Types of Unemployment In Marathi : मागील लेखामध्ये आपण दारिद्र हा घटक जाणून घेतला. या लेखातून आपण बेरोजगारी म्हणजे काय? बेरोजगार नेमके कोणास म्हणावे? त्याचे प्रकार कोणते? हे सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया.

बेरोजगारीची व्याख्या करणे मूलतः अवघड आहे. कोणत्या वयोगटातील व्यक्तींचा समावेश केला जावा? घरगुती उद्योगांत विनावेतन काम करणाऱ्या कुटुंबातील सभासदांची गणना कोठे करावी? किमान किती काळ काम केल्यास व्यक्तीला रोजगार उपलब्ध आहे असे म्हणावे? तात्पुरत्या कारणाकरिता व्यक्ती बेरोजगार झाल्यास तिची गणना कोठे करावी? या व अशा अनेक अडचणी बेरोजगारीची व्याख्या व मापन करताना येतात व त्या त्या वेळी धोरणात्मक उद्देशांनुसार बेरोजगारीची व्याख्या व मापन केले जाते. तथापि, सर्वसामान्यपणे बाजारात चालू असलेल्या वेतनाचा दर स्वीकारून काम करण्याची तयारी असणाऱ्या सक्षम कामकऱ्याला जर काम मिळू शकले नाही, तर त्याची गणना ‘बेरोजगार’ म्हणून करता येईल आणि अर्थव्यवस्थेतील अशा स्थितीला बेरोजगारीची परिस्थिती म्हणता येईल.

Union Budget 2024 Key Announcements in Marathi
Budget 2024 : लघु व मध्यम उद्योगांना अर्थसंकल्पात मोठे बळ
Union Budget 2024 Key Announcements in Marathi
Budget 2024 : ही भविष्यामध्ये मोठी गुंतवणूक!
Nirmala Sitharaman
Budget Cheaper and Costlier List : अर्थसंकल्पानंतर काय स्वस्त, काय महागलं? वाचा पूर्ण यादी; सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय
Interesting Facts About the Union Budget in Marathi, central government, budget 2024, manmohan singh
Union Budget Facts : भारताच्या अर्थसंकल्पाबाबत काही रंजक गोष्टी…
Union Budget Expectations on Gadgets Mobile in Marathi
Budget 2024 Expectations : मोबाइल स्वस्त होणार का? आजच्या अर्थसंकल्पाआधी इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या दरासंबंधी माहिती घ्या
Interesting Facts About the History of Union Budget in Marathi
Union Budget History Facts : सर्वाधिक लांबलचक भाषण ते ८०० शब्दांचा मसुदा; भारतीय अर्थसंकल्पातील ‘या’ दहा रंजक गोष्टी माहिती आहेत का?
what is the cheapest 5G prepaid data plan to buy from Jio or Airtel
Jio vs Airtel: कोणती कंपनी ऑफर करतेय सगळ्यात स्वस्त प्लॅन? कोणता रिचार्ज करायचा? किंमत, डेटा, सबस्क्रिप्शन पाहून ठरवा!
What makes mosquitoes suck blood
डासांनी रक्त शोषण्यामागचे कारण काय?

बेरोजगारी हा शब्द व्यक्तिसापेक्ष वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ ‘कामाच्या शोधार्थ असणार्‍या व्यक्तीला काम न मिळणे’ असा होतो. तसेच जेव्हा बेरोजगारी हा शब्द अर्थव्यवस्थेच्या बृहत् अर्थशास्त्रीय तत्त्वावर वापरला जातो, तेव्हा बेरोजगारीचा अर्थ ‘अशी परिस्थिती ज्यात संपूर्ण किंवा मोठ्या कार्यकारी लोकांना काम मिळत नाही’ असा होतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या पातळीवर रोजगार इच्छुकांच्या संख्येपेक्षा रोजगार उपलब्धता कमी असेल, तर त्या अर्थव्यवस्थेत ‘बेरोजगारी’ आहे असे म्हणता येईल.

