाव गटांच्या निर्मितीवरून त्यांचे स्वरूप वेगवेगळे ठरते. जसे की पारंपरिक सामाजिक सांस्कृतिक संरचनेतून निर्माण झालेले दबाव गट; ज्यात धार्मिक दबाव गटाच्या अंगाने आर्य प्रतिनिधी सभा, सनातन धर्मसभा, पारसी अंजुमन, अँग्लो इंडियन ख्रिश्चन असोसिएशन इत्यादींची उदाहरणे देता येतील. हे दबाव गट त्यांच्याशी संबंधित धर्माच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी तत्पर असतात. भारतात जातींवर आधारित दबाव गटदेखील आहेत; ज्यांतर्गत ब्राह्मण सभा, नायर सोसायटी यांची उदाहरणे देता येतील. त्याचप्रमाणे भाषेच्या आधारावरती कार्य करणारे विविध दबाव गटदेखील भारतात आढळून येतात. जसे की तमीळ संघ, मराठी एकीकरण समिती इत्यादी. त्याचसोबत उद्योगाशी संबंधित विविध दबाव गटदेखील भारतात उपलब्ध आहेत; जसे की असोचेम, फिक्की इत्याद. हे दबाव गट शासकीय धोरणांना उद्योगस्नेही बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात.

याचसोबत विविध कामगार संघटना कामगारांच्या हितसंबंधांसाठी दबाव गटाचे कार्य पार पाडत असतात. त्यांतर्गत युनायटेड ट्रेड युनियन काँग्रेस, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस, हिंद मजदूर सभा इत्यादी उदाहरणे देता येतील. शेतकऱ्यांच्या हितसंबंधांना अधोरेखित करणारे दबाव गट हे शेतकरी संघटनांच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहेत; ज्यामध्ये भारतीय मजदूर संघ, किसान सभा, भारतीय किसान युनियन, शेतकरी कामगार संघटना इत्यादींचा सहभाग दिसून येतो. त्याचबरोबर विद्यार्थी, शिक्षक, नागरी समाज इत्यादी समूहांचेही दबाव गट समाजात आहेत.

दबाव गटांची कार्यपद्धती

लॉबिंग करून संबंधित दबाव गट आपापले हितसंबंध साध्य करण्याचा प्रयत्न करतात. त्यासोबत जनमत प्रभावीत करणे, प्रशासक, तसेच लोकप्रतिनिधींना स्वतःचे हितसंबंध पटवून देऊन, त्यांचे मतपरिवर्तन करणे. पर्यावरणीय जाणीव जागृती करणे व विविध स्वरूपांच्या पर्यावरणीय समस्यांवर तोडगा काढणे. तसेच नोकरशहांना आपल्या हितसंबंधांच्या बाजूने वळवणे, विविध वृत्तपत्रांमध्ये लेख लिहून जनमतावर त्याचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर सत्याग्रहाचा मार्ग निवडून अहिंसक आंदोलने करणे याचादेखील समावेश दबाव गटांच्या कार्यपद्धतीत होतो. त्याच अनुषंगाने शेवटचा उपाय म्हणून संप, बंद पुकारणे आणि त्यामार्फत आपल्या मागण्या मान्य करून घेणे इत्यादी स्वरूपात दबाव गट आपल्या हितसंबंधांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

दबाव गटांचे सकारात्मक स्वरूप

दबाव गटाच्या माध्यमातून शासन व्यवहार हा सुशासनात परावर्तित होण्यास मदत होते. शासनाचा जनतेशी असणारा संबंध सुकर व्हावा, यासाठी दबाव गट महत्त्वाची भूमिका निभावताना आपणास दिसतात. कार्यपालिकेवर योग्य प्रकारे दबाव ठेवून जनतेचे हित साध्य करण्याचे काम दबाव गट करताना दिसतात. तसेच जनतेची एकंदरीत शासन व्यवहारातील भूमिका वाढावी यासाठी दबाव गट सकारात्मक भूमिका पार पाडत असतात. त्याचबरोबर अल्पसंख्याकांना आवाज देण्याचे काम दबाव गटाच्या माध्यमातून होताना दिसते. किचकट आणि महत्त्वाची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी दबाव गट सकारात्मक कार्य करताना दिसून येतात. एकंदरीत दबाव गटांमार्फत नेतृत्वगुण, तसेच मूलभूत हक्क संरक्षण आणि राजकीय सामाजिकीकरणासाठी महत्त्वाचे योगदान दिले जाते.

हेही वाचा – UPSC-MPSC : नागरिकांच्या सनदेच्या संदर्भात भारतात कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या?

दबाव गटांचे नकारात्मक स्वरूप

समाजातील बहुसंख्याक आणि प्रभावशाली लोकांचेच हितसंबंध दबाव गट साध्य करतो, अशा स्वरूपाची टीका दबाव गटांवर होताना दिसते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काही दबाव गट हानिकारक, तसेच सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारी भाषादेखील वापरतात. तर, काही दबाव गटांच्या वित्तीय वर्चस्वामुळे त्यांची शासकीय धोरणावर प्रभाव टाकण्याची क्षमता जास्त असते. याचसोबत दबाव गटांच्या कार्यपद्धतीत स्थैर्य आणि वचनबद्धतेचा अभाव असल्याकारणाने दबाव गटांची राजकीय सलगी काळानुरूप बदलत जाते. दबाव गटांची थेट कृती; जसे की बंद, घेराव, संप यांच्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळित होण्याचा धोकाही संभवतो.

अशा प्रकारे दबाव गटांच्या अनुषंगाने इत्थंभूत माहिती आपण आजच्या लेखात घेतली आहे. पुढील लेखात आपण स्वयंसेवी संस्था म्हणजेच बिगरसरकारी संस्थांच्या अनुषंगाने चर्चा करू या.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc mpsc governance pressure group features and difference from political party india mpup spb
First published on: 29-10-2023 at 20:44 IST