बेरोजगारीची परिस्थिती अविकसित देशांत तर आढळून येतेच तसेच विकसित देशांत सुद्धा आढळून येते. परंतु या दोन अवस्थांतील बेकारीच्या प्रकारांत, कारणमीमांसेत आणि उपाययोजनांबाबतही फरक आढळतो. अर्थशास्त्रज्ञांच्या मते विकसित देशांतील अर्थव्यवस्थेची वाटचाल संपूर्ण रोजगाराच्या परिस्थि‌तीच्या रोखाने असते (उदा. घर्षणात्मक बेरोजगारी) अशा अर्थव्यवस्थांमध्ये चालू वेतनावर काम करण्याची तयारी असलेल्या प्रत्येक सक्षम कामकऱ्याला काम मिळू शकते. अर्थात येथेही ऐच्छिक बेरोजगारी संभवते. परंतु तिचा विचार अर्थशास्त्रात केला जात नाही. सैद्धांतिक पातळीवर विकसित अर्थव्यवस्थांची वाटचाल पूर्ण रोजगाराच्या दिशेने असल्याचे अर्थशास्त्रांनी सांगितले. परंतु व्यवहारात विकसित भांडवलशाही अर्थव्यवस्थांमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती नसते, हे सुप्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी दाखवून दिले आहे.

बेरोजगारीचे सर्वसाधारणपणे दोन प्रकार पडतात.

१) शहरी बेरोजगारी आणि २) ग्रामीण बेरोजगारी.

शहरी बेरोजगारी

१ ) संरचनात्मक बेरोजगारी : अर्थव्यवस्थेच्या दोषांमुळे जी बेरोजगारी उद्भवते त्यास संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात. ही बेरोजगारी मंद आर्थिक वाढ, मजूर पुरवठा जास्त व मागणी कमी, कामरहित वृद्धी, गरज आणि पुरवठ्यात असंतुलन इत्यादी कारणांमुळे निर्माण होते. मुख्यतः ही बेरोजगारी अविकसित देशांमध्ये आढळते. मोठी गुंतवणूक करणे, विकास व रोजगार योजना राबवणे, उद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच योग्य आणि बदलानुरूप शिक्षण देणे अशा काही उपाययोजना करून ही बेरोजगारी कमी करू शकतो.

२) शैक्षणिक बेरोजगारी : शिक्षित असूनही कामाचा अभाव असणे, काम न मिळणे म्हणजेच शैक्षणिक बेरोजगारी. आर्थिक वाढ मंद स्वरूपाची असणे, शिक्षणापेक्षा अनुभवास जास्त प्राधान्य असणे, तसेच गरज आणि पुरवठ्यामध्ये असंतुलन असणे इत्यादी कारणांमुळे ही बेरोजगारी निर्माण होते. ही बेरोजगारी सहसा विकसनशील देशांमध्ये अधिक आढळते ( उदा. भारत). यावर उपाय म्हणून योग्य आणि बदलानुरूप शिक्षण देणे आवश्यक असते.

३) कमी प्रतीची किंवा न्यून बेरोजगारी : कमी प्रतीची बेरोजगारी म्हणजे तुमच्याकडे पात्रतासुद्धा आहे आणि तुमची काम करण्याची इच्छासुद्धा आहे तरी तुम्हाला रोजगार मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे व्यावसायिक व कौशल्यशिक्षणाचा अभाव असणे तसेच शिक्षण घेऊनही संधीचा अभाव असणे. ही बेरोजगारी विकसनशील व अविकसित देशांमध्ये पाहावयास मिळते. या बेरोजगारीवर एकच उपाय आहे, तो म्हणजे परंपरागत शिक्षणासोबतच व्यावसायिक व कौशल्यशिक्षण देणे.

४) घर्षणात्मक बेरोजगारी किंवा यंत्रीकृत बेरोजगारी : घर्षणात्मक बेरोजगारी म्हणजे उत्पादनयंत्रणेत सतत होत असलेल्या बदलांमुळे उद्भवणारी बेरोजगारी होय. घर्षणात्मक बेरोजगारीत उत्पादन पूर्ण रोजगार पातळीवर असते, म्हणजेच एका गटाला रोजगार मिळतो, परंतु दुसरा गट बेरोजगार होतो. ही बेरोजगारी विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा सर्व अर्थव्यवस्थांमध्ये पाहावयास मिळते. उत्पादन यंत्रणेत होणाऱ्या बदलांना अनुरूप नवननवीन कौशल्य आत्मसात करणे हा घर्षणात्मक बेरोजगारीवरील उपाय आहे.

५) चक्रीय‌ बेरोजगारी : प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये तेजी व मंदीचे चक्र उद्भवत असते. यात अर्थव्यवस्थेतील तेजी-मंदीच्या चक्रामुळे उद्भवणाऱ्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात. चक्रीय बेरोजगारी भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला अधिक पाहावयास मिळते. त्यामुळे ही बेरोजगारी मुख्यतः विकसित देशांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. योग्य सरकारी राजकोषीय धोरण व चलनविषयक धोरण हे तेजी व मंदीच्या चक्राची तीव्रता कमी करू शकतात आणि त्यामुळे चक्रीय बेरोजगारीचे प्रमाणसुद्धा कमी होऊ शकते.

६) अर्ध-बेरोजगारी: अर्ध-बेरोजगारी म्हणजे दिवसांमध्ये पूर्ण वेळ काम न मिळता दिवसभरातून काही विशिष्ट तास काम मिळणे.

७) अल्पकालीन बेरोजगारी आणि दीर्घकालीन बेरोजगारी: अर्थव्यवस्थेमध्ये असलेले मंदीचे चक्र हे जर अल्प कालावधीसाठी असेल तर तर त्या कालावधीत निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला अल्पकालीन बेरोजगारी आणि जर मंदीचे चक्र हे जर दीर्घकालावधीसाठी असेल तर त्या कालावधीमध्ये निर्माण होणाऱ्या बेरोजगारीला दीर्घकालीन बेरोजगारी असे म्हणतात. अल्पकालीन बेरोजगारी दूर करण्याकरिता चलनविषयक धोरणाचा उपयोग करणे परिणामकारक ठरू शकते तर दीर्घकालीन बेरोजगारी दूर करण्याकरिता राजकोषीय धोरणाचा उपयोग करणे परिणामकारक ठरते.

ग्रामीण बेरोजगारी :

१) हंगामी बेरोजगारी : एका वर्षाच्या कालावधीमध्ये बहुतांश महिने काम न मिळणे यास हंगामी बेरोजगारी असे म्हटले जाते. भारताचा विचार करता आपल्याला असे आढळून येते की भारतामध्ये मुख्यतः शेती हा प्रमुख व्यवसाय असून निम्म्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. भारतीय शेती मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे कोरडवाहू शेतीमध्ये जवळपास आठ महिने बेरोजगारीची परिस्थिती असते. मुख्यत्वे शेतमजूर आणि ऊसतोड कामगारांमध्ये ही बेरोजगारी आपल्याला अधिक प्रमाणात पाहावयास मिळते. यावर उपाय म्हणून कृषीपूरक व कृषीसंलग्न उद्योगांना प्रोत्साहन देणे, मनरेगासारख्या योजना राबवणे, सिंचनक्षमता वाढवणे.

२) प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी: एका कामामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लोक कामांमध्ये सहभागी होणे म्हणजेच व्यक्ती रोजगारीत दिसतात. परंतु त्या व्यवहारात त्या बेरोजगार असतात. त्या अतिरिक्त लोकांची सीमांत उत्पादकता ही शून्य असते. म्हणजेच अशा दिसून न येणाऱ्या बेरोजगारीला प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी असे म्हणतात. भारतामधील कृषीवरील अधिक अवलंबता अशा बेरोजगारीचे प्रमुख कारण आहे. ही बेरोजगारी मुख्यत्वे करून कृषी क्षेत्रामध्येच जास्त प्रमाणात पाहावयास मिळते. अविकसित व भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये ही बेरोजगारी पाहावयास मिळते. कृषी क्षेत्रावरील अवलंबता कमी करणे, कृषीपूरक व कृषीत्तर रोजगार संधी निर्माण करणे, तसेच शैक्षणिक स्तर उंचावणे अशा उपाययोजना करून प्रच्छन्न बेरोजगारीचे प्रमाण कमी केले जाऊ शकते.